*महापुरुषांचे अनमोल विचार जतन करणे आवश्यक’: प्र. प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी-*
वैभववाडी
देशातील महापुरुषांचे अनमोल विचार जतन करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. या अनमोल विचारावरच समाजाची वाटचाल सुरू असते असे मत प्र. प्राचार्य डॉ.एन.व्ही.गवळी यांनी व्यक्त केले.
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित
आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सांस्कृतिक व इतिहास विभागाच्यावतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६८ वा महापरिनिर्वाण दिन महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर इतिहास विभाग प्रमुख प्रा.एस.एन.पाटील, मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर. एम. गुलदे, कार्यालयीन अधीक्षक श्री.संजय रावराणे व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डी.एस.बेटकर उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महापुरुषांनी संपूर्ण समाज व देशाचे हित लक्षात घेऊन आयुष्यभर संघर्ष केला व न्याय, समता, स्वातंत्र्य यांसारखी बहुमोल अशी तत्त्वे संविधानाच्या माध्यमातून देशाला बहाल केली. बाबासाहेबांसारख्या महापुरुषांचे विचार देशातील संपूर्ण तरुणांनी स्वीकारून त्यांचे जतन करणे व आपला विकास करणे आवश्यक आहे. तेव्हाच बाबासाहेबांना खरे अभिवादन ठरेल असे अध्यक्ष भाषणात डॉ .एन.व्ही.यांनी गवळी यांनी सांगितले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महापुरुषांना कोणत्याही जाती-धर्मात न अडकवता राष्ट्रीय व्यक्ती म्हणून पाहिले पाहिजे.
भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये डॉ. आंबेडकरांचे खुप मोठे योगदान आहे. भारतीय संविधानामुळेच आपल्या देशातील लोकशाही अबाधित आहे. तसेच देशातील सर्व जाती व धर्माचे लोक एकत्रित आनंदाने राहत आहेत. म्हणूनच बाबासाहेबांसारख्या अष्टपैलू व्यक्तीचे विचार व त्यांचे कार्य आपण नेहमीच लक्षात ठेवून सर्वांनी त्याचे अनुकरण करावे, असे इतिहास विभाग प्रमुख प्रा.एस.एन.पाटील यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेबांनी शिक्षणासाठी घेतलेला संघर्ष, अमेरिका व लंडन सारख्या देशांमध्ये शिक्षण घेत असताना त्या ठिकाणी बाबासाहेबांनी केलेला अविरत अभ्यास, बाबासाहेबांचे पुस्तकांबद्दलचे प्रेम व आजच्या तरुणाईने बाबासाहेबांसारख्या महामानवांपासून प्रेरणा घेऊन आपले जीवन यशस्वी करावे असे मत मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आर एम.गुलदे यांनी व्यक्त केले.
या अभिवादन कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डी. एस. बेटकर यांनी केले.