राजवाडा येथे लोककला महोत्सवामध्ये ‘सावंतवाडीच्या
अष्टनायिका’ या भरतनाट्यम कार्यक्रमाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद.
सावंतवाडी
लोककला विभाग श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी यांच्या वतीने राजवाडा सावंतवाडी येथे आयोजित लोककला महोत्सवामध्ये विविध दशावतारी नाट्य मंडळांनी आपले प्रयोग सादर केले त्यासोबतच सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या संकल्पनेतून आयोजित भरतनाट्यम नृत्यांगन अकॅडमी ऑफ फाईन आर्ट मुंबई यांचा ‘सावंतवाडी अष्टनायीका’ हा भरतनाट्यम कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन युवराज्ञी सौ श्रद्धाराजे भोंसले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या चेअरमन राणीसाहेब सौ.शुभदादेवी भोंसले, संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमराजे भोंसले, संस्थेचे सहसंचालक अॅड. शामराव सावंत, सदस्य श्री जयप्रकाश सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल, प्रा. दिलीप गोडकर, नृत्यांगन अकादमी ऑफ फाईन आर्ट च्या संचालिका सौ अंजना डोंगरे, प्रमुख नृत्यांगणा सावंतवाडीची सुकन्या अनुजा
प्रभूकेळुस्कर तसेच भरतनाट्यम कलाकार निधी डोंगरे ,जुई घाडगे, अश्विनी गोपाल, वृषाली मोघे, कृपाली संगोई, कीर्तना नायर तसेच नृत्यरसीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भरतनाट्यम कार्यक्रमात नृत्याच्या माध्यमातुन सावंतवाडीच्या राजघराण्याच्या राण्यांच्या भावनात्मक संघर्षाचा वेध घेतला गेला. राजघराण्यातील स्त्रियांनी वारसा, परंपरा राखून प्रेम, कर्तव्य सहनशक्तीच्या सीमा पार करीत जीवन संघर्ष व पराक्रम केला त्यांचा जीवन संघर्ष या भरतनाट्यम कार्यक्रमातून सादर करण्यात आला .हा भरतनाट्यम कार्यक्रम नृत्यांगन अकादमी ऑफ फाइन आर्ट सांताक्रुज मुंबई यांच्यावतीने सादर करण्यात आला. संचालिका सौ अंजना डोंगरे यांनी 1992 मध्ये नृत्यांगन अकादमी फाईन आर्ट ची स्थापना केली व तरुण मनाना भरतनाट्यम चे ज्ञान देत भारतीय संस्कृती व वारशाचे जतन करण्याचे इच्छेने त्यांनी या संस्थेची स्थापना केली. या कार्यक्रमातील प्रमुख नृत्यांगना अनुजा प्रभुकेळुसकर या मूळच्या सावंतवाडीच्या आहेत. सावंतवाडीतील त्यावेळचे प्रसिद्ध डॉक्टर भाऊसाहेब परुळेकर यांची ती नात. भरतनाट्यम सोबतच जॅझ, बॅले नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. मराठी बाणा ते फेमीना मिस इंडिया सारख्या हाय प्रोफाईल इव्हेंट साठी तीने कोरिओग्राफी केलेली आहे झी टीव्ही, झी युवा, स्टार प्रवाह आणि अमेझॉन प्राईम वरील निर्मितीमध्ये तिने काम केलेले आहे. बॉलीवूड सेलिब्रिटी साठी योग प्रशिक्षक म्हणून ती काम करते. मँचेस्टर युनिव्हरसिटी मध्ये तिने मास्टर्स केलेले आहे. त्यांच्या उत्कृष्ट भरतनाट्यम सादरीकरणाला उपस्थित रसिकांनी खूप दाद दिली. व्यासपीठावर उपस्थित संस्थेच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ.शुभदादेवी भोंसले, विश्वस्त युवराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोंसले, युवराज लखमराजे भोंसले यांनी सर्व कलाकारांचे कौतुक केले त्यानंतर सावंतवाडीतील भरतनाट्यम नृत्यांगना स्वरांगी संदीप खानोलकर हिने ‘शिवकीर्तन शंकरश्री गिरी’ हा भरतनाट्यम प्रयोग सादर केला. स्वरांगी ही सावंतवाडीची सुकन्या असून कला अकादमी गोवा च्या प्राध्यापिका डॉ. सपना नाईक यांच्याकडून नृत्याचे धडे घेतले आहेत. झी एंटरटेनमेंट आणि गिव्ह इंडिया फाउंडेशन यांच्यावतीने तिला चार लाखाची स्कॉलरशिप प्रदान करण्यात आली आहे .एनसीसीच्या माध्यमातून तिने दिल्ली येथे गणतंत्र सोहळ्यास उपस्थिती दर्शविली होती.भोपाळ येथे झालेल्या कला महोत्सवात महाराष्ट्र राज्याचे तिने प्रतिनिधीत्व केले आहे. तिच्या भरतनाट्यम सादरीकरणाचेही सर्वानी कौतुक केले.
सुत्रसंचालन डाॅ.गणेश मर्गज व कु. निकीता आराबेकर यांनी केले तर आभार प्रा.दिलीप गोडकर यांनी मानले.