You are currently viewing अध्यात्मवादाचा ऱ्हास आणि चंगळवादाचा उदय

अध्यात्मवादाचा ऱ्हास आणि चंगळवादाचा उदय

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*अध्यात्मवादाचा ऱ्हास आणि चंगळवादाचा उदय*

 

 

अध्यात्मवाद म्हणजे नक्की काय? आत्मा परमात्म्याचे ज्ञान, सत्व, रज, तम या त्रिगुणांचे महत्त्व, ब्रह्मस्वरूपाची उकल, *मी कोण* चे ज्ञान. अध्यात्म वाद म्हणजे कर्मयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग पण प्रपंचात राहणाऱ्या, सामान्य गृहस्थाश्रमी व्यक्तीसाठी अध्यात्माची ही व्याख्या थोडी क्लिष्ट, समजू न शकणारी, गोंधळात टाकणारी, न पेलवणारी ठरू शकते म्हणून अध्यात्माची एक निराळी सोपी व्याख्या केली तर?

 

अध्यात्म म्हणजे भौतिकतेवर विजय मिळवण्यासाठी केलेला अभ्यास, एक शास्त्र, ग्रंथ वाचन इतकेच नसून अध्यात्म ही एक विचारधारा आहे, एक कृती प्रणाली आहे. ती एक थेरेपी आहे, उपचार पद्धती आहे, एक संस्कार एक सत्संग आहे. चांगलं ऐकावं, चांगलं काय आणि वाईट काय याचं आकलन व्हावं आणि जे जे चांगलं, खरं असेल ते ते वागणुकीत उतरावं म्हणजेच अध्यात्मवाद. सद्भाव, सेवाभाव, कृतार्थभाव बाळगणं, आपली कौटुंबिक आणि सामाजिक कर्तव्ये सन्मार्गाने, निष्ठेने पार पाडणे म्हणजे अध्यात्मिकता.

 

ज्याप्रमाणे *अध्यात्मवाद* म्हणजे नेमके काय हे सांगणं अवघड आहे तितकंच *चंगळवाद* या बाबतची व्याख्या करणंही सोपं नाही. चंगळवाद या शब्दाचाही अर्थ व्यापक आहे. तरीही थोडक्यात असे सांगता येईल की चंगळवाद म्हणजेच भोगवाद, भौतिकता. भौतिकतेचं आकर्षण, ओढ आणि त्यासाठी जवळ असलेल्या धनाचा केलेला दिशाहीन अपव्यय. चंगळवाद म्हणजे देहप्रियता, लोभ, हव्यास आणि वाढवलेल्या अनंत गरजा आणि त्या पूर्ण करण्यासाठी आभासी सुखाच्या शोधात आयुष्यभर केलेली फक्त धावपळ,फरपट. अंतिमतः त्यातून येणारे नैराश्य, अशांती, बुद्धीभ्रंशता. चंगळवादामुळे माणूस आत्मकेंद्री होतो,सद्भावनेने समाजाशी जोडले जाण्याचे भान संपुष्टात येते आणि एक प्रकारे अध्यात्मिक वृत्तीचा र्‍हास होतो.

 

खरं म्हणजे मानवी जीवनाच्या अगदी सुरुवातीपासूनच हा चंगळवाद आहेच. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर कौरव हे भोगवादी होते आणि पांडवांची वृत्ती अध्यात्मिक होती. कुरुक्षेत्रावर झालेल्या लढाईत गीतामृत बरसलं आणि जणू काही मानवी जीवनासाठी अध्यात्मवादाचं एक शाश्वत दालन उघडलं गेलं.

 

देववृत्ती आणि राक्षसी वृत्ती ही अध्यात्मवाद आणि चंगळवादाची प्रतीके मानली तर त्यावेळीही चंगळवादामुळे मूल्यांची पायमल्ली होतच होती. युद्धं, अपहरण, बळाचा अयोग्य वापर नीतिमत्तेचा कडेलोट होतच होता त्यामुळे चंगळवादाचा उदय हा आजचा नक्कीच नाही.त्र फार तर मी असं म्हणेन आजच्या कलीयुगातलं मानवी जीवन हे या भोगवादात अधिक बुडालेलं आहे. त्याला अनेक कारणेही आहेत. राष्ट्रीयीकरण, (ग्लोबलायझेशन) पाश्चिमात्य संस्कृतीचे वाहणारे वारे, जीवघेण्या जागतिक, सामाजिक, वैयक्तिक, कौटुंबिक स्पर्धा आणि या सर्वांच्या केंद्रस्थानी अत्यंत गोंधळलेलं मानवी जीवन,त्यातून वाढलेली गुन्हेगारी, हिंसकता, युद्धे, भ्रष्टाचार आणि परिणामी हरवलेली माणुसकीची मूल्ये पर्यायाने झालेला अध्यात्मवादाचा ऱ्हास, दुर्गुणांचा विजय आणि सदगुणांचा पराभव. मात्र अशा सद्य परिस्थितीचा मागोवा घेत असतानाही जाणवते ती मंदिरातली गर्दी. भाविकांच्या देवदर्शनासाठी लागलेल्या लांबलचक रांगा, अनेक प्रकारची व्रतवैकल्यं, धार्मिक उत्सव, उपास- तापास, धर्मग्रंथांची पारायणं, गुरु करणं अशासारखे वाढलेले प्रकार. वास्तविक या साऱ्या बाबींचा अध्यात्मवादाशी प्रत्यक्ष संबंध नसला तरीही या कृत्यांचा अर्थ लावताना असे म्हणावेसे वाटते की बहुतेक सुखाच्या शोधात धावून थकलेल्या नैराश्यग्रस्त मनाला अखेर या मार्गांचा आधार घ्यावासा वाटणं याला उपरती म्हणायची की पापक्षालनसाठी अवलंबलेला ढोंगी मार्ग म्हणायचा?

 

अध्यात्मवाद आणि चंगळवाद या परस्पर विरोधी बाबी जरी असल्या तरी त्या अदृश्यपणे एकामागून एक येणाऱ्या ही आहेत. अध्यात्मवादाचा लोप ही चंगळवादाची सुरुवात आणि चंगळवादाचा जेव्हा अत्युच्च बिंदू गाठला जातो …हे व्यक्तीसापेक्ष आहे, तेव्हा माणूस मन:शांतीसाठी पुन्हा अध्यात्मिक मार्गावर यथाबुद्धी जाण्याचा प्रयत्न करू लागतो. यश अपयश हे पुन्हा व्यक्तीसापेक्ष आहे. कृतीतून वृत्तीबदल घडवून आणायचा असेल तर अध्यात्मवादाचं खरं ज्ञान मिळवणं ही एक आढळ तपस्या ठरते. त्यामुळे मानवी जीवनाचे भोगवादी चित्र जे आज आपल्याला दिसत आहे ते कालांतराने बदलू शकेल असा आशावाद बाळगायला काय हरकत आहे? चंगळवादामुळे होणारा अध्यात्मवादाचा र्‍हास अखेर मानवच सावरू शकेल हा विचार मांडणं गैर आहे का?

 

*राधिका भांडारकर*

प्रतिक्रिया व्यक्त करा