शिवसेना खासदार राऊत यांचा गौप्यस्फोट..

शिवसेना खासदार राऊत यांचा गौप्यस्फोट..

सिंधुदूर्ग :

“भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी एका व्यक्तीला १२ कोटींचा गंडा घातलेला आहे. त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुरुंगात टाकणार होते, पण नारायण राणे भाजपाला शरण गेले,” असा धक्कादायक गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. “या गुन्ह्यात माजी मुख्यमंत्री फडणवीस नितेश राणेंना तुरुंगातही टाकणार होते,” असा दावाही त्यांनी  केला आहे.

शिवसेना आणि राणे कुटुंबातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. दोन्ही बाजूंनी सातत्यानं आरोप प्रत्यारोप झडताना बघायला मिळतात. त्यातच आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नितेश राणे यांच्याबद्दल खळबळ उडवून देणारा दावा केला आहे.

कणकवलीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना राऊत म्हणाले,”नितेश राणेंनी नवी मुंबईत एका व्यक्तीला १२ कोटींना गंडा घातला होता. या प्रकरणाची तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली होती. या प्रकरणी फडणवीस हे नितेश राणेंना तुरुंगात टाकणार होते. पण नारायण राणे भाजपाला शरण गेले. त्यामुळे ती केस थांबली. आम्ही मनात आणलं, तर ती केस एका दिवसात ओपन होऊ शकते. ती केस ओपन झाली, तर दुसऱ्याच महिन्यात नितेश राणे तुरुंगात गेल्याशिवाय राहणार नाहीत,” असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

“नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजला फडणवीस यांनी अखेरपर्यंत परवानगी दिली नाही म्हणून राणे दोन महिन्यांपूर्वी मातोश्रीवर दिवसातून तीन तीन वेळा फोन करत होते. अखेर उद्धव ठाकरेंनी कोकणात मेडिकल कॉलेज होत असल्यामुळे परवानगी दिली,” असा दावा राऊत यांनी केला. “उद्धव ठाकरेंना काही कळत नाही असा आरोप करता. नको कळू दे, पण टीका करताना शान राखून टीका करा,” असा राजकीय सल्ला राऊत यांनी नारायण राणे यांना दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा