*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*माझे गाव*
हिरव्या हिरवळीच्या कुशीत
गाव माझे शोभून दिसते
नव्या नवरीसारखी
पहाट उगवते
कोंबडा बांग देतो
गाव सारं जागतं
भल्या पहाटे उठून
गुरंढोर हंबरून बोलतं
वासुदेव येवून
कुळाचा जागर करतो
टाळचिपळीच्या गजरात
राम नाम घेतो
विहीरीवरच्या रहाटणीने
कर कर वाजायचं
पाणी भरता भरता
लेकीसुनेनं गाणं गुणगुणायच
सडा घातल्या अंगात
रांगोळी लाजून बसते
तांबड फुटल्यावर
तुळस डोकावून पहाते
पान्हा सरसर पाझरतो
दुध फेसाळून येते
दही लोण्याची घागर
गावभर फिरते.
खूडा भाकरीचा घमघमाट
पोटाला चिमटा घेतो
न्याहरी डोक्यावर घेऊन
कारभारी शेताची वाट धरतो
सांज रातीला दिवे बघा
देवघरात लागतात
मातीचा गुलाल उधळून
पाय घराकडे पळतात
गर्द झाडांच्या कवेत
माझं गाव छान दिसते
इवलशी नदी माझ्या
गावाला प्रदक्षिणा घालते
गावाच्या वेशी बाहेरून
मंदिराचा कळस दिसतो
मंदिराचा ध्वज कसा
गाव आल्याचं सांगतो
माझ्या गावाकडची वाट
गावाला आढेवेढे घेते
येताजाता कितीदा
आपल्या माणसांची वाट बघते
खळखळ वाहते पाणी
सुगंध मातीचा दरवळतो
पारावरचा मारोती
माझ्या गावाच रक्षण करतो
गाव माझे लयी भारी
किती गुणगान गावे
चिमण्या पाखरांच्या थव्याने
रोज एक नवे गीत गावे
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसूमाई)*
९४२२८९२६१९
९५७९११३५४७

