बांगलादेश हिंदू न्याय यात्रेला सिंधुदुर्गनगरीत उत्स्फुर्त प्रतिसाद…
शेकडोंचा सहभाग; आमदार नितेश, निलेश राणेंसह दीपक केसरकरांची उपस्थिती लक्षवेधी…
सिंधुदुर्गनगरी
बांग्लादेशामध्ये हिंदू बांधव, महिलांवर मुसलमानांकडून होणाऱ्या अनन्वित अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी जागतिक मानवता दिनानिमित्त सकल हिंदू समाजाच्यावतीने काढण्यात आलेल्या ‘बांग्लादेश हिंदू न्याय यात्रा’ या मुक मोर्चा’ला सिंधुदुर्गात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो हिंदू यात सहभागी झाले होते. यात आ नितेश राणे, आ दीपक केसरकर, आ निलेश राणे यांच्या उपस्थिती लक्षवेधी ठरली होती.
बांग्लादेश निर्मिती वेळी बांग्लादेशामध्ये ३३ टक्के हिंदू होते. ते आता आठ टक्क्यांवर आले आहे. काही महिन्यांपूर्वी या देशातील सत्ता उलथवून टाकण्यात आली. देशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांना भारताचा आसरा घ्यावा लागला. त्यानंतर तेथील इस्लामिक लोकांनी बांग्लादेशा मधील हिंदू बांधव, महिला, ज्येष्ठ, लहान मुले, धर्मगुरू यांचा अनन्वित छळ सुरू केला आहे. धर्मगुरूंना वकील म्हणून पुढे आलेल्या व्यक्तीला ठार मारले आहे. त्यामुळे जागतिक मानवता दिनाचे औचित्य साधून १० डिसेंबर रोजी सर्व जिल्ह्यांत बांग्लादेश हिंदू न्याय यात्रेच्या माध्यमातून मुक मोर्चा काढण्यात आला. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा ही यात्रा काढण्यात आली. ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून यात्रेला प्रारंभ झाला. त्यानंतर ही यात्रा सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा मुख्यालयात सरळ दाखल झाली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यात्रेचे रूपांतर सभेत करण्यात आले.