आता वरातीमागून घोडे नाचायची गरजच काय?

आता वरातीमागून घोडे नाचायची गरजच काय?

माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई

मास्क व व सॅनीटायझर खरेदीमध्ये फार मोठे अर्थकारण दडल्याची शक्यता..

कुडाळ

कोरोनाची महामारी मार्च महिन्यात सुरू झाली. राज्य शासनाने सर्व जिल्हा नियोजन समित्यांना विकास कामांकरिता दिलेला निधी हा कोरोना विरुद्धच्या उपाय योजनांकरिता खर्च करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी जिल्ह्यातील आरोग्य विभागाची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. व्हेंटीलेटर, ऑक्सिजन पुरवठा, आवश्यक ती उपकरणे, इंजेक्शन्स या सर्व बाबींची कमतरता होती. अनेक निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यावेळी आरोग्य विषयक सुधारणा करण्याकरता खर्च करण्याचे शहाणपण सत्ताधाऱ्यांना सुचले नाही. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला व देश अनलॉक सहाच्या दिशेने वाटचाल करत असताना अचानकपणे जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्ती मागे दोन मास्क व सॅनीटायझर पुरवण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. आता वरातीमागून घोडे नाचायची गरजच काय असा सवाल करून जिल्हा नियोजन समितीचा सुमारे सहा कोटी रुपयांचा निधी अनावश्यक बाबींकरिता खर्च करू नये असा ठराव जिल्हा परिषद स्थायी समितीमध्ये पारित करून त्याऐवजी जिल्हा रुग्णालयातील व्हेंटिलेटर व अन्य यंत्रणांमध्ये सुधारणा करा असा ठराव करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेमधील गटनेते नागेंद्र परब यांनी अगोदर अभ्यास करावा आणि मगच टीका करावी असे देखील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी सांगितले. मास्क व सॅनिटायझर पुरवठा करण्यामागे फार मोठे “अर्थकारण” दडले आहे. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घराघरात प्रत्येक व्यक्तीकडे मास्क आहे व त्याचा वापर गेले आठ महिने प्रत्येकजण नियमितपणे करत आहे. मात्र अचानकपणे सत्ताधाऱ्यांना मास्क व सॅनीटायझर पुरवण्याचे शहाणपण कसे काय सुचले असा सवाल करून या खरेदी मध्ये काहीतरी अर्थकारण असल्यानेच हा घाट घालण्यात येत आहे असा आरोप देखील त्यांनी केला आहे. कोरोना कालावधीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आरोग्य, शिक्षण, ग्रामपंचायत व सर्व विभागानी अत्यंत प्रभावीपणे काम केलेले आहे. महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या मोहीमेची अंमलबजावणी देखील जिल्हा परिषदे मार्फत प्रभावीपणे सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही चांगल्या गोष्टीला आजपर्यंत जिल्हा परिषदेने कधीच विरोध केला नाही. मात्र जिथे चुकीच्या पद्धतीने व गैरव्यवहार करण्याच्या इराद्याने काही अनावश्यक बाबींचे नियोजन करण्यात येत असेल तिथे यापुढे देखील ठामपणे विरोध करू असे देखील देसाई यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा