सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विशाल परब
विरोधकांच्या प्रचाराला बडे नेते येतील, पण माझा स्टार प्रचारक हा सर्वसामान्य शेतकरी असेल, कुणी काटे पसरवले, तर मी फुल पसरवणार! मला सर्वसामान्य शेतकऱ्याचं जीवनमान सुधारण्यासाठी जनतेसोबत राहून काम करायचं आहे. सोन्याचा चमचा घेऊन मी जन्माला आलो नाही, सर्वसामान्य शेतकऱ्यांचे दुःख काय असते,याची मला जाण आहे. अशी प्रतिक्रिया सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी संवाद मीडियाशी बोलताना दिली.
सामाजिक, शैक्षणिक, तरुणांना रोजगार या कार्याबरोबरच दर्जेदार सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्रात परिचित झालेल्या अवघ्या ३६ वर्षीय विशाल परब यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात युवा नेता म्हणून आपली ओळख निर्माण केली. युवकांचे प्रेरणास्थान म्हणून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात नावलौकिक मिळविलेल्या विशाल परब यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून विधानसभा लढविण्याचा आग्रह धरला गेला.
विशाल परब सावंतवाडी विधानसभा लढविणार, याची खात्री भाजपाच्या पक्षश्रेष्ठींना झाल्यावर युतीचा धर्म पाहण्यासाठी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशाल परब यांच्याशी संवाद साधला. त्याचे कॉल रेकॉर्डिंगही फिरत आहे.
कमी वयात जनाधार मिळत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रस्थापित राजकीय नेत्यांना विशाल परब हे अवजड जागेवरचे दुखणे ठरले आहे. पैसे आले कुठून? कवडी मुलाने शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करायच्या, अमली पदार्थाची तस्करी, नामोल्लेख न करता असे आरोप होऊ लागले आहेत.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढतीत पक्षाचे पाठबळ नसताना अपक्ष म्हणून रिंगणात असलेल्या विशाल परब यांच्याच नावाची चर्चा आहे.
अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवितांना गॅस शेगडी ही निशाणी मिळाल्यावर विशाल परब यांनी मंगळवारी मतदार संघातील युवक युवतींच्या गर्दीत शहरातील देवदेवतांचे दर्शन घेऊन प्रचारास प्रारंभ केला.
आमच्या प्रस्तुत प्रतिनिधीने विशाल परब यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी सर्वसामान्य शेतकरी हाच माझा स्टार प्रचारक असेल, मी सर्वसामान्य कुटुंबात जन्मलो, माझे वडील जंगलात काम करायचे, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या दुःखाची मला जाण आहे. त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी मी काम करणार आहे. कुणी काटे पसरविले तर मी फुलच पसरविणार अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.