You are currently viewing खेळ तुमचा आणि जीव जातो आमचा..

खेळ तुमचा आणि जीव जातो आमचा..

*खेळ तुमचा आणि जीव जातो आमचा..*

*मालवण येथे पतंगाच्या मांज्यात अडकला पक्षी*

मालवण:

मालवण ही पर्यटक नगरी. याच मालवण नगरीत हवेत उडणाऱ्या पतंगाचा मांजा पाय व पंखात अडकून एक पक्षी मैदानावर कोसळला होता आणि काही भटके कुत्रे सुद्धा त्या पक्षाचे लचके तोडण्यासाठी अंगावर धावून जात होते. यावेळी मालवण येथील हॉटेल चैतन्यचे मालक आणि व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने मांजा अडकून जखमी असलेल्या पक्ष्याला पकडून कुत्र्यांपासून वाचविलेच परंतु पाय व पंखातून अडकलेला मांजा सोडवून पक्ष्याला जीवदान दिले.
संक्रांत सणाच्या निमित्ताने मुले, मोठी माणसे सुद्धा पतंग उडवित असतात. परंतु, पतंग हवेत उंच गेल्यावर काही वेळा झाडांमध्ये त्याचा मांजा अडकतो आणि तुटतो किंवा पक्षी उडताना त्यांना पांढऱ्या रंगाचा मांजा दृष्टीस पडत नाही..आणि पतंगाचा मांजा पक्ष्यांच्या पंखात, गळ्यात, पायात अडकून पक्षी जायबंदी होतात तर काही वेळा प्राणास ही मुकतात. त्यामुळे पतंग प्रेमींनी देखील काळजी घेणे आवश्यक आहे.
वर्षातील पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत. संक्रांत सणाच्या दिवशी पतंग उडविण्याची प्रथा आहे. या दिवसात हवेत असलेल्या गारव्याने अनेक छोटे मोठे रोग उत्पन्न होतात. अशावेळी उन्हात पतंग उडविल्याने अंगात गर्मी, ऊब निर्माण होते. सूर्याची किरणे यावेळी औषधाचे काम करतात. जेणेकरून सर्दी, खोकला सारखे आजार दूर पळतात. म्हणून भारतात संक्रांत सणाच्या दिवशी पतंग उडविण्याचा आनंद घेतला जातो. परंतु पतंग झाडात अडकला की पतंग प्रेमी मुले मांजा तिथेच सोडून जातात. हा मांजा अनेकदा पक्ष्यांना विहार करताना त्रासदायक ठरतो. पंखात, पायात मांजा अडकून पक्षी जीवास मुकतात, किंबहुना माणसे देखील त्याने जखमी होतात. त्यामुळे पतंग उडविताना मजा आनंद घेण्याबरोबरच पतंगाचा मांजा सांभाळणे देखील महत्त्वाचे आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा