आमदार नितेश राणे यांच्या ठोस आश्वासनानंतर बबली राणे यांचे उपोषण स्थगित

आमदार नितेश राणे यांच्या ठोस आश्वासनानंतर बबली राणे यांचे उपोषण स्थगित

कणकवली

आमदार नितेश राणे यांनी कंपन्यांच्या सीएसआर फंडातून ओसरगाव तलावाचे सुशोभीकरण करण्याचा ठोस शब्द दिल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांनी आपले उपोषण मागे घेतले. ओसरगाव तलावाचे सुशोभीकरण व्हावे या मागणीसाठी ओसरगावचे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांनी १५ जानेवारीच्या मध्यरात्री १२ वाजलेपासून तलावकिनारी आमरण उपोषण छेडले होते. प्रसंगी तलावातच जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. आमदार नितेश राणे यांनी आज उपोषणस्थळी जात बबली राणे यांची भेट घेतली. राज्यसरकार दिवाळखोर झाले असून शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार काढायला सरकारकडे पैसा नाहीय. त्यामुळे ओसरगाव तलावाचे सुशोभीकरण करणे हे राज्य सरकारच्या आवाक्यातील बाब नाही. म्हणून आपण खाजगी कंपन्यांच्या सीएसआर फंडातून ओसरगाव तलावाचे सुशोभीकरण करून पर्यटनदृष्ट्या ओसरगाव तलाव विकसित करण्याचा शब्द देतो असे सांगत आमदार नितेश राणे यांनी बबली राणेंना आश्वस्त केले त्यानंतर बबली राणे यांनी आपले उपोषण मागे घेतले. यावेळी पं स सभापती मनोज रावराणे, पं स सदस्य मिलिंद मेस्त्री, लपा कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, उपअभियंता पी आर पाटील, कनिष्ठ अभियंता तरटे, व्ही पी लिंगरज आणि ओसरगाव ग्रामस्थ उपस्थित होते. आमदार नितेश यांच्या भेटीपूर्वी राष्ट्रवादी नेते अबीद नाईक, राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी बबली राणेंची भेट घेत चर्चा केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा