तिरवडे येथे दिवसा घरफोडी : दिड लाखांचे दागिने चोरीला
वैभववाडी
अज्ञात चोरट्यांनी गजानन परशुराम इंदुलकर रा. तिरवडे तर्फ सौंदळ यांचे भरदिवसा घर फोडून अडीच तोळ्याचे दागिने लंपास केले आहेत. हा प्रकार शनिवारी १ फेब्रुवारीला दुपारी घडला. पोलीसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तिरवडे येथील इंदुलकर दांपत्य गावी व मुंबई येऊन जाऊन असत. हे दांपत्य ३ डिसेंबरला गावी आले होते. शनिवारी १ फेब्रुवारीला वाडीत गणेश जयंतींचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला पती पत्नी दोघेही सकाळी ११ वाजता गेले होते. कर्यक्रम आटपून दुपारी तीन वाजता ते घरी परतले. तेव्हा घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी घरातील बेडरूममध्ये जावून पाहीले असता तेथील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यांनी बेडमध्ये असेलेली बॅग पाहीली असता त्यातील दागिने सापडून आले नाहीत. या बॅगेत ठेवलेल्या सोन्याच्या दोन तोळ्याच्या चार बांगड्या, अर्धा तोळ्याचे कानातल्या पट्या व एक हजार रुपये असा सुमारे दिड लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. त्यांनी या प्रकरणी आज पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, उपनिरीक्षक किरण घाग, रणजित सावंत यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी पोलीसांनी अज्ञांताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास पोलीस रणजित सावंत करीत आहेत.