राज्य शिक्षक भारती संघटनेच्या त्रैवार्षिक अधिवेशनात महत्त्वपूर्ण ठराव
कुडाळ :
महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती संघटनेचे त्रैवार्षिक अधिवेशन ओरोस येथील इच्छापूर्ती कार्यालयात पार पडले. या अधिवेशनाचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, संघटनेचे राज्य संघटक किसन दुखंडे यांच्या हस्ते पार पडले. या अधिवेशनात शिक्षण सेवक कालावधी रद्द करा, किंवा कालावधी कमी करून मानधन वाढ करा हा महत्त्वपूर्ण ठराव मांडण्यात आला. एकूण २१ ठराव या अधिवेशनात मांडण्यात आले.
या अधिवेशनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांनी ठराव वाचन केले. या अधिवेशनाचे वैशिष्ट्य म्हणजे शिक्षक भारती संघटनेने पहिलाच ठराव शिक्षण सेवकांच्या हक्कासाठी मांडला. शिक्षण सेवक कालावधी रद्द करावा किंवा शिक्षण सेवकाचा कालावधी कमी करून मानधन वाढ करावी हा महत्त्वपूर्ण ठराव लक्षवेधी ठरला. शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करणे. राज्यातील पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना तात्काळ पदवीधर वेतनश्रेणी देण्यात यावी. प्रधानमंत्री पोषणशक्ती योजना अंतर्गत शाळांना नियमित पुरवठा करणे बाबत. शालेय परिसर व स्वच्छतागृह यांच्या स्वच्छतेसाठी नियमित मदतनीस नियुक्त करणेबाबत. २००५ च्या अधिसूचनेनुसार सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे. शालेय वीज शासनामार्फत भरणे. सेवा सातत्य साठी पात्र शिक्षकांना वेतन संरक्षणाचा लाभ देणे. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणे.
२००५ पूर्वीच्या शिक्षण सेवकांची DCPS खाती जमा असलेली मासिक कपात व सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम भविष्य निर्वाह निधी खात्यात वर्ग करण्याबाबत. निमशासकीय वस्तीशाळा शिक्षकांचे नियुक्ती शासन दिनांकानुसार ग्राह्य धरून त्यांना फरक देण्यात यावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ विना विलंब मिळणे बाबत. गटशिक्षणाधिकारी गटविस्तार अधिकारी केंद्रप्रमुख पदे भरण्यात यावी. आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना देय असणारी वेतन वाढ लागू करण्यात यावी. महाराष्ट्र दर्शन व प्रवास भत्ते देण्यासाठी शासनामार्फत निधी उपलब्ध करून द्यावा. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे बालकला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचे आयोजन ३१ जानेवारी २०२५ पूर्वी करावे. शिक्षकांची अशैक्षणिक कामे रद्द करावीत. विद्यार्थ्यांना वेळ देऊन त्यांच्या गुणवत्तेत वाढ होण्यासाठी प्रशासकीय कामांसाठी आठवड्यातून एकच दिवस देण्यात यावा. पात्र शिक्षकांना निवड वेतनश्रेणी देण्यात यावी. शिक्षण सेवकांना प्रसूती रजेचे लाभ शासन निर्णयानुसार देण्यात यावेत.
यावेळी बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले की, या अधिवेशनात मांडण्यात आलेले २१ ठराव हे महत्त्वपूर्ण ठराव असून पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून शासनापर्यंत हे ठराव पाठवू तसेच शिक्षण सेवकांच्या मानधन वाढी संदर्भात निश्चितच ठोस भूमिका घेऊ असे आश्वासन देत शिक्षण क्षेत्रातील कामाचे कौतुक केले.
दरम्यान शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शाळांना आदर्श शाळा तर शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी नव्या जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अधिवेशनाचे प्रास्ताविक मंगेश खांबाळकर यांनी केले. सूत्रसंचालन सत्यजित वेतूर्लेकर यांनी केले तर आभार दिनकर शिरवलकर यांनी मानले. या अधिवेशनाला जिल्ह्यातून शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.