पुणे-सोलापूर महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात..

पुणे-सोलापूर महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात..

पुणे:

यवत दौड पुणे- सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहीती आहे. मिनीबस, कंटेनर व व्हॅगनार कार यांचा हा विचित्र अपघात झाला आहे. हा अपघात यवतच्या पुर्वेस असलेल्या हॉटेल अन्नपूर्णा समोर पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास झाला आहे.

सोलापूर बाजूकडून येत असलेल्या मिनीबस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. महामार्गाचा दुभाजक ओलांडून मिनीबस विरूद्ध दिशेच्या मार्गिकेवर गेली. त्याच वेळी पुणे बाजूकडून सोलापूर बाजूकडे जात असलेल्या कंटेनरची  त्यास जोरदार धडक बसली.

यात मिनीबस जागेवरच पलटी झाली. मिनीबसमध्ये केवळ दोनच व्यक्ती असल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र या गडबडीत कंटेनर चालकाचेही आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर विरूद्ध बाजूच्या मार्गिकेवर गेला. कंटेनरमधील लोखंडी पट्ट्यांचा माहामार्गाच्या दोन्ही मार्गिकांवर सडा पडला होता. याच वेळी सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे वेगाने जात असलेली व्हॅगनर कार कंटेनरला धडकता-धडकता वाचली. कारमधील चारही प्रवाशी सुखरूप होते.

दरम्यान, या अपघातात महामार्गाच्या दोन्ही मार्गिकांवर मोठे अडथळे निर्माण झाले. वाहतुक विभागाचे पोलीस व यवत पोलिसांनी वेळीच निर्णय घेत सेवा रस्त्यांवरून वाहतूक वळवल्याने पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीस फारसा अडथळा झाला नाही. मात्र, सोलापूर बाजूकडे जाणाऱी वाहतूक काही काळ खोळंबली. यवत पोलीस अधिक तपास करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा