ठाणे :
तेरा वर्षानंतर जीवनविद्या मिशनने ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळा ठाण्यातील रेमंड ग्राउंड येथे घडवून आणला. शनिवार दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजता या कार्यक्रमाला सुरुवात झाली. हरिपाठाचा उपासना यज्ञ आणि संगीत जीवनविद्या संपन्न झाल्यावर ज्ञानगुरू प्रल्हाद वामनराव पै यांनी आपल्या जनप्रबोधनाला सुरुवात केली. यावेळी ठाणे शहरातील सन्माननीय पाहुणे आणि ठाणेकरांनी उत्साहात ह्या जीवन विद्येचे स्वागत केले. सर्व सुखी सर्व भूती हा प्रल्हाद पै यांच्या प्रबोधनाचा विषय होता.
या प्रबोधनात ज्ञानगुरू प्रल्हाद पै यांनी सांगितले.
सद्गुरूंनी लोकांना सुखी करण्याचा संकल्प केला होता. तो संकल्प आम्ही मनात बाळगून सद्गुरूंचे कार्य पुढे नेत आहोत. जीवन विद्येचा परमार्थाचा अर्थ वेगळा आहे. जे परम उपयुक्त ते म्हणजे परमार्थ असा हा अर्थ आहे. म्हणून ही जीवनविद्या अंतरंगात पूर्णपणे उतरवून घ्या तर जीवन सुखी आणि समाधानी होईल. आपण सामान्य माणूस म्हणून नुसते जीवन जगत असतो. ते जीवन कसे सुखाने जगावे हे आपल्याला कळत नाही. जीवन विद्या त्या आपल्या खऱ्या जीवनाला मार्गदर्शीत करते. पैशाने सुखसोयी विकत घेता येतात मात्र सुख समाधान पैशात येत नाही. त्यासाठी सद्गुरु वामनराव पै यांचे विचार अंगीकृत करावे लागतात. पापाचे धनी होऊन मिळवलेला पैसा कधीच माणसाला सुख देत नाही. असे सुद्धा प्रल्हाद पै यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, कंपनी चालवणाऱ्या माणसाने आपल्या कामगारांच्या आरोग्याचा विचार करावा. घर चालवणाऱ्या व्यक्तीने कुटुंबाचा परिवाराचा विचार करावा पण तसे अजिबात केले जात नाही. म्हणून घराघरात प्रॉब्लेम निर्माण झाले आहेत. या प्रॉब्लेम मधून आपली सोडवणूक करायची असेल तर मन:शांती मिळवण्यासाठी सर्वांना जीवनविद्येत आले पाहिजे तेव्हाच आपली अहंकाराची शेपूट गळून पडेल. म्हणून वेळात वेळ काढून आपण सर्वांनी जीवनाचे विचार मनात उतरवून घ्यावेत. कारण वेळात वेळ काढून सद्गुरुनी लोकांचे कल्याण साधले आहे. एवढे बोलून ज्ञानगुरू प्रल्हाद पै यांनी हे प्रबोधन पूर्ण केले व लोकांना दुसऱ्या दिवशीच्या प्रबोधनाची ओढ लावली.
रुपेश पवार पत्रकार