वेंगुर्ले :
भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग यांच्या वतीने बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला येथे आयोजित केलेल्या संविधान गौरव यात्रेच्या निमित्ताने परिसंवाद संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन संविधानाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. एम. बी. चौगले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळू देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवडळकर, ता. सरचिटणीस बाबली वांगणकर, मच्छिमार नेते वसंत तांडेल, जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव, मा. नगरसेवीका शीतल आंगचेकर, वक्ते प्रा वैभव खानोलकर आणि प्रा. व्ही.पी. नंदगिरिकर, कनिष्ठ विभागाचे प्रा.सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वैभव खानोलकर यांनी संविधानाच्या ऐतिहासिक महत्त्वावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले, “भारतीय संविधानाला भारतीय संविधान केवळ कायद्याचे एक पुस्तक नाही, तर ते आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात समानता, स्वतंत्रता आणि बंधुतेच्या मूल्यांचा आधार आहे.” त्यांनी पुढे सांगितले, “संविधानाने आम्हाला समान हक्क दिले आहेत, पण ते हक्क योग्य रीतीने वापरणेही आवश्यक आहे. आपली जबाबदारी आणि कर्तव्ये देखील संविधानाने ठरवलेली आहेत.”
प्रा.नंदगिरीकर यांनी संविधानाच्या रचनात्मक भागावर सखोल चर्चा केली. त्यांनी स्पष्ट केले की, “संविधानाचा उद्देश केवळ कायदेशीर अधिकारांचे संरक्षण करणे नाही, तर ते आपल्या समाजाच्या प्रत्येक घटकाच्या समानतेचा, मुक्ततेचा आणि बंधुतेचा आदर्श प्रदान करते. भारतीय समाजाच्या विविधतेला स्वीकारताना संविधान सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवते आणि प्रत्येक नागरिकाला समान संधी व न्याय मिळवून देण्याचा प्रपंच सुरू करतो.”
कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थितीत होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रा .डॉ.सचिन परुळकर यांनी तर आभार बाळू देसाई यांनी मानले.