You are currently viewing स्पर्श दृक्श्राव्य दिवाळी अंक, २०२४ चे धडाक्यात प्रकाशन

स्पर्श दृक्श्राव्य दिवाळी अंक, २०२४ चे धडाक्यात प्रकाशन

 

दि.१७/१०/२४, गुरुवार रोजी सायंकाळी ७.०० वाजता रेणुका आर्ट्स निर्मित ‘स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक २०२४’ चे गुगल मीट द्वारे ऑनलाईन प्रकाशन सोहळा अतिशय उत्तम, शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.

स्पर्श दृक्श्राव्य दिवाळी अंकाच्या संपादिका, जामनगर येथून आसावरी इंगळे यांनी प्रास्ताविक सादर करताना दृक्श्राव्य दिवाळी अंक ही काळाची गरज असून दृष्टिदोष किंवा वाचण्यास त्रास होत असलेल्या समस्त वाचक प्रेमींकरीता वरदान आहे. हौशी गायक व कलाकारांना देखील दिवाळी अंकात सहभागी होता येते, असं सांगितलं. या अंकात कथा ऐकू शकतो, कविताश्रवण सुरु असताना कविता प्रत्यक्ष कवी / कवयित्रींच्या आवाजात ऐकायला मिळते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गायक, वादक, संगीतकार,कवी, लेखक व ‘न्यायप्रभात वृत्तपत्राचे संपादक मा.श्री. शिवाजी किसन खैरे सर यांनी मुंबई येथून अंकाचे ऑनलाईन दीप प्रज्वलन केले व अंकाचे मुखपृष्ठ दाखवून रीतसर प्रकाशन केले. डॉ. मंगल पटवर्धन यांनी अंक उघडण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यानंतर सरांचे मौलिक भाषण, अंकाविषयीचे अतिशय छान, साधे, ओघवते, समर्पक तितकेच ज्ञानवर्धक विमोचन झाले. त्यातील वेचक मोती म्हणजे सरांनी अंकातील पाच प्रमुख भागांचे जे वर्णन केले त्यातील पंच सांगताना त्याची खूप छान उदाहरणं दिलीत. स्पर्श दृक्श्राव्य दिवाळी अंक हा कुठेही, केव्हाही उघडून आनंद घेऊ शकत असल्याने मोबाईल दिवाळी अंक असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, अंकाने नावाप्रमाणे कथा, ललित लेख, कविता, गायन, कला या सर्वच क्षेत्रांना स्पर्श केले असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बुलढाणा येथून सुवर्णा कुलकर्णी- पावडे यांनी केले. गोवा येथील डॉ. जेनेट बोर्जिस यांनी सुरेल आवाजात शारदा स्तवन गायले. गोवा येथून डाॅ. जेनेट बोर्जिस आणि नाशिक येथून सुमती टापसे यांनी मनोगत व्यक्त करताना दिवाळी अंकात साहित्य देण्यापासून तो अंक प्रकाशित होईपर्यंतचा आपापला प्रवास सांगितला. आभार प्रदर्शनाची जबाबदारी रत्नाकर येथून डाॅ. मंगल पटवर्धन यांनी सांभाळली. श्री. खैरे सरांनी अगदी सुलभ पद्धतीने सूत्रसंचालिका सुवर्णा कुळकर्णी पावडे यांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता नाशिक येथून सुचेता तिसगावकर यांनी ओघवत्या, सुमधुर आवाजाने पसायदान गाऊन केली. साधारण सव्वा तास चाललेला हा कार्यक्रम प्रत्येकाला आनंदीत करणारा ठरला.

 

*आसावरी इंगळे*

*(संपादिका – स्पर्श दृक्श्राव्य दिवाळी अंक)*

प्रतिक्रिया व्यक्त करा