*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*क्षितिज नमते तेथे…*
क्षितिज नमते तेथे मजला जावे वाटते रोज
काय ते गूढ लपले त्याचा घ्यावा वाटतो शोध
खुणावते मज रोज रोज ती धुसर संध्याकाळ
किती मजेने बुडती रोजच अजस्र असे पहाड..
लपेटून ते धुक्यात बसती चंदेरी सोनेरी
छटा गुलाबी निळी शेंदरी काळपट काटेरी
उन्हे चमकती कनक लपेटून शुभ्र कापसापोटी
लालचुटूक ती छटा मधूनच क्षितिज हासते ओठी..
ढग पालख्या हलके हलके वाहून नेतो वारा
रंगांची सांडते कसांडी धवल कुठे तो पारा
मध्येच दिसती खग पांथस्थ क्षितिजाकडे धावती
संध्याछाया लपेटून ते निवासस्थानी जाती…
निरोप घेता रविराजाने क्षितिज येते खाली
धरती हासते प्रियकर येता गाली उमटते लाली
विसावते मग क्षितिज धरेवर निरव शांतता होते
मिलन होता क्षितिज धरेचे विश्वच सारे गाते..
विश्वशांतीचे दूत असे ते बाहू पसरून घेती
वसुंधरा मग झेलत बसते दवबिंदूंचे मोती
रात्रीच्या निशांत समयी दोघे ही नि:शब्द
असा सोहळा पहात बसती चंद्र चांदण्या अब्ज…
मंजुळवात ते पहाटसमयी घेऊन येती गंध
हळूहळू मग दिशा उजळती क्षितिजी भरतो रंग
लाल तांबडा रथारूढ तो भास्कर ये प्राचिला
निरोप देते धरती मग त्या आवडत्या क्षितिजाला…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)