“नितेशजी,अभिनंदन!
शुभेच्छा आणि अपेक्षाही..अॅड.नकुल पार्सेकर.
अखेर वीस दिवसांच्या प्रतिक्षा संपली आणि काल महाराष्ट्राच्या संञा नगरीत महायुतीच्या एकुण ३९ मञ्यांचा शपथविधी संपन्न झाला. कुणावर गदा येते आणि कुणावर पक्षनेतृत्व फिदा होत? याची उत्सुकता असली तरी नितेश राणे हे मंञिम़डळात असतील याबाबत कुणालाही शंका नव्हती.
कणकवली मतदारसंघातील २०१४ ची निवडणूक मी जठार यांच्या प्रचारात सक्रिय असल्याने जवळून अनुभवली, पाहिली. हात विरूद्ध कमळ, नितेश राणे विरुद्ध प्रमोद जठार. २००९ च्या निवडणुकीत फाटक हे राणे साहेब पुरस्कृत काँग्रेसचे उमेदवार होते. स्व. कुलदीप पेडणेकरांचा नारळ जठाराना पावला. कुलदीप पेडणेकर यांनी तब्बल अठरा हजार मतं घेतली आणि जठार यांचा अवघ्या ३४ मतांनी निसटता विजय झाला.. पण २०१४ ची लढाई ही जठारासाठी खूपच कठीण आणि आव्हानात्मक होती कारण उमेदवार होते नितेश राणे. त्यांची त्यांनी विकसित केलेली एक प्रभावी प्रचार यंत्रणा होती जी मतदारसंघात शांतपणे काम करत होती. एखादा विश्वासू सहकारी किंवा कार्यकर्ता त्याला सोपवलेलं काम तो व्यवस्थित त्या भागात करतो की नाही? याचं काउ़ंटर व्हेरिफिकेशन नितेश राणे हे आपल्या स्वाभिमानी संघटनेच्या माध्यमातून करत होते आणि त्यात काही ञुटी आढळल्यास तातडीने कारवाई करत असतं. प्रचाराच्या दरम्याने तेव्हा मला जामसंडे येथे नितेशजींचा एक कार्यकर्ता भेटला.. तेव्हा चर्चा करताना मी त्यांना म्हणालो, की तुमच्या साहेबांना अॅडव्हान्स मध्ये शुभेच्छा सांगा. या एका वाक्यावरून आमची खुप खोलवर चर्चा झाली. त्या कार्यकर्त्यांने ही गोष्ट नितेश राणे यांना सांगितली. मी जठाराना कल्पना दिली की नितेश राणे मोठ्या मार्जिनने निवडून येणार.. जठार म्हणाले, काय सांगता? मा. पंतप्रधानांची एवढी सभा झाली आणि तरीही पराभव होणार? खरं तर त्या सभेला जी गर्दी होती त्यात बहुसंख्य काँग्रेस व स्वाभिमानी संघटनेचचं लोक होते.. झालेली गर्दी याच भरवशावर जठार राहिले.. माञ ही सगळी रणनीती नितेश राणे यांची होती.. एक चर्चा म्हणून मागच्या वर्षीच्या डिसेंबर मध्ये जेव्हा मी माझ्या कौटुंबिक कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायला ओम गणेश बंगल्यावर गेलो होतो तेव्हा ही गोष्ट मला सांगितली. त्यांनी जी वीस मिनिटे आमची २०१४ च्या निवडणुक प्रचारा बाबत चर्चा झाली तेव्हा त्यांनी याचं सुतोवाच केलं.
त्यानंतर २०१९ ची निवडूक ही भाजपा मधून कमळ चिन्हावर त्यांचेच एके काळचे सहकारी श्री सतीश सावंत यांच्या विरोधात लढले आणि नितेश राणे दुसऱ्यांदा आमदार झाले. गेल्या पाच वर्षांत पुला खालून बरचं पाणी वाहून गेल. राजकीय मिञ शञु झाले… काही राजकीय शञु मिञ झाले.. पण या पाच वर्षात नितेश राणे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या कडवट हिंदुत्वाची प्रतिमा निर्माण केली. देशभरात संघपरिवाराचं हिंदुत्व प्रभावीपणे मा. मोदींच्या नेतृत्वाखाली अधोरेखित झालं आणि यापुढे ते आणखीन द्रुढ होणार हे नितेश राणे यांनी नेमक हेरल आणि त्यानुसार त्यांनी नियोजनबद्ध पध्दतीने आखणी करून कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता तरुण कडवट हिंदुत्ववादी नेता म्हणून निर्माण केलेल्या प्रतिमेमुळे नितेश राणे हे बापसे बेटा सवाई याचा प्रत्यय येवू लागला. नितेश यांचे पिताश्री हे आदरणीय हिंदुह्यदयसम्राट बाळासाहेबांचे कडवट व कट्टर शिवसैनिक ही त्यांची प्रमुख ओळख. बाळासाहेबासाठी आपला जीवही गेला तरी चालेल ही नारायणराव राणे यांची निष्ठा.. याऊलट दादांच्या या छोट्या चिरंजीवा़ची गेल्या पाच वर्षाची भूमिका म्हणजे हिंदुत्वासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी त्यांच्या प्रत्येक कृतीतून वारंवार दिसू लागली. त्यांच्या या भूमिकेला विद्यमान मुख्यमंत्री व तत्कालीन गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांची तमा न बाळगता अगदी उघडपणे समर्थन केल.. म्हणूनच नितेश राणे यांनी एका जाहीर कार्यक्रमात सांगून टाकले, की मी माझ्या हिंदु धर्मासाठी वाट्टेल ते करायला तयार आहे, मी घाबरत नाही, माझा बाप सागरवर बसलेला आहे…
हिंदूचा मसिहा म्हणून प्रतिमा तयार करत असताना त्यांनी आपल्या मतदारसंघाची अशी काही बांधणी केलेली आहे निदान पुढची पंचवीस वर्षे तरी त्यांना कुणी आव्हान देईल याची शक्यता नाही.
