कुडाळ :
आजगाव (सिंधुदुर्ग) येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचा एकावन्नावा मासिक कार्यक्रम नुकताच ओरोस बुद्रुक (सिंधुदुर्ग) येथील रावसाहेब अनंत शिवाजी देसाई (टोपीवाले) वाचनालयात संपन्न झाला.
या कार्यक्रमांतर्गत ‘स्मरण जयवंत दळवींचे’ या विशेष आयोजित कार्यक्रमात साहित्यप्रेरणा कट्ट्याचे समन्वयक तथा नामवंत कवी विनय सौदागर,जयवंत दळवी यांचे पुतणे तथा उद्योजक सचिन दळवी,गोव्यातील साहित्यिक तथा निवृत्त प्राचार्य गजानन मांद्रेकर व साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या ज्येष्ठ सदस्य सरोज रेडकर यांनी कै.जयवंत दळवी यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंवर सविस्तर विवेचन केले.
सचिन दळवी यानी जयवंत दळवींच्या व्यक्तिगत आयुष्यावर प्रकाश टाकला.त्यांचा मितभाषी परंतु चौकस स्वभाव,त्याना आपल्या आरवली गावाविषयी असलेले आत्यंतिक प्रेम,वेतोबावरील श्रद्धा इत्यादी संदर्भात माहिती देऊन,मासळी हा त्यांचा आत्यंतिक जिव्हाळ्याचा विषय असल्याचे सांगितले.
प्राचार्य गजानन मांद्रेकर यानी कै.जयवंत दळवी यांच्या लेखनविषयक भूमिकेसंदर्भात विवेचन केले. ‘चक्र’ या पहिल्याच कादंबरीमधील आणि इतर नाटकांमधील अश्लीलतेबाबत उठलेल्या वादळावर दळवींनी धैर्याने केलेली मात,कथा-कादंबऱ्यांवरून लिहिलेल्या नाटकांबाबत त्यांची भूमिका,कथानकास आवश्यक तिथेच येणारी धीट वर्णने,त्यांच्या कथा-कादंबऱ्यांमधील मनोरुग्ण,वयोवृद्ध जोडपी,बाहेरून बरी वाटणारी,परंतु विध्वंसक विचारांची माणसे या संदर्भात सोदाहरण विवेचन करून, कोकणातील माणसांचं मनोविश्लेषणात्मक वर्णन हे दळवी यांच्या लेखनाचं खास वैशिष्ट्य असल्याचे शेवटी सांगितले.
सरोज रेडकर यानी दळवी यांच्या निवडक कथांसंदर्भात विवेचन केले.
विनय सौदागर यानी जयवंत दळवी यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये सांगताना दळवी यानी स्वतः अनुभवल्याशिवाय काहीही लिहिले नसल्याचे सांगितले.त्यांच्या साहित्यात वास्तवाचे प्रत्ययकारी चित्रण असल्यानेच ते वाचकांना आणि नाट्यरसिकांना भावते असेही ते म्हणाले.आपल्या व्यक्तिगत वैचारिक भूमिकेची आणि लेखनाची दळवी यानी कधीच गफलत होऊ दिली नसल्याचे सांगून त्यानी ‘निराळा’ या कथेतील हिंदुत्ववादी तरुणाचे उदाहरण दिले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रंथालयाच्या ग्रंथपाल नेहा कशाळीकर यानी स्वागत व प्रास्ताविक केले.विनय सौदागर यानी साहित्य प्रेरणा कट्ट्याविषयी माहिती देऊन सदस्यांचा परिचय केला.हे वर्ष जयवंत दळवी यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने या वर्षीचे साहित्य प्रेरणा कट्ट्याचे सर्व कार्यक्रम जयवंत दळवी यांना समर्पित केल्याचे त्यानी सांगितले.
कार्यक्रमास खास उपस्थित असलेले सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालयाचे मुख्याधिकारी सचिन हजारे यानी साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढून कट्ट्याला शुभेच्छा दिल्या.विनय सौदागर यानी शेवटी ऋणनिर्देश केला.
कार्यक्रमास साहित्य प्रेरणा कट्ट्याचे कार्यकर्ते प्रकाश मिशाळ, ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश जैतापकर,उपाध्यक्ष संजय परब,कार्यवाह रोहिदास राणे,तसेच संचालक प्रभाकर सावंत,रमाकांत परब,नामदेव मठकर तसेच वर्षाराणी अभ्यंकर,ग्रंथालयाच्या साहाय्यक वैष्णवी परब,सत्यवान राणे,प्रमोद नंदनवार,मोहन तिरोडकर उपस्थित होते.
(छायाचित्र:आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या ओरोस येथील रावसाहेब शिवाजी अनंत देसाई (टोपीवाले) ग्रंथालयात आयोजित एकावन्नाव्या मासिक कार्यक्रमात सहभागी रसिक वाचक.सोबत आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचे सदस्य व ग्रंथालयाचे पदाधिकारी)