You are currently viewing हादगा

हादगा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री अंजली दीक्षित पंडित लिखित अप्रतिम लेख*

 

*हादगा*

 

नवरात्र सुरू होणार हे कळतं तेच मुळी गरब्याचा मांडव पडतो त्यामुळे. हे झालं आज कालच बाहेरच चित्र. घराघरात घट बसणार म्हणून साफसफाई ची कामं जोरावर असतात. म्हणजे ती पितृपक्षातच चालू केलेली असतात आणि घट बसायच्या दिवशी तर सगळं घर अक्षरशः लखलखून उठतं. मला आठवतं तसं आईनं,आजीनं देवघरात घट बसायची तयारी पूर्ण केलेली असायची. पहिल्या दिवशी घटाला माळ घालून नैवेद्य दाखवून देवीची आरती व्हायची. सगळं वातावरण प्रसन्न मंगलमय असायचं. असे पूर्ण नऊ दिवस रोज सकाळ संध्याकाळ नैवेद्य आरती घटाच्या माळा आणि ते हळूहळू उगवून आलेलं धान्य हे बघण्यात दिवस भर्कन उडून जायचे.

पण लहानपणी आम्हाला वेध असायचे ते एका दुसऱ्याच गोष्टीचे आणि तो म्हणजे हादगा किंवा भोंडला किंवा भुलाबाई. पाचवी पर्यंत मी कन्या शाळेतच होते. त्यामुळे तिथं आवर्जून नऊचे नऊ दिवस हादगा व्हायचा. आपल्या डब्याबरोबरच प्रत्येकीने काही ना काही खिरापत पण आणलेली असायची. ती आधी बाईंकडे देऊन ठेवायची ,मग हत्तीचे चित्र काढलेल्या पाटाभोवती फेर धरून गाणी. मनाला एवढी उत्सुकता असायची की कोणी काय काय खिरापत आणली असेल? खरं सांगायचं तर डब्बा तसाच राहून जायचा. इतक्या खिरापती असायच्या की ते खाऊन पोट तुडुंब भरून जायचं. फेर धरून गायलेली गाणी आता काय फारशी आठवत नाहीत पण काही प्रचलित गाणी तेवढी मनाच्या तळ घरात खोल रुतून बसलेली असतातच तशी ती आहेत. ऐलमा पैलमा गणेश देवा,तुझा खेळ मांडला करीन तुझी सेवा……

किती सहज साधी सोप्पी आपल्या जगण्यातलीच तत्व एकामागे एक गुंफत तयार केलेली ही जणू लोकगीतच.

त्यात जावाजावांच्या कुरबुरी असायच्या, सासू सुनांचा भांडण असायचं, नणंद भावजयींची खुमासदार शाब्दिक चकमकी असायची. आपलं सासर किती द्वाड आणि आपल्या माहेर किती किती मायाळू आहे हेच त्यावेळच्या जगण्यातलं वास्तव या गाण्यातून बायका बिनधास्तपणे मांडत असाव्यात आणि नकळत आपल्या मनावरच ओझं उतरवत हलक्या हलक्या होत जात असाव्यात. शेवटी काळ कुठलाही असला तरी व्यक्त होणं ही प्रत्येक मनाची निकड त्यावेळीही होती आणि आताही आहे.

आणि मग संध्याकाळी परत कोणाकोणाच्या घरी हादग्याचा कार्यक्रम ठेवलेला असायचा. मुली बोलवायला यायच्या. आज हिच्याकडे उद्या तिच्याकडे. आज या वाड्यात कधी त्या वाड्यात. प्रत्येकाच्या घरची खिरापत काय असेल हे ओळखायची खूप मोठी गंमत असायची. काय काय मेत्रिणींच्या आई,काकूचा हात एवढा सुगरणीचा असायचा की तेवढ्यासाठी त्या मुलींशी आम्ही एक दोन महिने खूप लाडीगोडीने छान छान बोलत असू. भांडायचं नाही म्हणजे नाही.ती करेल ते छान आहे म्हणायचं का तर भोंडल्याला आपल्याला वगळून देऊ नये म्हणून. आणि खिरापती तर इतक्या वैविध्यपूर्ण आणि मजेशीर सुद्धा असायच्या की ओळखताच यायच्या नाहीत. गाणी म्हणायला मुलींबरोबरच घरातल्या मोठ्या बायका पण यायच्या काकू आत्या माम्या आजूबाजूच्या बायका, त्यांच्या मैत्रिणी सुद्धा. त्या खिरापती खाऊन खाऊन पुन्हा रात्रीच्या जेवणाला सुट्टी पडायची. पण त्या काळात आई जेवणावरून रागवायची नाही. कारण तिलाही ते माहिती असायचं. मग आम्ही पण आईकडे हट्ट धरणार की आपण अशी काहीतरी खिरापत करू की जी कुणा म्हणजे कुणालाही ओळखता येणार नाही. पण अगदीच एखादी जवळची मैत्रीण असेल अगदी खूपच पट्ट मैत्रीण तर तिला कानात हळूच ती खिरापत पूर्ण नाही सांगितली जायची पण एखादी हिंट तर नक्कीच दिली जायची.

एकतर आपल्याकडे नवीन असलेले फ्रॉक घालून जायचं किंवा एखादा दसऱ्यासाठी चा नवीन फ्रॉक आधीच मिळवून पण ठेवायचो आम्ही. म्हणजे त्यात या नवीन फ्रॉक च्या आकर्षणाची ही एक भर असायचीच.

