सावंतवाडी आगारातून सुटणाऱ्या वस्तीच्या एसटी बसेस लवकरात लवकर सुरू करा…

सावंतवाडी आगारातून सुटणाऱ्या वस्तीच्या एसटी बसेस लवकरात लवकर सुरू करा…

मंगेश तळवणेकर यांची आगारप्रमुख वैभव पडोळे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

सावंतवाडी

सावंतवाडी आगारातून सुटणाऱ्या वस्तीच्या एसटी बसेस लॉकडाऊन काळापासून बंद आहेत. शालेय मुलांचा, कामगार व गावठी भाजीपाला विकेत्यांचा विचार करता लवकरात लवकर या बसेस सुरू कराव्यात, अशी मागणी जिल्हा परिषद माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी सावंतवाडी आगारप्रमुख वैभव पडोळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनात तळवणेकर म्हणाले, सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा येथून सकाळी सहा वाजता सुटणारी साटेली, कोंडुरे, आरोस बाजार, रोणापाल, मडुरा, शेर्ला ते बांदा ही शाळेच्या व महाविद्यालयाच्या तसेच गोरगरीब कामगार, छोटे-मोठे भाजी विक्रेते यांच्यासाठी चालू होती. तसेच सातार्डा-सातोसे मार्गे बांदा ही बस देखील बंद आहे. तसेच तालुक्यातील इतरही वस्तीच्या गाड्या बंद आहेत. लॉकडाऊनच्या काळापासून या बसेस बंद आहेत . त्यामुळे शाळेच्या मुलांना सकाळी चार वाजता उठून बांद्यापर्यंत सुमारे दहा किलोमीटर पायपीट करीत आपल्या शाळेला जावे लागते. बंद बसेसमुळे शाळकरी मुले, कामगार व गावठी भाजीपाला विक्रेते यांच्यावर मोठा परिणाम झाला आहे. येत्या आठ दिवसात या गाड्या सुरळीत चालू कराव्यात, अन्यथा सावंतवाडी आगारासमोर शाळकरी मुले तसेच सर्वसामान्य माणसांना घेऊन उपोषण छेडण्यात येईल, असा इशाराही तळवणेकर यांनी दिला आहे. यावेळी येत्या दोन ते चार दिवसांत एसटी बस सुरू करण्याचे आश्वासन पडोळे यांनी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा