*”हक्काची अंमलबजावणी करताना कर्तव्याची जाण आवश्यक!” – ॲड. प्रकाश साळशिंगीकर*
पिंपरी
“आपल्या हक्काची अंमलबजावणी करताना आपल्या कर्तव्याची जाण असणे आवश्यक आहे!” असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. प्रकाश साळशिंगीकर यांनी खिंवसरा – पाटील विद्यामंदिर, गणेशनगर, थेरगाव येथे शनिवार, दिनांक १६ नोव्हेंबर २०२४ रोजी केले. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त दर्द से हमदर्द तक ट्रस्ट आणि विश्व हिंदू परिषद विधी प्रकोष्ठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान साक्षरता सप्ताह अभियानाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ॲड. प्रकाश साळशिंगीकर बोलत होते. क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कार्यवाह व विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सह मंत्री ॲड. सतिश गोरडे, मुख्याध्यापक नटराज जगताप, विधी प्रकोष्ठ प्रांत सह प्रमुख ॲड. सोहम यादव, पुणे महानगर प्रमुख ॲड. संकेत राव, पिंपरी – चिंचवड शहर सहप्रमुख ॲड. ऋषीकेश शर्मा, ॲड. महेश सोनवणे, ॲड. राजेश्वरी रणपिसे, ॲड. प्रतीक साखळकर आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
ॲड. प्रकाश साळशिंगीकर यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून आपल्या दैनंदिन जीवनात आपण छोट्या छोट्या गोष्टीतूनसुद्धा संविधानाने सांगितलेली कर्तव्य आणि हक्क बजावत असतो हे विद्यार्थ्यांना आणि पालकांना समजावून सांगताना, “कुटुंबातील संवाद खूप महत्त्वाचा आहे!” हा मोलाचा कानमंत्र दिला. ॲड. संकेत राव यांनी ५६५ स्वतंत्र राज्यांना भारताच्या एकसंधतेत जोडण्याचा प्रयत्न संविधानाने केला. याच संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने १६ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीमध्ये विविध शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांमध्ये ‘संविधान साक्षरता सप्ताह’ आयोजित करण्यात येणार असल्याचे नमूद करीत “आपल्या घरात धार्मिक ग्रंथांबरोबरच संविधानाची एक प्रत असलीच पाहिजे!” असे आग्रहपूर्वक आवाहन उपस्थितांना केले. प्रांत सह मंत्री ॲड. सतिश गोरडे यांनी हा उपक्रम १० विधी महाविद्यालय आणि इतर ठिकाणी घेण्यात येणार असून पाच हजारपेक्षा जास्त नागरिकांना या उपक्रमातून संविधान साक्षर करणार असल्याचे सांगितले; तसेच १०० टक्के मतदान करण्याचे आवाहन केले. नटराज जगताप यांनी आभार मानले. स्मिता जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२