You are currently viewing ‘तिच्या न बऱ्या होणाऱ्या जखमा’

‘तिच्या न बऱ्या होणाऱ्या जखमा’

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम कथा*

 

*’तिच्या न बऱ्या होणाऱ्या जखमा’*

 

चार आठ दिवस झाले तरी सुनीता कामावर येत नव्हती मालती बाई सारख्या फोन करायच्या पण फोन कोणी घेत ही नव्हते आणि कोणी करतही नव्हते तिच्याशी संपर्क साधावा तर कसा!काही कळेना एन सणासुदीच्या दिवशी ही सुनीताने दांडी मारली घरात बघावं तर मनमन तसं काम पडलीत रोज सकाळी उठा घराची झाडपुस करा भांडी घासा स्वयंपाक करा आणि धावपळ करत ऑफिसला जा.शि बै एका बाईमुळे घरातल्या सर्वांची घालमेल होतेय. नाही यायचं तर तसं सांगायला नको का? एकतर हवा तेवढा पगार द्यायचा शिवाय जास्तीच काम केलं तर त्याचे पैसे वेगळे द्यायचे सार काही मनासारखं करूनही ही सुनीता ना नुसत्या दांड्या मारते,निदान फोन तरी उचलायचा,कोन काय म्हणतं यांच्याशी जराही देणंघेणं नाही ह्या बाईला! काय बाई म्हणावी हिला.घराची आवर सावर करता करता मालती बाई सारख्या बडबड करत होता.त्यात आणखी नवऱ्याचा आदेश मालती हे आन ते दे.सार घर फिरून फिरून गेली आठ दिवस मालती बाईंचा चांगलाच व्यायाम होत असे. ही मोलकरीण आली नाही म्हणून मालतीबाईंची इतकी चिडचिड वाढली की त्या मोलकरीणचा राग घरच्यांवर निघायचा.त्यात आणखी सुहासच्या कोरड्या सहानुभूतीची भर.”आई नको ना गं तू अशी चिडचिडेपणा करू,तू हसतखेळत असली ना की खूप बरं वाटतं गं.पण ती सुनीता घरातली कामं करायला येत नाही म्हणून तिचा राग आमच्या वर कशाला काढतेस,जाऊ दे ना दुसरी बघ”

“हो आता तेव्हढच काम राहील दुसरी मोलकरीण बघायची,दुसरी आली की तिनेही पहिली सारखंच करायचं आणि मग तिसरी बघायची काय तर म्हणे दुसरी बघ स्वतः मात्र जराही हातभार लावायला नको. तुम्ही बाप बेट्यांनी फक्त उपदेश द्यायचा पण मदत कारायची नाही.खरचं आम्हा बायकांची घालमेल मात्र तुम्हां पुरूषांना जराही बघवत नाही.पसारा करायला पुढे पण मदतीला मात्र जराही हातभार लावायला नको.सारे पुरूष जात एक सारखेच.बाई म्हणजे काय घाणीचा बैलच ना!.तिनेच फक्त एकटीने मरमर करायची आणि तुम्ही निवांत रहायचं आणखी काय”

“अगं मालती उगाच काही तू गैरसमज करून घेऊ नकोस की पुरुषांना बायकांची काळजी नसते,काळजी असते पण आम्ही दाखवत नाही ती मनात ठेवतो दाखवत बसतं नाही अगं नवऱ्याच प्रेम बायकोला नाही कळायचं,नवरा नेहमीच बायकोच्या कर्तृत्वावर भारी भरतो.बायको आनंदात दिसली म्हणजे नवऱ्याचा सर्व थकवा निघून जातो. बायकोच्या चेहऱ्यावरच्या वेदना,काळजी न बोलता नवऱ्याला कळतात हो,पण बायका काही समजून घेत नाही.त्यांना असं वाटतं की.नवऱ्याने बायकोचे हातपाय चेपून द्यायला हवेत”

“चेपून दिले तर त्यात काय बिघडले.नवरा बायको एकमेकांची पाठराखी असतात सुख,दुःख,आनंद घर संसार आणि घरातली काम यावर समान हक्क असतो जे काही असेल ते दोघी मिळून करायची असतात पण नाही तुम्हा पुरूषांच काय दुरून डोंगर साजरे करायचं बस.हातात दिलेल्या वस्तू तिथल्या तिथे पडून राहतात पण जागेवर जाऊन ठेवणार नाही.बायको सोबत नवऱ्याने काम करायची तयारी दाखवली ना तर मोलकरीण लावायची गरज पडणार नाही.”

