You are currently viewing श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्र न्यासाच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यालयाचे कुडाळमध्ये भव्य मिरवणुकीसह जल्लोषात उद्धाटन

श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्र न्यासाच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यालयाचे कुडाळमध्ये भव्य मिरवणुकीसह जल्लोषात उद्धाटन

ह.भ.प. श्री विश्वनाथ गवंडळकर यांनी संघाचे विभाग संघचालक बाबा चांदेकर, आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कापली फित!

आमदार नितेश राणे यांनी श्रीफळ वाढवत केला “निधी समर्पण” कार्यक्रमाचा शुभारंभ

कुडाळ

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्रासाठी निधी संग्रह महाभियान योजना देशभरात राबवली जात आहे. स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकासाठी ज्याप्रमाणे प्रत्येक राष्ट्रवासीयांचा सहयोग स्वीकारत राष्ट्राचे प्रतिक म्हणून ते स्मारक उभे राहिले त्याप्रमाणे राष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या या श्रीरामरुपी राष्ट्रमंदिराचे निर्माण हे अतिभव्य असावे, पण त्यात प्रत्येक भारतीय कुटुंबाचे योगदान असावे यासाठी न्यासनिर्मीती करत मन्दिर निर्माण होत आहे.

भव्य मंदिरासोबतच अयोध्या क्षेत्रात सुंदर संग्रहालय, सुसज्ज ग्रंथालय, ३६० अंशातले अँफीथिएटर, यज्ञशाळा, धर्मशाळा, संमेलनकेंद्र, सत्संग भवन, अभिलेखागार, संगीत कारंजे, अतिथी भवन, तीर्थयात्री सुविधा केंद्र, प्रदर्शनी आदी भवनांची भारताचा ऐतिहासिक वारसा ठरावी, अशा पद्धतीची भव्य निर्मिती होणार आहे. आजवर परकीय आक्रमकांनी अपमानित केलेल्या भारतीय अस्मितेच्या सन्मानाची ही सुवर्णसंधी प्रत्येक भारतवासीयाला शतकांच्या प्रतीक्षेनंतर आणि लढ्यानंतर आज मिळत आहे. राष्ट्राच्या अस्मितेचे प्रतिक असलेल्या या मंदिर निर्माणासाठी देशभरातील प्रत्येक परिवाराचा हात असावा, त्याचे त्याच्या परीने काहींना काही योगदान असावे या हेतूने किमान चार लाख गावांपर्यंत, ११ करोड कुटुंबांपर्यंत यातून पोहोचायचे असे अभियानाला अभिप्रेत आहे. किमान दहा रुपयांपासूनची कुपने यासाठी रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मकर संक्रातपासुन सुरू होणाऱ्या या अभियानात जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्यासाठी आपण कार्यरत राहिले पाहिजे असे विचार व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वच वक्त्यांनी मांडले. आमदार नितेश राणे यांनी युवकांसाठी राष्ट्र कार्याचे विचार जोपासण्याची व प्रत्यक्षात उतरवण्यासाठी रस्त्यावर येत कृती करण्याची हीच वेळ असल्याचे सांगीतले. या कार्यासाठी आपल्या संकल्पनेतुन खास तयार केलेला रथ येत्या दोन दिवसात येत असून संपूर्ण जिल्हा रामभक्तीने भारून जाऊ दे, त्यासाठी माझ्या खांद्याला खांदा लावत भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या कार्यात आपला सहभाग द्यावा, असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा वारकरी संप्रदाय अध्यक्ष ह.भ.प श्री. विश्वनाथ गवंडळकर, विश्व हिंदू परिषद माजी अध्यक्ष ह.भ.प. श्री. श्रीराम झारापकर, मा.जिल्हा सरसंघचालक श्री.बाबा चांदेकर, कुडाळ शहराचे नगराध्यक्ष ओंकार तेली, रविकांत मराठे, भाऊ शिरसाट, सतीश घोडगे तसेच विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि परिवारातील स्वयंसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री. विवेक मुतालिक सर यांनी सूत्रसंचालन केले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा