You are currently viewing अखेर सौ. अर्चना घारे परब लढणार जनतेचा उमेदवार म्हणूनच..

अखेर सौ. अर्चना घारे परब लढणार जनतेचा उमेदवार म्हणूनच..

*अखेर सौ. अर्चना घारे परब लढणार जनतेचा उमेदवार म्हणूनच..*

*संपादकीय*

सावंतवाडी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभाग समन्वयक सौ. अर्चना घारे परब यांनी आपली उमेदवारी कायम ठेवून जनतेचा उमेदवार म्हणून अपक्ष लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग मतदार संघात चौरंगी लढत होणार असून विधानसभेच्या रिंगणात कोण बाजी मारणार हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.
सावंतवाडी मतदार संघातून २०१९ ला ऐनवेळी निवडणुकीतून माघार घ्यावयास लागलेल्या सौ. अर्चना घारे परब यांनी २०२४ च्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खासदार अमोल कोल्हे यांनी सावंतवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक घेऊन सौ.अर्चना घारे परब यांच्या उमेदवारीवर जवळपास शिक्कामोर्तब केले होते. परंतु ऐनवेळी भाजपाचे नेते माजी आमदार राजन तेली यांनी तिकीट मिळण्याच्या महत्वाकांक्षेने भाजपाला रामराम करून उबाठा सेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राजन तेली यांचे नाव पुढे आले आणि आपोआपच सौ. अर्चना घारे परब यांचे नाव मागे पडले. मतदारसंघातील गेल्या आठ वर्षाच्या पक्षबांधणीनंतर सौ.अर्चना यांना ऐनवेळी माघार घेणे शक्य न झाल्याने आणि मतदार संघातील जुन्या जाणत्या मतदारांनी पाठीवर आशीर्वादाचा हात ठेवल्यामुळे दाखल केलेली अपक्ष उमेदवारी कायम ठेवत जनतेचा उमेदवार म्हणून अपक्ष लढण्याचे घोषित केले. मंगळवारी त्यांचे मूळ गाव असलेल्या भालावल येथील देवीचे दर्शन घेऊन त्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत.
*राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते महाविकास आघाडीच्या पाठीशी*
नाम.दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीला रामराम केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस केवळ नाममात्र शिल्लक राहिली होती. पदे होती पण पद सांभाळायला कोणी कार्यकर्ते उरले नव्हते. जिल्ह्यात एकवेळ पहिल्या दुसऱ्या नंबरवर असलेली राष्ट्रवादी शेवटच्या क्रमांकावर घसरली होती. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, अमित सामंत असे नेमके शिलेदार वगळता नावारुपास आलेला एकही नेता राष्ट्रवादीमध्ये राहिला नव्हता. तळ्यात मळ्यात भूमिकेत असलेले बबन साळगावकर देखील शिवसेनेकडून नगराध्यक्ष पद भोगलेले असताना सुद्धा केवळ केसरकर विरोध म्हणून आपण राष्ट्रवादीतच असे म्हणत होते. पण या नेत्यांकडून राष्ट्रवादी हे नाव घेण्याशिवाय राष्ट्रवादी वाढविण्याचे प्रयत्न होत नव्हते. इतर जिल्ह्यात जे उरले सुरले नेते होते त्यांच्यामध्ये देखील वाद होते. अशावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढविण्याची आणि जिल्ह्यात राष्ट्रवादी जोमाने उभी करण्याची जबाबदारी पुणे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नगरसेविका असलेल्या सौ.अर्चना घारे परब यांच्यावर कोकण विभाग समन्वयक म्हणून देण्यात आली. सावंतवाडी येथे माहेर असलेल्या सौ.अर्चना घारे परब यांनी जिल्ह्यात येऊन जोमाने कामाला सुरुवात केली. पवार कुटुंबीयांशी असलेले घरगुती संबंध यामुळे सुप्रिया सुळे, अजितदादा यांचा देखील त्यांना वरदहस्त होता. सौ.अर्चना घारे परब यांनी कोलमडून पडलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधील मरगळ दूर करून लढण्याचे बळ निर्माण केले. रसातळाला गेलेली राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात अजूनही शिल्लक आहे हे जनतेला दाखवून देत ग्रामपंचायतींमध्ये लढण्यास कार्यकर्त्यांना ताकद दिली. अती पावसाने आलेल्या पूरस्थिती मध्ये जनतेला मदतीचा हात देत समाजकार्यातून आपला ठसा उमटविला, गावागावांमध्ये महिला बचत गटांना बळ देत कार्यरत करत पक्षाची ताकद वाढविली. सुप्रिया सुळेंना जिल्हा दौऱ्यावर आणून महिला वर्गाला जागृत केले. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस हळूहळू उभी राहू लागली. माजी राज्यमंत्री असलेल्या प्रवीण भोसले आणि जितेंद्र आव्हाड यांच्या जवळचे मानले जाणाऱ्या जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांना जे जमले नाही ते पवार कुटुंबियांच्या शिकवणीत तयार झालेल्या सौ. अर्चना घारे परब यांनी अवघ्या काही दिवसांमध्ये करून दाखवले आणि केवळ सावंतवाडी मध्येच नव्हे तर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा उभारी घेतली.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली तरीही विचलित न होता सौ.