_*राज्यस्तरीय टेक्निकल क्विझमध्ये भोसले इन्स्टिटयूट प्रथम…..*_
_*एसआयटी, इचलकरंजी द्वितीय तर एसजीएम, गडहिंग्लज तृतीय……*_
_महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ पुरस्कृत राज्यस्तरीय टेक्निकल क्विझ कॉम्पिटिशन यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे पार पडली. मेकॅनिकल शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या स्पर्धेत मुंबई व पुणे विभागातील एकूण अठरा तंत्रनिकेतन संस्था सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेचे उदघाटन संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ.रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले, शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरीचे अधिव्याख्याता व परीक्षक अमोल धांडे, सचिन लांजेकर, मेकॅनिकल विभागप्रमुख अभिषेक राणे उपस्थित होते._
_स्पर्धा तीन टप्प्यात घेण्यात आली. पहिला टप्पा बहुपर्यायी चाचणीचा होता. यातून दहा संघ निवडण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात जनरल राउंड, रॅपिड फायर, व्हिज्युअल राउंड अशा फेऱ्या घेण्यात आल्या. अंतिम फेरीत पाच संघ पोचले. यावेळी बझर राउंड घेण्यात आले. यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या सुयोग देसाई व पूजा कोकरे यांनी विजेतेपद पटकावले. शरद इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, यड्राव-इचलकरंजी येथील सतीश कुमार यादव आणि रितेश कुमार या जोडीने उपविजेतेपद प्राप्त केले. संत गजानन महाराज पॉलिटेक्निक, महागांव-गडहिंग्लज येथील शुभम देसाई व नीतीश राय कुमार यांनी तृतीय क्रमांक मिळवला._
_विजेत्या संघाला पंधरा हजार रोख, ट्रॉफी व प्रमाणपत्र, उपविजेत्यांना दहा हजार रोख, ट्रॉफी व प्रमाणपत्र आणि तृतीय क्रमांकाला पाच हजार रोख, ट्रॉफी व प्रमाणपत्र अशी बक्षिसे प्रदान करण्यात आली. संस्थेचे सचिव संजीव देसाई यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. स्पर्धेचे सूत्र संचालन मिलिंद देसाई तर आभार प्रदर्शन स्वप्नील सावंत यांनी केले. ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी उपप्राचार्य गजानन भोसले व विभाग प्रमुख अभिषेक राणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मेकॅनिकल विभागाने मेहनत घेतली._