You are currently viewing गंजिफासह ”दशावतार” कला जगभरात पोहचवणार…

गंजिफासह ”दशावतार” कला जगभरात पोहचवणार…

गंजिफासह ”दशावतार” कला जगभरात पोहचवणार…

सांस्कृतिक मंत्री शेलारांचं प्रतिपादन

सावंतवाडी :

लोककला जीवंत राहण्यासाठी राजाश्रय मिळण गरजेचे असतं. युवराज लखमराजे भोंसले यांनी दशावतार कलेला तो राजाश्रय देत राजधर्माच पालन केलं. माहिती तंत्रज्ञानाच्या जगात गंजिफासह दशावतार कला जगासमोर मांडण्याची गरज आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असून दशावतार कलेला अग्रस्थानी आणणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री अँड. आशिष शेलार यांनी केल. राजवाडा येथे आयोजित लोककला दशावतार महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

सावंतवाडी राजघराण व श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या लोककला विभागातर्फे २६ जानेवारी पर्यंत लोककला दशावतार महोत्सव २०२५ आयोजित करण्यात आला आहे. याचा शुभारंभ सांस्कृतिक मंत्री अँड आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी नगरसेवक मनोज नाईक, अजय गोंदावळे, राजू राऊळ, अँड. शामराव सावंत, डॉ. सतिश सावंत, प्राचार्य दिलीप भारमल, भाई कलिंगण, शरद मोचेमाडकर, जयप्रकाश सावंत आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री अँड. आशिष शेलार म्हणाले, लोककलांना व्यासपीठ देण ही कल्पना खूप मोठी आहे. तुम्ही लोक सौभाग्यशाली आहात अन् युवराज कौतुकास पात्र आहेत. महाराष्ट्रात लोककला मोठी आहे. त्या कलेच महत्व खूप मोठं आहे‌. जगाला हेवा वाटेल अशी रत्न महाराष्ट्रातील लोककलेत असून त्यातील एक दशावतार आहे‌. राजाश्रय मिळत नाही तोवर कला जीवंत राहण्यास अडचणी येतात. मात्र, या कलेला राजाश्रय देण्याच काम राजघराण करत आहे हे फार महत्त्वाचे आहे. लोककला समृद्ध आहे‌, मनोरंजन हा लोककलेचा आत्मा असून लोककल्याण व लोकशिक्षण त्यात आहे. लोककला जीवंत ठेवण्यासाठी दिलेलं राजघराण्याच योगदान हा राजधर्म आहे. सांस्कृतिक मंत्री झाल्यानंतर पहिलच उद्घाटन या लोकोत्सवाच केलं‌. उद्योजक, उद्यमशिलता करणारा हा महोत्सव आहे‌. गंजिफा, दशावतार या कला जगासमोर मांडण्याची गरज आहे. माहिती तंत्रज्ञान युगात दशावतार कला अग्रस्थानी आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे असा विश्वास मंत्री शेलार यांनी व्यक्त करत युवराज लखमराजे भोंसले यांना यासाठी सोबत येण्याचं आवाहन केलं.

‘कलादालना’साठी युवराज लखमराजेंची मागणी

युवराज लखमराजे भोंसले म्हणाले, दोन वर्ष आम्ही लोककला महोत्सव घेत असून हे तिसरं वर्ष आहे. दरवर्षी लोकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. दशावतार कलेवर प्रेम करणारी लोकं या ठिकाणी आहेत. सांस्कृतिक मंत्री अँड. आशिष शेलार या महोत्सवास उपस्थित राहीले ही आनंदाची गोष्ट आहे. राजघराण्यांन नेहमीच कलाकार व कलावंतांना नेहमीच प्रोत्साहन दिल्याचे उद्गार युवराज लखमराजे यांनी काढले. तसेच गंजिफा कलेचं कलादालन या ठिकाणी उभारणार असल्याचे सांगत जिल्ह्यातील कलावंतासाठी व प्रशिक्षणासाठी कलादालनाची मागणी त्यांनी मंत्र्यांकडे केली.

मनोगतात युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले म्हणाल्या, ही कला लोकांनी जपलेली कला आहे. दशावतार ही गर्वाची गोष्ट कोकणवासियांसाठी आहे. या कलेला आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेण्याच एक स्वप्न आहे. दशावतार फक्त नाटक नसून त्यात आमच्या भावना आहेत. तसेच अतुल काळसेकर यांनी युवराज लखमराजे यांनी लोककलेला राजाश्रय देण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे उद्गार काढले. यानिमित्ताने कलावंत कृष्णा देसाई यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश मर्गज यांनी तर आभार प्रा. दिलीप गोडकर यांनी मानले. यावेळी माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, राजू मसुरकर, दादा मडकईकर, साक्षी वंजारी, समिर वंजारी, देव्या सुर्याजी, प्रतिक बांदेकर आदींसह शेकडोंच्या संख्येने नाट्यरसिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा