You are currently viewing रुग्णांना आपलीशी वाटणारी ‘आरती’ हिचा दुर्दैवी मृत्यू; सहकाऱ्यांना दुःख अनावर पण…?

रुग्णांना आपलीशी वाटणारी ‘आरती’ हिचा दुर्दैवी मृत्यू; सहकाऱ्यांना दुःख अनावर पण…?

*रुग्णांना आपलीशी वाटणारी ‘आरती’ हिचा दुर्दैवी मृत्यू; सहकाऱ्यांना दुःख अनावर पण…?*

*प्रेमळ नर्स म्हणून परिचित असलेल्या ‘आरती’चा मृत्यू वेदनादायी..*

सावंतवाडी: सावंतवाडी येथील राणी जानकीबाई सुतिकागृहाच्या स्टाफ नर्स ज्योती(आरती) अमर बागकर (वय ४५) रा. टाक,आरवली, वेंगुर्ला यांचा ३१ ऑक्टो.२०२४ रोजी रात्री ९.०० वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी शहराच्या लगतच्या एका खाजगी रुग्णालयात उपचाराअंती हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. आरती यांच्या मृत्यू पश्चात त्यांचे निकटवर्तीय, हॉस्पिटल स्टाफ आदी सर्वांना धक्काच बसला, अनेकांचे डोळे पाणावले, कित्येकांना अश्रू अनावर झाले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आणि कित्येक रुग्णांना जवळची, आपलीशी वाटणाऱ्या आरती हिच्या आयुष्याची अखेर झाली. स्वतःला मुलं नसल्याने इतर कर्मचाऱ्यांच्या मुलांवर प्रेम करणारी आरती ही शांत, हसमुख, सुस्वभावाची नर्स. रुग्णांची आस्थेने चौकशी करणारी, गोरगरीब रुग्णांना एकवेळ स्वतः जेवण आणून देणारी प्रेमळ नर्स म्हणून परिचित होती. त्यामुळे तिच्या जाण्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली. पण हे असे अचानक कसे घडले..? हा प्रश्न मात्र कित्येकांच्या मनाला सतावत राहिला आणि राहणार जोपर्यंत त्याची उकल होत नाही तोपर्यंत..! नक्कीच एक प्रेमळ, मायाळू नर्स म्हणून परिचित असणाऱ्या आरतीचा मृत्यू वेदनादायी आहे..! परंतु तिच्यावर झालेल्या उपचाराची पद्धत देखील तिटकारा आणण्यासारखीच..!
दि.२९ ऑक्टो. रोजी धनत्रयोदशी दिवशी रोजच्या प्रमाणे आरती कामावर आली होती. परंतु अचानक तिला अस्वस्थ वाटू लागले आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला म्हणून त्यांना गेली १५ वर्षे नर्स म्हणून त्या काम करत असलेल्याच राणी जानकीबाई सुतिकागृहात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले. परंतु ज्योती उर्फ आरती यांच्यावर रुग्णालयातील कोणत्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले..? कुठल्या डॉक्टरने त्यांची तपासणी केली..? कोणत्या आजारावर उपचार झाले..? डायबिटीस असलेल्या रुग्णाला उलट्या होत असताना त्यांचा एक तरी इसीजी काढला का..?
या प्रश्नांची जेव्हा उत्तरे रुग्णालय प्रशासनाकडून मिळणार, रुग्णालयातील आरती यांचे उपचार झालेले कागदपत्र तपासणी होणार; तेव्हाच आरती यांचा मृत्यू का झाला..? हे कोडे सुटणार आहे. परंतु रुग्णालय प्रशासन, पोलीस प्रशासन याची चौकशी करणार का..? हाच प्रश्न अनुत्तरित आहे.
आरती यांना २९ रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर रुग्णालयातील रिटायर्ड वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी जे सुट्टीवर आपल्या हजार किलोमिटर वरील गावी गेले असताना रुग्णालयातील नर्सनी त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधून आरती यांना होत असलेल्या त्रासाची माहिती दिली आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या सूचनेप्रमाणे औषधोपचार सुरू केले..? अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. परंतु कोणीही वैद्यकीय अधिकारी असो कितीही मोठे, अनुभवी असो रुग्णाची स्वतः तपासणी करूनच उपचार करतात. केवळ ऐकीव माहितीवर कोणी औषधे देत नाहीत तर रुग्णाचा चेहरा, डोळे, जीभ, नाडी आदी तपासणी करून प्राथमिक निदान करतात आणि इतर चाचण्या अंती उपचार सुरू करतात. परंतु, हजार किलोमीटर दूर असणाऱ्या अधिकाऱ्यांनी आरती यांची तपासणी केली कशी..? जर स्वतः तपासणी केली नसेल तर तीन दिवस उपचार कसे काय केले..?
आरती यांना दोन दिवस उलट्या होतात म्हणून त्यांची सोनोग्राफी करून त्यांना मुतखडा असल्याचे निदान केल्याचे समजते आहे. परंतु उलट्या होणे हे केवळ मुतखड्याचेच लक्षण आहे का..? हृदयविकाराचा झटका येण्याचे लक्षण नाही का..? गेली १५/२० वर्षे नर्स म्हणून नोकरी करणाऱ्या रुग्णालय कर्मचाऱ्यांना रुग्णाचा चेहरा आणि होणाऱ्या त्रासाची लक्षणे पाहून रुग्णाचा आजार काय असू शकेल याची पुसटशी कल्पना कशी काय आली नाही..?
