You are currently viewing औरंगजेबाचा रक्तरंजित इतिहास पुन्हा वाचायला हवा….

औरंगजेबाचा रक्तरंजित इतिहास पुन्हा वाचायला हवा….

 

काँग्रेसच्या सेक्युलरवादी भूमिकेवरुन निशाणा साधण्यात आला आहे. सध्या औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा गाजत आहे. या मुद्द्यावरुन राज्यातलं राजकारणही तापलं आहे. त्यातच सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेस एकमेकांसमोर उभे राहिलेले दिसत आहेत. मुस्लिम व्होट बँक दुरावेल या भीतीपोटीच काँग्रेस नामांतराला विरोध करत असल्याची टीका संजय राऊतांनी रोखठोकमधून केली आहे.

हिंदुस्थानची घटना सेक्युलर आहेत. म्हणून बाबर, औरंगजेब, शाहिस्तेखान, ओवेसी वगैरे लोकांना सेक्युलर कसे मानावे?

औरंगजेबाला परधर्माचा भयंकर तिटकारा. त्याने शिखांचा हिंदूंचा छळ केला. त्यांच्या खुणा आपण का जतन कराव्या? असा सवाल संजय राऊत यांनी काँग्रेसला विचारला आहे. यापूर्वी शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी औरंगजेब तुमचा आदर्श आहे काय? असा सवाल काँग्रेस नेत्यांना विचारला होता.

*काँग्रेसच्या भूमिकेवर टीकास्त्र*

औरंगजेब कोण होता हे निदान महाराष्ट्राला तरी समजावून सांगण्याची गरज नाही. औरंगजेबाच्या दरबारात छत्रपती शिवाजीराजांच्या स्वाभिमानाची तलवार तळपली. आग्र्याहून सुटका ही वीरगाथा त्यानंतरच घडली. महाराष्ट्राने औरंगजेबाशी मोठा लढा दिला. त्या लढ्याचे नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी केले. त्यामुळे सच्चा मराठी आणि कडवट हिंदू माणसाला औरंगजेबाविषयी लोभ असण्याचं कारण नाही. मराठवाड्यातील सरकारी कागदोपत्री औरंगाबाद असं नाव असलेल्या शहराचं नामकरण संभाजीनगर व्हावे यावरुन राजकीय वाद निर्माण झाला आहे. काँग्रेससारखे ‘सेक्युलर’ पक्ष औरंगाबादचे संभाजीनगर होऊ नये या मताचे आहेत. औरंगाबादचे नामांतर केल्यानं मुस्लिम समाज म्हणजे अल्पसंख्याक नाराज होतील व व्होट बँकेवर परिणाम होईल. म्हणजे स्वत:च्या सेक्युलर प्रतिमेवर प्रश्चचिन्ह निर्माण होईल. तिसरे म्हणजे औरंगाबादचे नामांतर केल्याने लोकांचे, विकासाचे प्रश्न सुटणार आहेत काय? असे मुद्दे नाव बदलण्यास विरोथ करणारे उपस्थित करत आहेत. ते काही असले तरी औरंगजेबाच्या कोणत्याही खुणा निदान महाराष्ट्रात तरी ठेवू नयेत या मताचा मोठा वर्ग आहेच.

*काँग्रेसची नेमकी भूमिका काय?*

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादचं नामांतर केल्याने लोकांचे आणि विकासाचे प्रश्न सुटणार आहेत का? असा सवाल केला होता. “राज्यातील महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर आलेले आहे. औरंगाबाद विभागाच्या विभागीय आयुक्तांनी अहवाल दिलेला असला तरी काँग्रेसची ही भूमिका नाही. विकास करण्याला आमच्याकडून प्राधान्य राहील. महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालं आहे. औंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा विषय किमान समान कार्यक्रमात नाही. नाव बदलण्याचा विषयावर आमचा विश्वास नाही, अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मांडली आहे.

*हे वागणं ‘सेक्युलर’ नव्हे!*

‘महाराष्ट्रातील सर्वच पुढाऱ्यांनी औरंगजेबाचा रक्तरंजित इतिहास पुन्हा वाचयला हवा. निदान आपल्या बालपणातील इतिहासाची शालेय क्रमिक पुस्तके तरी नजरेखालून घालायला हवीत. औरंगजेब हा सेक्युलर कधीच नव्हता. त्याने शिवाजी महाराजांचा शत्रू मानलेच, पण छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करुन मारले. असा औरंगजेब संभाजी राजांच्या बलिदानानंतरही पंचवीस वर्षे महाराष्ट्राशी लढत राहिला व शेवटी याच मातीत गाडला गेला. अशा औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात तरी एखादे शहर असू नये. ही धर्मांधता नसून शिवभक्ती म्हणा, महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणा, नाहीतर इतिहासाचा भान; पण असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणं सेक्युलर नव्हे!”

प्रतिक्रिया व्यक्त करा