सगळी गाणी संपली की खिरापत ओळखायचा कार्यक्रम ठरलेला असायचा. फार म्हणजे फार धमाल यायची. ओळखली तरी मज्जा असायची आणि नाही ओळखली तर जास्त मजा यायची. मग त्या घरच्या बायका सगळ्या मुलींना ओळीने खिरापत वाटायच्या. त्यात श्रीमंत गरीब काळा गोरा किंवा आणखी कुठलेही असे भेदभाव नसायचे. सगळ्यांना एक सारख्या मापात तोललेलं असे. त्यामुळे कुणाच्याही घरी खाताना असं कधी वेगळं वाटलंच नाही.

 

आणि अगदीच काही ठिकाणी जिथे अधिक प्रमाणात गुजराती भाषिक लोकांची वस्ती आहे तिथे दांडिया असायचा .

आम्ही त्यावेळेस सराफ पेठेत राहायचो. सांगलीचे मोठे गणपती मंदिर आहे बरोबर त्याच्या समोरन जो रोड खाली जातो तिथे मोठा मंडप टाकून देवी बसवलेली असायची. खूप सारं लायटिंग केलेल असायच. देवीची आरती सुरू झाली की आवाज यायचा. मग आम्ही नंतर लगेच होणाऱ्या तिथल्या लोकांचा गरबा पाहायला जायचो. पण त्यावेळी पिक्चर ची गाणी लावत नव्हते, सगळी देवीची गाणी असायची. पिक्चर मधली असली तरीही ती देवाचीच असायची. लहान मोठे मुली स्त्रिया सगळे खूप नटून थटून अतिशय सुंदर गरबा खेळायचे. त्या टिपऱ्या घेऊन खेळायची आम्हाला पण मुभा असायची. कधी कोणी हटकायचं नाही. पण आम्हालाच भीती वाटायची आपल्याला येत नाही आपण कशाला जावं? किंवा ती टिपरी चुकून लागली डोक्यात तर काय करा, असं काहीसं वाटायचं. नंतर हळूहळू जरा खेळता यायला लागलं, पण मोठे व्हायला लागलो तसं आम्ही ते सराफ कट्ट्यातलं घर बदलून विश्रामबागला राहायला आलो. त्यामुळे तो आनंद पुन्हा काही मिळाला नाही.

 

आता मात्र हे चित्र फक्त आठवणीतच बाकी आहे असं वाटतं. नऊ दिवसांच्या नऊ रंगात रंगून आज सगळीकडे रणरागिण्या फिरताना दिसतात. घरातून बाहेर पडलं की मग लक्षात येतं की अरे बापरे आज केशरी रंग आहे का आणि आपण काय हे भलतच घातलं आहे? एवढ्या स्ट्रिक्टली हे रंग फॉलो करणं खरंच कसं जमतं बरं? बरं या रंगांचा आणि त्या नऊ रात्रीच्या उपवास पूजा यांचा काहीतरी संबंध आहे का?

काही वर्षांपूर्वी आपल्या वृत्तपत्राचा खप वाढावा म्हणून माझ्यामते महाराष्ट्र टाइम्सने हे वेगवेगळ्या रंगांचे फोटो मागवायला सुरुवात केली होती आणि ते प्रसिद्ध केल्यामुळे त्यांच्या वृत्तपत्राचा खरंच खप वाढला असेलही, पण आता जणू हा एक ट्रेंडच सेट झालेला आहे. तोही जागतिक आणि तोही पूर्ण फॅमिलीचा असं वाटतंय.

आज काल मांडव घालून मोठ मोठ्या आवाजात हिंदी पिक्चर मधली गाणी लावून गरबाच्या नावाखाली काहीही स्टेप्स करणे एवढाच नवरात्रीचा अर्थ आहे असं दिसतंय . आणि ती गाणी एवढ्या मोठ्याने लावलेली असतात की घरातले डब्बे खाली पडतात की काय असं वाटतं.

शेवटी असं तर होणारच. काळ बदलला तसं नवीन गोष्टी येत राहणार. पण थोडीशी खंत याची वाटते की नव स्वीकारताना जुनं पूर्णच टाकाऊ ठरवून टाकून दिलं जातंय याची. आता त्याला जबाबदार आपण सुजाण नागरिकच आहोत असं म्हटलं तरी खोटं नाही. कारण आम्ही जो खेळ लहानपणी खेळायचो तो हादगा आम्ही आमच्या मुलांपर्यंत पोहोचवलाच नाही. आता ती सासर माहेरची उणीदुणी काढणारी गाणीही कालबाह्य झालीत असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा आता नवीन गाणी रचायला हवीत आत्ताच्या काळाशी सुसंगत अशी. तसं तर हा दोष खरं पाहता आपल्या पिढीचाच आहे की आपण आपल्या जवळची ही अमानत पुढे पोच केली नाही. मग पुढच्या पिढीने जे सोपे आणि आनंददायी आहे ते उत्सव प्रिय मानसिकतेतून उचललं तर त्यात त्यांचा दोष नाही.

तूर्तास तरी या आठवणींवरतीच सुख मानत राहूया.

 

अंजली दीक्षित-पंडित

९८३४६७९५९६

प्रतिक्रिया व्यक्त करा