राष्ट्रीय युवा दिन व युवा सप्ताहाचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी
केंद्रशासनाच्या महत्वाकांक्षी योजनेव्दारा संपूर्ण भारतामध्ये स्वामी विवेकानंद यांची जन्म दिवस दि. 12 जानेवारी युवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो व त्या निमित्ताने दि. 12 ते 19 जानेवारी हा कालावधी युवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी दिली.
युवकांचा सर्वांगिण विकास करणे, राष्ट्रीय व सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी युवकांना उत्साहित करणे त्या करिता युवकांच्या सर्वागिण विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करणे. युवकांमध्ये व्यक्तीमत्व व नेतृत्व गुण विकसीत करणे, राष्ट्र उभारणी मध्ये युवकांची महत्वपूर्ण भूमिका असल्याने सामाजिक उपक्रम आयोजन, नियोजनामध्ये युवकांचा सहभाग वाढविणे, युवकांनी केलेल्या कार्याचा यथोचित गौरव करणे, शारीरिक क्षमता व व्यायामाची आवड निर्माण करणे.
तसेच खेळाकडे आकर्षित करण्यासाठी स्पर्धाचे आयोजन करणे, चर्चासत्र, परिसंवाद, युवा मेळावा, राष्ट्रीय एकात्मता उपक्रम माध्यामातून युवकांना प्रोत्साहन देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. देशाची सर्वात मोठी शक्ती ही युवा शक्ती असुन युवकांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना विकसीत करण्यासाठी व 15 ते 29 वर्ष वयोगटातील युवकांसाठी एक संदेश या माध्यमातून देण्याचा प्रयत्न या योजनेव्दारे करण्यात येतो. युवकांनी स्वामी विवेकानंदांचा आदर्श घेवून कार्य करावे. त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव होवून त्यांना सतत कार्य करण्याची प्रेरणा मिळावी म्हणून दरवर्षी महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देवून गौरविण्यात येते.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत राष्ट्रीय युवा दिन युवा सप्ताह निमित्त कार्यक्रम करण्याचे निश्चित झालेले आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा/महाविद्यालय/संस्था यांनी आपल्या स्तरावर दि. 12 ते 19 जानेवारी 2025 या कालावधीत या सप्ताहाचे कार्यक्रम राबवून शासनाचा उपक्रम यशस्वी करण्यास सहकार्य करावे. आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा अहवाल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधूदुर्ग यांना सप्ताह समाप्ती नंतर सादर करण्यात यावा. सदर कार्यक्रम प्रसंगी युवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्र. जिल्हा क्रीडा अधिकारी सिंधुदूर्ग विजय शिंदे यांनी केले आहे.