*महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
महाराष्ट्र सरकारने आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची पुन्हा डीजीपी म्हणून नियुक्ती केली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार रश्मी शुक्ला यांना डीजीपी पदावरून हटवण्यात आले होते. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख नाना पटोले यांनी शुक्ला यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती.
विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र सरकारने आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची पुन्हा महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक (डीजीपी) म्हणून नियुक्ती केली आहे. गृह विभागाने सोमवारी (२५ नोव्हेंबर) सायंकाळी हा आदेश जारी केला.
विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार रश्मी शुक्ला यांना डीजीपी पदावरून हटवण्यात आले होते आणि त्यांच्या जागी वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय कुमार वर्मा यांची डीजीपी नियुक्ती करण्यात आली. वर्मा हे निवडणूक संपेपर्यंत डीजीपी पदावर राहणार होते, तर शुक्ला यांना या काळात सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख नाना पटोले यांच्या मागणीनंतर शुक्ला यांना पदावरून हटवण्यात आले.
तथापि, गृह विभागाच्या आदेशात म्हटले आहे की, निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर आणि रविवारी निकाल जाहीर झाले असल्याने निवडणूक आयोगाने सोमवारी आदर्श आचारसंहिता रद्द केली. त्यानंतर सरकारने शुक्ला यांचा रजेचा कालावधी संपुष्टात आणला आणि त्यांना पुन्हा डीजीपी म्हणून कामावर रुजू होण्याचे आदेश दिले. तसेच वर्मा यांनी पदभार परत त्यांच्याकडे सोपवला. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रकाशित करण्यात आला आहे.