You are currently viewing “दर्याचा राजा” दिवाळी अंकाचे ज्येष्ठ समीक्षक संजय डहाळे यांच्या हस्ते प्रकाशन 

“दर्याचा राजा” दिवाळी अंकाचे ज्येष्ठ समीक्षक संजय डहाळे यांच्या हस्ते प्रकाशन 

मुंबई :

“दीपावलीच्या निमित्ताने प्रकाशित होणारे दिवाळी अंक आपली परंपरा टिकवून आहेत. यामध्ये पंढरीनाथ तामोरे संपादीत “दर्याचा राजा” या दिवाळी अंकाने आपले स्थान बळकट केले आहे. सदर अंक दर्यावर्दी जीवनाला आधारित असला तरी त्यांनी विविध विषयाला गवसणी घातली आहे.” असे जेष्ठ पत्रकार तथा नाट्य समीक्षक संजय डहाळे यांनी दादर मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय स्वायत्त विभाग आयोजित १७ व्या दीपावली विशेषांक प्रकाशन प्रसंगी उपस्थित वाचक प्रेमींना मार्गदर्शन करताना प्रतिपादन केले. प्रारंभी दर्याचा राजा अंकाचे संपादक पंढरीनाथ तामोरे यांनी सांगितले की,”आज १७ वा दीपावली विशेषांक प्रकाशित होत असताना आजवर नामांकित लेखक, साहित्यिक, पत्रकार यांनी प्रकाशित केलेल्या अंकातून आम्हाला दर्याचा राजा परिवाराने योग्य मार्ग दाखवून दिला. त्या बळावरच आमचीही वाटचाल सुरू असल्याचे प्रास्ताविकातून नमूद केले.

संजय डहाळे पुढे म्हणाले की, “मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला आहे. पण मोबाईलचा उदय झाला आणि वाचक संख्या घसरणीला लागल्याचे दिसून येत असल्याबद्दल त्यांनी यावेळी खंत व्यक्त करून एक तरी पुस्तक अथवा वर्तमानपत्र विकत घेऊन वाचण्याची सवय लावण्यासाठी प्रयत्न करा” असे सूतोवाच केले. दर्याचा राजाचे सहसंपादक प्रमोद कांदळगावकर यांनी सांगितले की, “कोरोना पासून दिवाळी अंकासाठी मिळणाऱ्या जाहिराती कमी झाल्या. त्यामुळे हौसेने दिवाळी अंक काढण्यात येत असलेल्या संपादक आणि प्रकाशक यांच्या पुढे यक्षप्रश्न उभा राहिला. त्यातून सावरून दर्याचा राजा परिवार दिवाळी अंक देण्याचा प्रयत्न करीत आहे.”

यावेळी सहसंपादक वसंत तांडेल, वरळी साने गुरुजी कथामाला अध्यक्ष देवकीनंदन मुकादम, जयवंत गावडे आदींनी विचार मांडले. या रंगतदार समारंभाचे आभार प्रदर्शन दर्याचा राजा अंकाचे कार्यकारी संपादक जनार्दन पाटील यांनी केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने दिवाळी अंक वाचनप्रेमी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा