You are currently viewing मराठी राजभाषा दिन लेखन – २७ फेब्रुवारी २०२४

मराठी राजभाषा दिन लेखन – २७ फेब्रुवारी २०२४

*”मेघनुश्री” या टोपण नावाने ज्ञात असलेल्या लेखिका ग्रामीण पत्रकार सौ.मेघा कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*मराठी राजभाषा दिन लेखन – २७ फेब्रुवारी २०२४*

 

वैविध्येतील संपन्नता मराठी भाषेचे सौंदर्य वाढवते, गांवकुसाचे दर्शन घडविते. प्राकृत जननी असलेली, संस्कृत भाषेचं लेणं लाभलेली, देवनागरी लिपीतून साकार होते. अज्ञाताला [इतर भाषिकांना] ही प्रेमांत पाडते, उत्सुकता वाढवते. साधे आणि सहज सुस्वरूप असणारी मायमराठी अभ्यासताना मात्र तिचे खरे रूप दाखवून देते. समजून घेणे किती अवघड आहे याची प्रचिती पदोपदी येते. मोठमोठ्या शहरांत बोलीभाषेचा छाप उमटवत वेगळे स्थान निर्माण करते. मनाच्या सर्वांत जवळची, आईवडील आणि मुले जसे नाते तसे, हे सर्व खरे तर शब्दांत वर्णन करता येत नाही. मराठी भाषेची श्रीमंतीच मराठी मनाच्या साधेपणाचे प्रतिक आहे. संत वाङ्मय ज्ञानेश्वरी, तुकारामांचे अभंग, नामदेवांची गाथा अशा अनेक संत साहित्यांतून जीवनाचे सार बालपणापासूनच संस्काररूपाने घरांघरांतून लाभले आहेत. साहित्यांतील विविध प्रकारांनी वाचनसंस्कृती समृद्ध केली ती याच मराठी भाषेने.

मराठी भाषा जितकी मधाळ, रसाळ असते तितकीच काही ठिकाणी अन्यायाविरुद्ध लढताना तिला तलवारीच्या पात्याचीही धार असते. विचारांच्या सुसंगती सोबत शौर्यगाथेचे बळ मराठी भाषेच्या शब्दां शब्दांतून ओतप्रोत भरलेले भरलेले दिसते. परदेशांत, परप्रांतात मराठी भाषेचा सन्मान मातृभाषा म्हणून होतोच आहे. कर्तुत्वाच्या भरारीत ती कधीच लांब जाऊ शकत नाही. कार्यालयीन संपर्क भाषेत विविधता असली तरी, महाराष्ट्रा – बाहेर दोन मराठी माणसे एकत्र आली आणि मराठीतून संभाषण सुरू झाले की चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असतो. अशावेळी शहरांच्या / गावांच्या सीमारेषा धूसर होतात, ही मात्र कमाल असते ती आपल्या मराठमोळे पणाची, भाषेची. मायबोली मराठी लेखनातून सुखाची सर होते तर वाचन करता करता निसर्गातील हिरवळीच्या रंगांची विलोभनियता जपते.

हा महासागर दृश्य स्वरूपांत सामोरा येतो तेव्हां सुरवांत कुठून करावी असा प्रश्न पडतो. भाषा शिकायची तर व्याकरण पक्के पाहिजेच. वृत्त अलंकारांचा साज ल्यालेली, वाक्प्रचार, म्हणींद्वारे प्रकट होणारी, नागरी-ग्रामीणतेचे पैलू लाभलेली, अशा माझ्या मराठी भाषेला ‘मराठी राजभाषा दिन’ निमित्ताने शत शत प्रणाम.

‘साहित्य संगीताचा सन्मान, सदैव आपुल्या घरी, शब्दांक्षरांच्या तोरणाने साकारली इये मराठीचिये नगरी’ सह्याद्रीच्या कुशीत लाभलेला जन्म म्हणजे परमभाग्यच. मराठी बाणा आज जगभर कर्तुत्ववान ठरतोय हे त्याचे फलित रूप. मराठी पाऊल सर्वच क्षेत्रांत अग्रेसर आहे. भाषेच्या शिकवणूकीतून आलेला साधेपणा कधीही डामडौल मिरवत नाही. उत्तुंग कार्य करत असताना विनयशीलता, नम्रपणा आत्मसात करण्यासारखा असतो.

मराठी बाण्यासोबत मराठी भाषेचा अभिमान बाळगणे ही आता काळाची गरज आहे. जागतिक व्यावहारिकता म्हणून इतर भाषा शिकणे गैर नाही, त्याचबरोबर मराठी लिहिता-वाचता न येणे ही खेदजनक बाब आहे. खरोखर मनपासून जेव्हां हे पटेल तेव्हांच दिवसेंदिवस वाढणाऱ्या रोपट्यासारखे भविष्यामध्ये मराठी भाषा जपण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असेल. बाल्यावस्थेतील भाषिक जडणघडण आयुष्यभराची संगत असते. भाषाशैलीतील वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रांतील कानाकोपऱ्यात दरवळणारा परिमळ जो नकळत आपल्यापर्यंत येऊन मिळतो. त्याने आपले आयुष्य सुगंधित केले आहे हे विसरून चालणार नाही.

© मेघनुश्री [लेखिका,पत्रकार]

मोबाईल : ७३८७७८७५१२

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 − two =