आरती यांना होत असलेला त्रास सर्वसामान्य आहे असा समज करून सहकारी नर्सनी त्यांचा आजार एवढा हलक्यात कसा काय घेतला..?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरती हिने सुतिकागृहातच मान टाकली होती. ती तिथेच गंभीर झाली होती..
मग, आरती यांना अखेरची घटका मोजेपर्यंत वैद्यकीय अधिकारी स्वतः रुग्णाच्या जवळ अनुपलब्ध असताना कोणाच्या जीवावर रुग्णालयात उपचार सुरू ठेवले होते..?
आरती यांना डायबिटीसचा त्रास होता आणि दोन दिवस उलट्या होत असताना हजार किलोमिटर वरून फोनवर संवाद साधून त्यांच्यावर उपचार करत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांचा एकदाही इसिजी काढावा असे का वाटले नाही..?
यावरही कहर म्हणजे…
उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी स्वतः उपलब्ध नसताना राणी जानकीबाई सुतिकागृहामध्ये उपलब्ध असलेल्या हृदयविकार तज्ञ डॉ.नंदादीप चोडणकर यांच्याकडून उपचार करून घेण्याची शिफारस त्यांनी का केली नाही..?
किंवा फोनवरून हजार किलोमिटर दूर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार करून घेण्यापेक्षा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी डॉ.चोडणकर यांना आरती यांच्यावर उपचार करण्यास पाचारण का केले नाही..?
अनेक रुग्णांना हृदयविकार, लकवा आदी आजारातून ठीक करणाऱ्या डॉ.चोडणकर यांच्यावर रुग्णालयातील नर्स आदी कर्मचाऱ्यांचा विश्वास नाही का..?
परंतु, असा कोणताही चांगला आणि योग्य निर्णय न घेता योग्य निदान न करता आरती यांच्यावर मुतखड्यासाठीचे उपचार केले गेले, त्यांच्या दुखण्यावर इंजेक्शन्स दिली गेली त्याच इंजेक्शन्सचा आरती यांना जास्त त्रास झाला का..?
ज्या मूळ आजारावर औषधोपचार होणे आवश्यक होते तो बाजूलाच राहिला आणि तात्काळ उपचाराची आवश्यकता नसलेला आजार केंद्रस्थानी ठेवल्याने अखेर त्यांची प्रकृती अतिशय गंभीर झाल्यावर घाबरून त्यांना तातडीने सावंतवाडी शहराच्या बाहेरील एका खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले. दुर्दैवाने तिथेच आरती यांनी अखेरचा श्वास घेतला.
कदाचित…,
वेळीच रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ.चोडणकर यांना आरती यांच्यावर उपचार करण्यास सांगितले असते किंवा रुग्णालयाकडून योग्य निदान होत नव्हते तर गोवा अथवा इतरत्र जाण्याची शिफारस केली असती तर ज्योती उर्फ आरती यांचे प्राण वाचले असते, त्यांचा संसार उघड्यावर पडला नसता.
रुग्णालयाकडून आपल्याच रुग्णालयात कार्यरत असलेल्या नर्सच्या बाबतीत अशी हेळसांड होत असेल, बेजबाबदारपणे उपचार होत असतील तर सर्वसामान्य माणसांचे काय होईल..? हा प्रश्न आज ऐरणीवर आला आहे.
आरती यांच्यावर तीन दिवस ज्याप्रमाणे चुकीच्या पद्धतीवर आधारित उपचार केले त्या कर्मचाऱ्यांनी चार अश्रू गाळून आपले दुःख व्यक्त केले.. पण, आरती हिच्या मृत्यूस कारणीभूत कोण..? चुकीची उपचार पद्धती..? योग्य निदान न करता/होता झालेले चुकीचे उपचार..? की रुग्णालयात हृदयरोग तज्ञ कार्यरत असताना त्यांना कोणतीही कल्पना न देता आरती हिला फोनवरच्या ऐकीव माहितीवर उपचार करून मृत्यूच्या दाढेत ढकलणाऱ्या रुग्णालयातील नर्सेस..?
आरती हिच्या जाण्याचा शोक करण्यासाठी तिची मुले नाहीत आहे तो केवळ तिचा एकटा नवरा…जो आज आरती हिच्या वाचून एकटा पडला आहे.. किंवा चुकीच्या उपचारांमुळे उघड्यावर पाडले गेले आहे.
आरतीवर झालेले उपचार योग्य होते की अयोग्य..?
उपचार करण्याची पद्धत बरोबर की चूक..?
काय केले पाहिजे होते..? काय करता नये होते..?
आज याचा उपयोग शून्य असेल..
परंतु, पुन्हा कुठल्या ज्योती…आरती वर अशाप्रकारे चुकीच्या पद्धतीने हवेत उपचार होऊ नयेत.. आणि कुठल्या अमरची आरती त्याच्यापासून दुरावू नये यासाठी ज्योती अमर उर्फ आरती बागकर हिच्यावर झालेल्या उपचाराची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे.. तिच्यावर केलेल्या उपचारांची कागदपत्रे तपासली गेली पाहिजेत आणि त्यात जर कोणी दोषी असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे..
रुग्णालय प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने याची योग्य ती दखल घेऊन सत्य उजेडात आणावे अशी सर्वसामान्यांची इच्छा आहे..
कोणीही कारवाईतून सुटले तरी आरतीचा आत्मा….

प्रतिक्रिया व्यक्त करा