अशात दारावरची बेल‌ वाजते तर काय समोर सुनीता उभी.तिच्या कडे बघून तर मालती बाई थक्कच झाले मालती बाईंचे मिस्टर तर खूर्ची वरून उठून सुनीता कुडे धावते आले तिची अशी अर्धमेली अवस्था पाहून घरातल्यांना तर आभाळ कोसळल्या सारखे वाटायला लागले.आठ दिवस सुनीता आली नाही म्हणून मालतीबाई ने तिच्यावर राग काढला पण सुनीता गेली दहा वर्षांपासून मालतीबाई कडे कामाला होती सुनीता म्हणजे घरातली सदस्यच ना सायलीच्या लग्नाची सारी जबाबदारी एकटी सुनीताने पार पाडली अगदी सायलीच लग्न जन्मल्यापासून तर ती सासरी जाई पर्यंत सुनीता ने कामात जराही काचकुच केली नाही.नाही म्हणजे काय दिवस भर इथेच थांबायची ना रात्रीच घरी जायची.सायलीच्या लग्नाला पंधरा दिवस राहीले होते तेव्हा सुनीताला मुक्कामाल ठेवून घेतले.ती कुठल्याच कामाला नाही म्हणायची.हो बाईसाहेब…हो बाईसाहेब.साऱ्या पाहुण्या मंडळींनी तिचं तोंड भरून कौतुक केले.काहीतरी गेल्या जन्माच नातं असावं म्हणून अशी गुणी बाई तुम्हाला कामाला लाभली अस सायलीच्या सासरच्यांनी सुनीताचं कौतुक केलं.तेव्हा तिच्या बोटाला जरी कापलं तरी मालतीबाईंना वेदना व्हायच्या इतकं घट्ट नातं सुनीताच मालती बाईशी होतं तेव्हा तिची अशी जखमी अवस्था पाहून सऱ्या देशमुख परिवाराला वाईट वाटणारच ना!काय झालं कोणी केली तुझी अशी अवस्था कोणी मारलं का एकाच वेळी साऱ्यांनी गलका केल्यावर सुनीता रडायला लागली.कसतरी तिला शांत केलं प्यायला पाणी दिले.आठ दिवस सुनीता न येण्याच कारणं न बोलता साऱ्यांना कळून चुकले.नाही तर सांगीतल्या शिवाय सुनीता कधीचं सुट्टी घेत नसे.जास्त प्रश्नांची सरबराई न करता सुनीताला बोलत केल्यावर कळलं की तिच्या नवऱ्याने तिला

खूप मारल होत,इतकं मारलं की तिला दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावे लागलेत मालती बाईंचे मिस्टर प्रदिप देशमुख हे तर जाम खवळले “पोलीसांकडे कंप्लेंटच करतो त्याची”

“नको….नको”…

“नको काय नको चार दिवस चांगला तुरुंगात राहीला की मग येईल बरोबर ठिकाणावर”.

“नाही बाईसाहेब नवरा आहो तो माझा”

“अगं असं म्हणून तू किती दिवस त्याला पाठीशी घालणार आहेस,रोज मार खाण्या पेक्षा होऊन जाऊ दे ना एकदाचं, पोलीसांचे दोन दंडूके पडले म्हणजे मारायचं विसरेल तो.”

“नाही बाईसाहेब त्याच माझ्याशिवाय अणि माझं त्याच्याशिवाय कोणी नाही.”

“तुझं ना सुनीता मला काही गणित कळत नाही.त्याने दारू पिऊन यायचं आणि तु मार खायचा अस किती दिवस चालेल”!

“बायकांच्या सुख,दुःख, वेदनांना काही अंत नसतो बाईसाहेब, बायकांच्या भावनांना कोणी समजून घेत नसलं तरी त्यांच्या जवळ मन असतं म्हणून नवरा कसाही असला तरी त्याच्यात जिव अडकतो.नाही तरी बायका स्वतःसाठी कमी अणि आपल्या माणसांसाठी जास्त जातात.बाईच्या जगण्याची गुंतागुंती त्या परमेश्वराला नाही कळली तर पुरूषांना कुठे कळणार आहे तरी बाई नवऱ्यासाठी जगते त्याला सहण करते कारण बाईंचा जन्मच सारं काही स्विकारण्यासाठी असतो,तिच्या सहनशीलतेला मर्यादा नसतात म्हणूनच बाई जखमा घेते पण पिचडू देत नाही”.

“अगं सुनीता तू कोणत्या जमान्यात वावरतेय काळ बदलला हल्ली कोणी सहन करत नाही.असा अत्याचार सहन करत रहाशिल तर एक दिवस तूं मरून जाशी.अग आता हे थांबायला हवं.बायकांवर अन्याय होतो तरी बायकांनी मुकाट्याने सहन करायचं आणि काही बरं वाईट झालं की मंग काढा मोर्चा करा निषेध,अन्याय अत्याचार महिला सहन करून घेतात म्हणून या पुरूषांच फावतं नाही तर”……

