You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक पालकमंत्री आणि अनेक सुपर पालकमंत्री! प्रत्येकाच्या “अती-पॉझिटिव्हनेस”मुळेच जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट सर्वोच्च!!

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक पालकमंत्री आणि अनेक सुपर पालकमंत्री! प्रत्येकाच्या “अती-पॉझिटिव्हनेस”मुळेच जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट सर्वोच्च!!

भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश सदस्य अविनाश पराडकर यांची टीका

सिंधुदुर्ग जिल्हा टॉप पॉझिटीव्हीटी रेटिंगसह रेड झोन मध्ये येण्याचे सारे श्रेय जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्ह्यातील सुपर पालकमंत्री यांनाच देण्यात दुमत नसावे. त्यांनी खरोखरच एकत्र मिळून हे “करून दाखवले” आहे. मुख्यमंत्री यांच्या कारभारावर खुश असल्याचे समजते, आणि ते खरेच आहे. फसलेल्या जावयाचा सासरवाडीवर रागच असतो असे म्हणतात. त्यामुळे सासरवाडची वाट लावण्याच्या कामावर जावई खुशच असणार.

या जिल्ह्याची वाट लावून दाखवलेल्या पालकमंत्री आणि सुपर पालकमंत्र्यांनी आपल्या मागच्या दोन वर्षांच्या वाटचालीचा आढावा स्वतःच घेऊन पाहिला तरी त्यांना वास्तव समजेल. काल ऑक्सिजन प्लॅन्टच्या दृकश्राव्य उद्धाटनाच्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमदार वैभव नाईक सांगतात, की जिल्ह्यात तब्बल दोन लाख चाकरमानी आले असल्याने त्यांच्यासाठी जास्त लसी उपलब्ध करून घ्याव्यात. म्हणजेच मुंबईतला कोरोना रेट कमी करून शाब्बासकी मिळवण्यासाठी मुंबईची जबाबदारी सिंधुदुर्गच्या गळ्यात कशी टाकली गेली हे स्पष्टच झाले आहे. सगळे नियम पाळायचे, धंदा-व्यवसाय बंद करून घरात बसायचे आणि सरकारच्या धरसोड धोरणामुळे चूक नसतानाही आपली वाट लावून घेत वॅक्सिनसाठी भीक मागायची हेच स्थानिकांच्या नशिबी आले आहे. ऐन उमेदीत अनेक तरुण कोरोनाने मृत्यू पावले आहेत, मग मुख्यमंत्री नेमक्या कोणत्या कारभारावर खुश होऊन आमदार वैभव नाईक यांचे कौतुक करत “वैभव तू मागशील ते देईन” म्हणत आहेत. मुख्यमंत्री साहेब, अजून कोरोनावर जिल्हा मात करायचा बाकी आहे. आमदारांना त्यानंतर मतदारसंघात मृत झालेल्या व्यक्तींच्या वजनाएवढा केक द्या आणि तो कापता येईल अशी धारदार तलवार द्या. या कार्यक्रमात दृकश्राव्य माध्यमातून आम्ही जिल्ह्याच्या झालेल्या बरबादीचे “कॉफीटेबल बुक” आम्ही त्यावेळी जिल्ह्यातर्फे सप्रेम भेट नक्की देऊ. अशा अनेक सुपर पालकमंत्र्यांची जिल्ह्यातली सुवर्ण कामगिरी आपल्याला त्यातून नक्की कळवू.

कठीण प्रसंगात राजकारण नको हा डायलॉग किती फसवा आहे, हे जिल्ह्यात ॲम्ब्युलन्सपासून ते प्रेते जाळण्याच्या ठेक्यातल्या लुटमारीपर्यंत आणि कोविड सेंटर्सच्या लाखो रुपयांच्या बिलापासून ते टेस्ट सेंटर्सच्या दुप्पट तिप्पट आकारल्या गेलेल्या टेस्ट-रिपोर्ट चार्जेसपर्यंत सगळीकडेच उघड झाले आहे. तेव्हा इतक्यातच आपली पाठ आपणच थोपटुन घ्यायचे कौतुक सोहळे तूर्तास थांबवा. जनता सगळे जाणते, ती योग्य वेळी योग्यप्रकारे कौतुक करणारच आहे, याची खात्री बाळगा, असा उपरोधीक टोला भाजपा सोशल मीडियाचे अविनाश पराडकर यांनी लगावला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा