जिल्हा माहिती कार्यालयात कार्यरत मीडिया सेंटरला दिली भेट
माध्यम सनियंत्रण समितीने पेड न्यूजवर बारकाईने लक्ष ठेवावे
-निवडणूक खर्च निरीक्षक श्रीम दिव्या के.जे.
सिंधुदुर्गनगरी
भारत निवडणूक आयोगाने विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू केली आहे. या निवडणुकीत माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीची भूमिका महत्वाची आहे. या समितीने माध्यमांचे सनियंत्रण करताना पेड न्यूजवर बारकाइने लक्ष ठेवावे, असे निर्देश निवडणूक खर्च निरीक्षक श्रीम दिव्या के.जे.यांनी आज दिले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हा माहिती कार्यालयामध्ये माध्यम नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या मीडिया सेंटरला आज सकाळी निवडणूक खर्च निरीक्षक निवडणूक खर्च निरीक्षक श्रीम दिव्या के.जे यांनी भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी खर्च नियंत्रण समिती नोडल अधिकारी शिवप्रसाद खोत, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीमती राजश्री पाटील, जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी मुकुंद चिलवंत, लेखा अधिकारी प्रमोद चिंदरकर आदी उपस्थित होते.
निवडणूक खर्च निरीक्षक श्रीम दिव्या के.जे.म्हणाल्या, निवडणूक कालावधीत पेड न्यूजवर लक्ष ठेवणे महत्वाचे आहे. पेड न्यूज आढळून आल्यास तत्काळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून द्यावी. समितीच्या निर्णयानुसार पेड न्यूजचा खर्च उमेदवारांच्या खर्चात समाविष्ट करावा. तसेच स्थानिक केबल नेटवर्कवरील पेड न्यूज, जाहिरातींचेही सनियंत्रण करावे. सोशल मीडियावर तिनही विधानसभा निवडणूकीत ऊभे राहणाऱ्या उमेदवाराच्या फेसबुक, एक्स, इन्स्ट्राग्राम तसेच इतर सोशल मिडीयावर प्रसारीत होणाऱ्या जाहिराती, पोस्टवर लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात.
जिल्हा माहिती अधिकारी तथा मिडीया कक्षाचे नोडल अधिकारी श्री. चिलवंत यांनी माध्यम कक्षाच्या कामकाजाची सविस्तर माहितीसह दैनंदिन सादर करण्यात येणाऱ्या अहवालांची माहिती दिली. या समिती मार्फत इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या राजकीय जाहिरातींना प्रमाणित केले जाते. याशिवाय वृत्तपत्रात, विविध वाहिन्यांवर तसेच सोशल माध्यमांवर उमटणाऱ्या जाहिराती, बातम्या, पोस्ट बघून यामध्ये पेड न्यूजच्या प्रकारात माहिती दिली तर जात नाही याचे निरीक्षण केले जाते. सोशल माध्यमांवर छुपा प्रचार सुरू तर नाही ना याची देखील पाहणी केल्या जाते. छुप्या पद्धतीने, परवानगी न घेता पेड न्यूजच्या माध्यमाने उमेदवारांनी प्रचार सुरू केला असल्यास एमसीएमसी समिती झालेला सर्व खर्च त्यांच्या खात्यामध्ये जिल्ह्याच्या खर्च विभागामार्फत दाखल केल्या जात असल्याचेही श्री चिलवंत यांनी सांगितले. माध्यम कक्षाचे कामकाज जाणून घेतल्यानंतर निवडणूक निरीक्षक श्रीम दिव्या के.जे यांनी समाधान व्यक्त केले.