कलाकारांना एकत्र आणणारी कला म्हणजे नाट्य कला – सुषमा मांजरेकर
दाणोलीतील रंगभूमी दिन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद…
सावंतवाडी
भिन्न-भिन्न कलाकारांना एकत्र आणणारी कला म्हणजे नाट्य कला. नाट्य संस्कृतीतून जनजागृती करता येते. ज्वलंत प्रश्न नाटकातूनच मांडता येतात व जनजागृती करता येते.त्यामुळे नाट्य संस्कृती जोपासण्यासह नाट्यकाला जिवंत राहणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन प्रा. सुषमा मांजरेकर यांनी केले.
दाणोली येथील साटम महाराज वाचन मंदिरच्यावतीने आयोजित रंगभूमी दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष भरत गावडे, सदस्य गिरीधर चव्हाण, प्रिया सांगेलकर, मुख्याध्यापिका संगीता सोनटक्के आदी उपस्थित होते. यावेळी सौ. मांजरेकर पुढे म्हणाल्या, ग्रामीण भागातील लोकांसाठी त्यांच्या मनोरंजनासाठी साटम महाराज वाचनालयाच्यावतीने दरवर्षी दर्जेदार दिवाळी अंक उपलब्ध करून दिले जातात ही गौरवाची बाब आहे. वाचन संस्कृती वाढवले पाहिजे तरच आपले मराठी भाषा टिकणार आहे असे विचार व्यक्त केले.
दरम्यान सौ. मांजरेकर यांचा संस्थेच्यावतीने शाल श्रीफळ ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती करणाऱ्या शिक्षका सौ. संगीता सोनटक्के व रिया सांगेलकर यांचाही ग्रंथ व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल दीपा सुकी, माधुरी चव्हाण, भक्ती खटावकर यांनी नियोजन केले. या कार्यक्रमाला वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रगती परांजपे यांनी आभार मानले.