जिल्हास्तरीय वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी
आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई व जिल्हा सह आयुक्त नगर विकास शाखा, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय नगरपरिषद,नगरपंचायत जिल्हास्तरीय वार्षिक क्रीडा महोत्सव २०२४ चे आयोजन मेजर ध्यानचंद क्रीडांगण, कॅम्प, वेंगुर्ला व नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृह, वेंगुर्ला येथे करण्यात आले असल्याची माहिती नगरविकास शाखा जिल्हा सह आयुक्त विनायक औंधकर यांनी दिली.
या महोत्सवात जिल्ह्यातील ८ नगरपरिषदा, नगरपंचायती व जिल्हा सह आयुक्त कार्यालय अशी एकूण ९ कार्यालयातील सुमारे ४०० अधिकारी, कर्मचारी सहभागी होऊन आपले क्रीडा तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील नैपुण्य दाखविणार आहेत. या क्रीडा महोत्सव ०३ ते ०५ जानेवारी २०२५ या कालवधीत पार पडणार आहे. हा कार्यक्रम ०३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता मेजर ध्यानचंद क्रीडांगण, कॅम्प, वेगुर्ला येथे खेळाडूंचे संचलन व मान्यवरांना मानवंदना देवुन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या उपस्थितीत क्रिडा स्पर्धेचे उदघाट्न होणार आहे.
या क्रीडा महोत्सवात एकूण १७ खेळ होणार आहेत. विजेत्या खेळाडूंना सुवर्ण, रौप्य व कास्य पदक देवून गौरविण्यात येणार आहे. तसेच वैयक्तिक नृत्य, समुह नृत्य, वैयक्तिक गायन, समूह गायन, लघुनाटिका, चारोळी, कविता वाचन, वेशभूषा व रांगोळी स्पर्धा इत्यादी भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी जिल्हा सह आयुक्त विनायक औंधकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद, नगरपंचात यांचे मुख्याधिकारी व अधिकारी कर्मचारी कामकाज पाहत आहेत.
या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे जास्तीत जास्त पदके जिंकणाऱ्या संघाला सर्वसाधारण विजेता चषक देण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रम नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृह, वैगुर्ला येथे दिनांक ०५ जानेवारी २०२५ रोजी संपन्न होणार आहेत. तसेच बक्षिस वितरण समारंभ नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृह, वेंगुर्ला येथे दिनांक ०५ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता पार पडणार आहे. या बक्षिस वितरण कार्यक्रमास मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे, आमदार तथा माजी शिक्षण मंत्री दिपक केसरकर, कुडाळ मतदारसंघाचे आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला वेंगुर्ला शहरातील तसेच जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा सह आयुक्त विनायक औंधकर व जिल्ह्यातील सर्व नगरपालिका , नगरपंचायत मुख्याधिकारी यांनी केले आहे.