२०२४ ची कणकवलीची निवडूक हा एक सोपस्कार होता जो ठाकरे सेनेने संदेश पारकर यांच्या माध्यमातून पार पाडला. दोन वर्षांपूर्वी एका दैनिकात दादांच्या वाढदिवसा निमित्ताने मी एक लेख लिहिला होता.. त्यात मी असं म्हटलं होत की, मा. नारायणराव राणे यांचा पुढचे प्रभावी राजकीय वारसदार श्री नितेश राणे हेच असतील.
कोणताही कार्यकर्ता हा सामाजिक, राजकीय वा इतर कोणत्या क्षेत्रातला असो त्याचा डीएनए ओळखून मग त्याच्याशी पुढे अॅटॅच रहाव की नाही? याचं भान नितेश राणे यांना आहे. एखाद्या साध्या गोष्टीतून संपर्क ठेवण्याची त्यांची खासियत.
सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी पोटनिवडणूक होती. त्यात त्यांनी जातीनीशी लक्ष घातल होत. त्या दरम्यान मला डॉ. मिलिंद कुलकर्णी व सतीश सावंत ( तेव्हा ते राणे कुटुंबिया समवेत होते) फोन आला की नितेशजी संजू परब यांच्या निवडूकी संदर्भात आपल्याला भेटू इच्छितात. त्या नुसार मी, कुलकर्णी डॉक्टर, सतीश सावंत व नितेश राणे यांच्या सोबत हाॅटेल मॅ़गो येथे बैठक झाली आणि नितेश राणे यांच्या विनंतीनुसार श्री संजू परब याना मदत केली.. निवडूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी नितेश राणे यांचा मला आभाराचा फोन आला. उमेदवार विसरले पण नितेशजी नाही विसरले.
राजकारण होत राहील. पक्ष, नेते यांचीही पक्षांतरे होतील पण नितेश राणे यांची महाराष्ट्राच्या मंञिम़डळात कॅबिनेट मंत्री म्हणून झालेली निवड ही या सिंधुदुर्गातील एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून निश्चितच माझ्यासाठी अभिमानाची व आनंददायी घटना आहे. त्यांच्या पिताश्री़च्या माध्यमातून त्यानां संसदीय राजकारणाचे धडे निश्चितच मिळालेले आहेत. त्याचा ते सकारात्मक द्रुष्टीने उपयोग करतील आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांच वय त्यांच्या बाजूने आहे. आता मंञी झाल्याने त्यांची जबाबदारी वाढलेली आहे. धर्मासाठीची आक्रमकता आवश्यक असली तरी सर्वसमावेशक राजकारण करणे हे महाराष्ट्राच्या आणि त्यांच्याही हिताचे आहे.
सिंधुदुर्गातील जनतेच्या आता अपेक्षा वाढलेल्या आहे कारण एका वेगळ्या आशेने जनता त्यांच्याकडे पहात आहे. काल चर्चा करत असताना एक वयस्कर आजी म्हणाली, ” आमचो, नितेश मंत्री झालो.. कायतरी निश्चितच बरा करतलो” या आजीला नितेश राणे यांच्याबद्दल असलेला विश्वास तीने व्यक्त केला. म्हणजेच ती या जिल्ह्यातील सर्वच आपल्याकडून अपेक्षा करणाऱ्या जनतेची प्रतिनिधी म्हणून बोलत होती. या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी निश्चितच नितेश राणे घेतील.
या जिल्ह्यात जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत अनेक प्रश्न आहेत. आरोग्य, रोजगार, शिक्षण, पर्यावरण यासाठी जिल्ह्यातील त्या त्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्ती, सामाजिक संस्था, बुद्धीजीवी यांच्याशी सुसंवाद ठेवून आम्हाला, त्यांच्या पक्ष नेतृत्वाला, जिल्ह्यातील जनतेला आणि विशेष करून त्यांचे पिताश्री आदरणीय नारायणराव राणे यांना गर्व वाटेल असा सिंधुदुर्ग घडवण्यासाठी नवनियुक्त कॅबिनेट मंत्री मा. नितेशजी राणे पुढील वाटचाल करतील असा विश्वास वाटतो. त्यासाठी त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छाही..