मागच्या वेळी असंच झालं सुनीताला तिच्या नवऱ्याने चांगलं जोडलं होतं.तिची अवस्था पाहून.मालती बांईं जाम खवळल्या आणि घटस्फोट घेऊन टाक सोडून दे नवऱ्याला म्हटल्यावर सुनीतानेच मालतीबाईंना उपदेशाचे डोस पाजलेत.”सोडून दिले तर तो जाईल कुठे आणि मी तरी त्याच्याशिवाय काय करू,कशी राहू.तो कसाही असला तरी माझ्यासाठी जिवाभावाचा आहे.हमाली कामाला जातो खूप कष्ट करतो दारू पिऊन मारझोड केली तरी मध्यरात्री दारू उतरल्यावर माझ्या जवळ बसतो डोक्यावर हात फिरवतो,पाय दाबून देतो जखमेवर मलम लाऊन देतो.रडतो माफी मागतो मग मी सारं काही विसरून त्याला तेव्हढ्याच पोटतिडकीने,काळजीने, प्रेमाने सकाळी लवकर उठून जेवणाचा डबा करून त्याला कामावर रवाना करते.आणि मग तो जातांना पुन्हा पुन्हा मागे वळून बघतो.त्याने मागे वळून पाहिल्याशिवाय मी पण घरात जात नाही आणि संध्याकाळी दाराच्या उंबरठ्यावर बसून त्याची वाट बघते तो पुन्हा डुलत डालत होतो अशाही अवस्थेत त्याला चहा करून देते त्याच्या शिव्या खात त्याला गरमागरम जेवायला व्हाढते. तो निवांत झोपल्यावर त्यांच्या अंगावर पांघरून घालते.कारण तो दिवसभर खूप कष्ट करून दमून आलेला असतो.खूप प्रेम आहे आमचं एकमेकांवर त्याच मारझोड करणे हे आता नित्याचे झाले आहे.आता मला त्याची सवय झाली.खरचं मार खाऊनही त्याने डोक्यावरुन हात जरी फिरवला तरी वेदनांची तिव्रता कमी होऊन साऱ्या जखमा बऱ्या होतात,नवऱ्याशिवाय बाई अपुर्णच असते. नवऱ्याचा आधार मिळाल्याशिवाय संसार पुर्ण होत नसतो.नवरा समजून घ्यायचा असेल‌ तर त्याने दिलेल्या जखमेवर त्यानेच मारलेली फुंकर हवी असते.तेव्हाचं प्रेम घट्ट होतं.काही ठिकाणी तर सारेकाही सुखासुखी असतं पण नवरा बायकोमधे प्रेम नसतं.कुणाला कळू नये म्हणून दाखवण्यासाठी त्यांच्यात अपलेपणा असतो पण आतून जवळकी नसते.नवरा कसाही असला साधासुधा कमी पगार कमवता भांडणारा,दारू पिऊन मारझोड करणारा,कसाही असला तरी दोघांच नातं घट्ट असल की संसाराची गाडी सुरळीत चालते.नवरा बायकोमधे समजदार समजूतदार समंजसपणा असायला हवा.खरचं एकमेकांना समजून घेतले ना तर मनामध्ये कितीही कटूता असली दोघांमधले अंतर वाढत नाही.जखमा लवकर बऱ्या होतात.

आता या सुनीताला कसं आणि काय समजून सांगायचं हे मालती बाईंना काही कळतं नव्हते.पण सुनीताचा उपदेश मात्र विचार करायला लावणारा होता. तिचा एव्हढा समजूतदारपणा पाहून मालती बाईच्या मेंदूचा जणू भुगाच झाला. झिणझिण्या यायला लागल्यात त्यांच्या हातापायांना‌‌.बाईचं जगणं खरचं इतकं सहनशील असतं का? तिनेच का त्रास सहन करावा, तिच्यावरचं का अन्याय अत्याचार व्हावेत.का तिला कोणी समजून घेत नाही,का तिचा कोणी पाठराखी होत नसतो,का तिला मदतीसाठी याचना करावी लागते,तिच्यासाठीच का निषेधाची मेणबत्ती पेटवली जाते.खरपाहता या माणसांच्या गर्दीत बाई सुरक्षित नसली तरी ती समर्थपणे स्वतःला सुरक्षित ठेवून पुरूषांच्या बरोबरीने काम करते नव्हेतर पुरूषांपेक्षा ती चार पावले पुढेच आहे.आज असं कुठलं क्षेत्र नाही की तिथे महिला नाही.प्रत्येक क्षेत्रात आज महिला आघाडीवर आहेत.अहो आपल्या आईला,बाईला, बहिणीला,काय हवं असतं फक्त आधार,सहानुभूती,काळजी आपलेपणा ,मदतीचा हात आणि आपल्याच माणसांकडून तिची सुरक्षा बस.पण एका बाईच्या आयुष्यात जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जखमाचं असतात.तिच्या न बऱ्या होणाऱ्या जखमांवर सहजासहजी कोणी फुंकर घालत नाही.याला वास्तविकता म्हणायची की शोकांतिका काय म्हणायचं हा एक मोठा प्रश्न आहे.

किंबहुना न उलगडणारे कोडे आहे.

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसूमाई)*

९४२२८९२६१८

९५७९११३५४७

प्रतिक्रिया व्यक्त करा