*खांडोळा महाविद्यालयात व्याख्यान*
पणजी :
अहिल्यादेवी होळकर या सामाजिक समरसतेच्या खऱ्याखुऱ्या प्रतिनिधी होत्या. त्यांनी टोल (पथ) कर ही संकल्पना सर्वात प्रथम राबविली. सदैव लोकहिताचा विचार करून त्यांनी आपले शासन चालविले, त्यामुळे त्या लोकमाता होत्या, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री नेहा भांडारकर यांनी केले. खांडोळा येथील सरकारी कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयात त्या सामाजिक समरसता आणि मातृशक्तीचा मिलाफ – अहिल्याबाई होळकर या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी श्रीमती भांडारकर बोलत होत्या.
महाविद्यालयाच्या प्राचार्या पूर्णकला सामंत, उपप्राचार्य आशा गेहलोत, साहित्यलेणी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष चित्रा क्षीरसागर व्यासपीठावर होत्या. यावेळी प्रा. प्रकाश वझरीकर, सुनेत्रा कळंगुटकर, प्रतिष्ठानचे सचिव प्रकाश रामचंद्र क्षीरसागर, श्री. भांडारकर, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होता. प्रारंभी दीप प्रज्वलन करण्यात आले व अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला. दुमती कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. सोनाली हळर्णकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. दुर्गा जांभळे यांनी आभार मानले.
प्रा. पूर्णकला सामंत यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या कार्याची माहिती दिली. आशा गेहलोत यांनी एका अभ्यासपूर्ण व्याख्यानाच्या आयोजनाबद्दल मराठी विभागाचे आभार मानले.