मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
ज्ञानदीप मंडळ संचालित सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय सत्पाळा विरार पश्चिम येथे मॉन्सिनियर फ्रान्सिस कोरीया आणि फादर थॉमस डिसोजा व संपूर्ण गार्डवेल परिवार यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक २० ऑक्टोबर २०२४ रोजी गार्डवेल परिवाराने आर्थिक सहाय्य केलेल्या सुसज्ज सेमिनार हॉलचे उद्घाटन संपन्न झाले.
उद्घाटनप्रसंगी बोलताना मॉन्सिनियर कोरीया म्हणाले,” कोणत्याही महाविद्यालयाची सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी पायाभूत सोयी अत्यंत आवश्यक असतात .आज या अद्ययावत सेमिनार हॉलमुळे महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर व्यक्तीमत्व विकास साधणे सोपे जाईल.” मॉन्सिनियर कोरीया यांनी अध्यक्षीय भाषणातून स्वर्गीय ॲंथोनी तुस्कानो यांच्या दानशूरपणाचे आणि त्यांच्या दिलदार व्यक्तिमत्त्वाचे अनेक किस्से सांगितले. मॉन्सिनियर कोरीया यांनी गार्डवेल इंडस्ट्रीचे संस्थापक ॲंथोनी तुस्कानो यांच्याबरोबर असलेल्या ऋणानुबंधांना उजाळा दिला. एक यशस्वी उद्योजक होण्यासाठी आवश्यक असणारे सगळे गुण ॲंथोनी यांच्याकडे होते याबद्दल मॉन्सिनियर कोरीया यांनी गौरवोद्गार काढले.
“मी महाविद्यालयातून स्वेच्छा निवृत्ती घेतली असली तरी माझी नाळ अजूनही महाविद्यालयाशी आणि होतकरू विद्यार्थ्यांची जोडलेली आहे.” महाविद्यालयाच्या वतीने केलेल्या गार्डवेल परिवाराच्या सत्काराला उत्तर देताना डॉक्टर जॉना तुस्कानो यांनी अशा भावपूर्ण शब्दांत आपले मनोगत मांडले.
फादर थॉमस डिसोजा गार्डवेल परिवाराच्या दानशूरपणाचे कौतुक करताना म्हणाले,”कधीच कोणत्याही सन्मान अथवा पुरस्काराची अपेक्षा न करता आपल्या कमाईचा एक हिस्सा समाजाला अर्पण करणारा गार्डवेल परिवार अतुलनीय आहे.
ज्ञानदीप मंडळाचे अध्यक्ष फ्रान्सिस तुस्कानो यांनी गार्डवेल परिवाराचे आभार व्यक्त केले आणि या सेमिनार हॉलचा उपयोग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी होईल, असे आश्वासन दिले.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कविता आल्मेडा यांनी डॉ. जॉना तुस्कानो यांच्या दातृत्वाचे महत्त्व उदाहरणे देऊन समजावून सांगितले. प्राचार्या आपल्या मनोगतात म्हणाल्या की, गार्डवेल परिवार आमच्या महाविद्यालयाची आर्थिक उर्जा आहे.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुभाष डिसोजा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. सुभाष यांनी स्वर्गीय ॲंथोनी तुस्कानो यांचा उल्लेख ‘वसईचे रतन टाटा असा करताच!’ संपूर्ण सभागृह भावूक झाले.
सहाय्यक प्राध्यापक जगदीश संसारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या स्नेहल कवळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.