अर्चना घारे परब यांनी शरद पवारांना साथ देत पवार कुटुंबाशी एकनिष्ठ असल्याचे दाखवून दिले. राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले तरी आपली समाजसेवा निरंतर सुरू ठेवत सावंतवाडी मतदारसंघात राष्ट्रवादीची तुतारी वाजत ठेवली. कवी केशवसुतांनी “एक तुतारी दे मज आणुनी फुंकिन मी ती तव प्राणाने” म्हटले तसे सौ.अर्चना यांनी शरद पवारांनी हाती धरलेली तुतारी ज्वलंतपणे फुंकत मतदारसंघात आपली वेगळी छाप सोडली. बचतगट, गावागावातून महिला वर्गाला आपल्या कार्याने प्रेरित करत त्यांनी महाविकास आघाडीचा प्रबळ उमेदवार म्हणून स्वतःला तयार केले. दीपक केसरकर यांच्या समोर एक आव्हान निर्माण केले असतानाच महाविकास आघाडीत बिघाडी झाली. सावंतवाडीतील शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर असणार हे पक्के झाल्यावर भाजपाचे मा आम. राजन तेली यांनी शिवसेनेशी संधान साधून सावंतवाडीतील उमेदवारी देण्यासाठी गळ घातली. अन् सावंतवाडीची जागा उबाठास सोडण्याचा निर्णय झाला. सौ.अर्चना घारे परब यांनी शरद पवारांचा दरवाजा ठोठावून देखील काही उपयोग झाला नाही आणि शेवटी सौ.अर्चना घारे परब यांनी जनतेचा अमाप प्रतिसाद आणि आशीर्वाद मिळाल्याने अपक्ष उमेदवारी दाखल केली.
*माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी पक्षाध्यक्ष शरद पवारांशी राजन तेलींची घडवून आणली भेट*
सावंतवाडी मतदारसंघात नाम.दीपक केसरकर यांच्याकडून दारुण पराभव झालेले प्रवीण भोसले पुढे राजकारणात कधीच प्रबळ नेत्याच्या भूमिकेत दिसले नाहीत. माजी राज्यमंत्री हीच त्यांची ओळख शिल्लक राहिली असताना आणि सावंतवाडी तालुक्यातच नव्हे तर शहरात देखील एक नगरसेवक निवडून आणण्याची ताकद नसलेल्या आणि जिल्ह्यातच नव्हे पण सावंतवाडी शहरात देखील कार्यकर्ता निर्माण न केलेल्या माजी मंत्री प्रवीण भोसले यांना सौ.अर्चना घारे परब यांच्यामुळेच अनेकदा विचार व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ मिळाले. कार्यकर्त्यांशी मानाने संवाद साधण्याची संधी मिळाली. परंतु या संधीचे सोने करून पक्षासाठी भरीव असे काम न करता त्यांनी प्रत्येक भाषणातून त्यांच्या आयुष्यात त्यांना राजकारणातून धावचीत केलेल्या नाम.दीपक केसरकर यांच्यावरच टीका करण्यात धन्यता मानली. जनाधार पूर्णपणे हरवलेल्या त्याच प्रवीण भोसले यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळत उबाठाचे नवे नेते आणि महाविकास आघाडीचे विधानसभा उमेदवार राजन तेली यांना राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी नेत आपली ज्येष्ठता सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. परंतु सावंतवाडी मधून जेवढे कार्यकर्ते सौ.अर्चना घारे परब यांच्या सोबत आहेत त्याच्या एक टक्का तरी कार्यकर्ते माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या सोबत आहेत का..? याचा विचार करणे आवश्यक ठरते.
राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार झाली तेव्हा जितेंद्र आव्हाड यांच्या जवळचे म्हणून अमित सामंत यांच्यावर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली. परंतु त्यांच्याकडून जिल्ह्यातच नव्हे तर कुडाळ मध्ये देखील संघटना बांधणी होऊ शकली नाही. तालुकावार पक्ष बांधणी देखील त्यांना योग्य रीतीने करता न आल्याने आधीच रसातळाला गेलेल्या पक्षात दोन गट पडले. आबिद नाईक आणि सामंत असे दोन गट जिल्ह्यात कार्यरत राहिले. अजित पवार यांनी पक्ष फोडल्यानंतर अबिद नाईक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष झाले. घड्याळ निशाणी त्यांच्याकडे गेल्याने अमित सामंत यांनी जितेंद्र आव्हाड जिथे आपण तिथे म्हणत तुतारी हाती धरली. पण सौ.अर्चना घारे परब यांनी खऱ्या अर्थाने शरद पवार यांची पाठराखण करत राष्ट्रवादीचा झेंडा फडकत ठेवला. अनेक कार्यक्रमांमध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून अमित सामंत यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. परंतु ज्यावेळी एक महिला पदाधिकारी मैदानात उतरून लढत होती त्यावेळी सौ.अर्चना घारे परब यांना पाठबळ देण्यापेक्षा वाऱ्यावर सोडून राष्ट्रवादीचे जिल्ह्यात तीन भाग करण्यात धन्यता मानली आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादी संपविण्यासाठी मदत केली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण जिल्ह्यात उबाठा उभी राहण्यासाठी मदत मागत असताना आपली काठी त्यांना देऊन राष्ट्रवादी निराधार झाली आहे. निवडणुकीनंतर उबाठा कार्यकर्त्यांच्या जोरावर भक्कम उभी असेल पण राष्ट्रवादी मात्र दिशा हरवलेल्या शिडाच्या होडीसारखी किनारा शोधत वाऱ्याची दिशा जिथे नेईल तिथे वाहवत जाताना दिसेल हे मात्र नक्की..!
जिल्ह्यातील राष्ट्रवादीने उसने अवसान आणून महाविकास आघाडीचा उधारीचा बुरखा पांघरून कट्टर सैनिक असल्याचे दाखवण्यापेक्षा आपल्याच पक्षाच्या सौ.अर्चना घारे परब यांना पाठबळ दिले असते तर…”झाकली मूठ सव्वा लाखाची” म्हणून पक्षाचे अस्तित्व तरी जिवंत ठेवता आले असते.

प्रतिक्रिया व्यक्त करा