मुंबई :
कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावले आहे. हुतात्मा दिनानिमित्त कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील शहिदांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते.
‘महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी प्राणपणाला लावणाऱ्या सीमा लढ्यातील हुतात्म्यांना आजच्या हुतात्मा दिनी विनम्र अभिवादन. सीमा प्रश्नात सर्वस्वाची होळी करणारे हुतात्मे आणि त्यांच्या त्याग, समर्पणात होरपळूनही आजही या लढ्यात धीराने आणि नेटाने सहभागी कुटुंबियांना मानाचा मुजरा..!
कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध आहोत. या अभिवचनासह हूतात्म्यांना विनम्र अभिवादन!’, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
*एकनाथ शिंदे काय म्हणाले?*
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण बेळगाव आणि सीमाभागासाठीची न्यायालयीन लढाई नक्कीच जिंकू. बेळगाव आणि सीमाभाग महाराष्ट्रात येईल, असा आम्हाला विश्वास आहे. सीमा लढ्यात तुरुंगवास भोगल्याने माझा आणि सहकारी सीमा भाग समन्वयक मंत्री छगन भुजबळ यांचं या लढ्याशी भावनिक नातं आहे. आम्ही हुतात्म्यांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही, असं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
*यड्रावकरांना रोखलं*
सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावात निघालेले राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कर्नाटकच्या सीमेवर अडवण्यात आले आहे. कोगनोळी टोल नाक्यावर पोलिसांनी त्यांचा ताफा रोखल्याचे समजते. त्यामुळे आता महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे.