*समग्र शिक्षा अभियानातंर्गत जागतिक दिव्यांग समता सप्ताह*
*दिव्यांग मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
*वामनराव महाडिक विद्यालयाचा उपक्रम*
*तळेरे*
तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या डॉ. एम. डी. देसाई सांस्कृतिक भवनात आयोजित केलेल्या समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जागतिक दिव्यांग समता सप्ताह कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये दिव्यांग मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आनंद अनुभवला. यावेळी 30 दिव्यांग विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
या सप्ताहाचे उद्घाटन गोवा येथील सामाजिक कार्यकर्त्या अमेलिया वैद्य यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कणकवली गट शिक्षणाधिकारी किशोर गवस, तळेरे उपसरपंच रिया चव्हाण, तालुका समन्वयक विशेष तज्ञ भाऊसाहेब कापसे, विषय तज्ञ प्रज्ञा दळवी, प्रणाली पाळेकर, केंद्रप्रमुख सदगुरू कुबल, तळेरे विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश मांजरेकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेरेचे मुख्याध्यापक महेंद्र पावसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या सप्ताहाच्या दुसऱ्या सत्रात दिव्यांग मुलांना आनंद मिळावा, विविध स्पर्धेत सहभागी होऊन त्यातील मजा अनुभवता यावी यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये धावणे, लांब उडी, संगीत खुर्ची, चमचा गोटी, गीत गायन, नृत्य, बादलीत चेंडु टाकणे, अभिनय, इत्यादी खेळ घेण्यात आले.
या स्पर्धेत कोणत्याही प्रकारचे क्रमांक न काढता सहभागी सर्व मुलांना प्रमाणपत्र, भेटवस्तू व अविनाश मांजरेकर यांच्याकडून प्रत्येक विद्यार्थ्याला मेडल देवुन गौरवण्यात आले. तर हा सप्ताह कार्यक्रम अत्यंत नीटनेटका आणि उत्साहात पार पडल्याबद्दल तळेरे माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश मांजरेकर यांना शाल व श्रीफळ देऊन बिआरसी कणकवली मार्फत सत्कार करण्यात आला.