सावंतवाडी :
निवडणुक काळात मतदार संघात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी ९ स्थिर पथके तर ६ भरारी पथके तैनात करण्यात आली असून १ हजार ८०० कर्मचारी निवडणुक कामकाजासाठी नेमण्यात आले आहेत, अशी माहीती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिली.
दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी उद्या पासून अर्ज दाखल करण्याची प्रकीया सुरू होणार आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कालावधीत उमेदवार आपले अर्ज दाखल करु शकतो. मात्र यावेळी फक्त पाच माणसेच कार्यालयात उपस्थित ठेवण्यास परवागनी देण्यात आली आहे, असे ते म्हणाले. श्री. निकम यांनी आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. ते पुढे म्हणाले, चूक उमेदवारांनी प्रचारासाठी आवश्यक असलेल्या जागेसाठी ४८ तास आधी अर्ज करून परवानगी घेणे गरजेचे आहे.
एका जागेसाठी इच्छुक उमेदवारांकडून अडचण होऊ नये अशा पद्धतीने त्यांनी जागेची परवानगी घेणे गरजेचे आहे. ही परवानगी मिळण्यासाठी एक प्रांत कार्यालयाच्या ठिकाणी एक खिडकी योजना करण्यात आली आहे. तसेच मतदारांना मतदान केंद्रावर सुविधा देण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्यात येणार आहे.
आचारसंहिता लक्षात घेता विधानसभा मतदारसंघातील तिन्ही तालुक्यातून तब्बल ८६२ पोस्टर काढण्यात आले आहेत. तर अवैद्य गोष्टीवर लक्ष ठेवण्यासाठी एकूण ६ भरारी पथके तर ९ स्थिर सर्वेक्षण पथके तैनात करण्यात आली आहेत. यामध्ये प्रत्येक विभागातील कर्मचारी नेमणूक करण्यात आले आहेत. भरारी पथके ही प्रत्येक तालुक्यात दोन तैनात असणार असून स्थिर सर्वेक्षण पथकांमध्ये सावंतवाडी मध्ये ५ वेगुर्ले मध्ये १ तर दोडामार्ग मध्ये २ पथके असणार आहेत. अनु कलावधीमध्ये जिल्ह्याच्या सीमे बाहेरून येणाऱ्या वाहनांची तपासणी याद्वारे करण्यात येणार आहे.