You are currently viewing स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन ‘ द फेबल फेस्ट ‘ मोठ्या जल्लोषात साजरा

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन ‘ द फेबल फेस्ट ‘ मोठ्या जल्लोषात साजरा

*स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन ‘ द फेबल फेस्ट ‘ मोठ्या जल्लोषात साजरा:*

सावंतवाडी

दि. २१ डिसेंबर २०२४ या दिवशी स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘ द फेबल फेस्ट’ प्रशालेच्या भव्य रंगमंचावर मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वैद्यकीय, लेखिका, कवयित्री, एकपात्री हास्य व नाट्य कलाकार तसेच सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सई सतीश लळीत ‘ तसेच, पत्रकार, साहित्य, कातळशिल्प संशोधक व सामाजिक कार्यकर्ते ‘श्री. सतीश रामचंद्र लळीत’ हे असून उपस्थित पाहुण्यांचे शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रशालेतील सहा. शिक्षिका सौ. जागृती प्रभू टेंडोलकर यांनी प्रमुख पाहुण्यांविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. ‘द फेबल फेस्ट’ ही या वार्षिक स्नेहसंमेलनाची‌ थिम असून , ‘द फेबल फेस्ट’ हे प्रशालेत शिक्षकांनी स्वहते तयार केलेले भव्य पुस्तक प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उघडून व त्या पुस्तकावर त्यांचे हस्ताक्षर घेऊन हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. या पुस्तकातील पहिल्याच पानावर वाचकांसाठी प्रतिज्ञा असून त्या प्रतिज्ञेमध्ये, नेहमी झोपण्याआधी मी एक तरी पुस्तक वाचेन हा संदेश देण्यात आला आहे. त्यानंतर, विविध बोधकथांचा समावेश करून संवादात्मक सूत्रसंचालन केले गेले. त्या कथांवर आधारित प्रत्येक नृत्याअगोदर या भव्य पुस्तकाचे पान उघडून मग त्या – त्या नृत्याला व त्या मधील नाट्यरुपी संवादाला सुरुवात केली गेली. या कार्यक्रमासाठी लागणारे बरेचसे साहित्य शालेय कला शिक्षिका सौ. सुषमा पालव, कु. विनायकी जबडे यांनी व त्यांच्या मार्गदर्शनाने शाळेतील सर्व शिक्षकांनी मिळून तयार केले. शाळेचे प्रमुख द्वार सुरेख रांगोळीने सजवले गेले. त्याचप्रमाणे,प्रमुख पाहुणे डॉ. सई सतीश लळीत यांनी व शाळेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी पिपिटी द्वारे शाळेचा अहवाल सादर केला. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील सहा. शिक्षिका सौ. ग्रिष्मा सावंत व सौ. अमृता सावंत यांनी केले. श्रीगणेशाचे वंदन व स्मरण करीत प्रशालेतील शिक्षकांनी श्रीगणेश वंदना गीतावर नृत्य सादर केले. त्यानंतर वार्षिक स्नेहसंमेलनाच्या थिम विषयी माहिती देण्यात आली. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी पौष्टिक अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे आपले आरोग्य निरोगी व सशक्त राहते हा संदेश आपल्या नाट्यातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. संगीताचा कार्यक्रम देखील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम प्रकारे सादर केला. त्यात मुलांनी गाणी गायली. तसेच, हार्मोनियम, तबला व बासरी वादन केले. त्यानंतर, अनुक्रमे इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी सिंड्रेला, इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांची हॅरी पॉटर व नरसिंह, इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी अलाहदिन व विक्रम बेताल, इयत्ता चौथच्या विद्यार्थ्यांनी द लायन किंग, इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी मोगली व सहावीच्या विद्यार्थ्यांनी महाभारत हे नृत्य संवाद नाट्यासहित सादर केले. तसेच, या कार्यक्रमात कराटे वर आधारित नृत्य सादर करण्यात आले. प्रशालेचे कराटे शिक्षक श्री. मंगेश गोगळे यांनी कराटेवर आधारित विद्यार्थ्यांना नृत्य करण्याची संधी मिळाल्याबद्दल शाळेचे आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी शालेय सहा. शिक्षिका सौ. श्रावणी प्रभू यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले व कार्यक्रमाची सांगता झाली. शाळेचे संचालक श्री रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी सर्व शिक्षकांचे, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अशाप्रकारे, वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम अतिशय जल्लोषात पार पडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा