You are currently viewing अभिजात मराठी आणि आपण…

अभिजात मराठी आणि आपण…

गुरुवार 3 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला. मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने 12 ऑक्टोबर 2004 ला अभिजात भाषा अशी नवी वर्गवारी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 2012-13 साली प्रा. रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने एक अहवाल तयार करून दिला होता. तो अहवाल अभिजात भाषेच्या नियम, अटी प्रमाणे सादर केला होता. हा अहवाल केंद्र सरकारने 2015-16 साली आपल्याकडे घेतला. त्या अहवालाने केंद्र सरकारला सांगितले होते की, मराठी भाषेला अभिजात दर्जा का व कशाच्या आधारे द्यावा. परंतु हा अहवाल देण्यामध्ये आपल्याला फार उशीर झाला. कारण 2004 नंतर काँग्रेसच्या सरकारने याबाबतीत चालढकल केली, तरीही हा निर्णय भाजपा सरकारच्या काळात काही तांत्रिक, राजकीय अडचणींमुळे रखडला आणि आता 2016 नंतर जवळपास आठ वर्षांनी हा निर्णय घेतला गेला. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितले होते की, मराठी भाषेला लवकरात लवकर अभिजात भाषेचा दर्जा द्यावा. म्हणून 3 ऑक्टोबर रोजी नवरात्रौत्सवाच्या दरम्यान केंद्र सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला. मराठी भाषेबरोबर इतर चार भाषांनाही अभिजात दर्जा मिळाला आहे.

अभिजात भाषेविषयीच्या या धोरणात काही मुद्दे महत्त्वाचे होते. त्यात मराठी भाषा दोन हजार वर्षांपूर्वीची असणे गरजेचे होते. त्याचबरोबर आपली मराठी भाषा स्वयंभू असावी, म्हणजे ती कुठल्याही भाषेची नक्कल प्रत असू नये. अर्थात कुठल्याही भाषेतून ती निर्माण झालेली नसावी. त्या भाषेत अति प्राचीन ग्रंथ निर्मिती झालेली असावी. ग्रंथ निर्मितीचा हा प्रवास कधीही थांबलेला नसावा. सातत्याने ग्रंथ निर्मिती त्या भाषेतून झालेली असावी. मराठी भाषा ही दोन हजार वर्षापासूनची आहे. ती स्वयंभू आहे. त्यात अनेक प्राचीन ग्रंथ आहेत अशा या ग्रंथ निर्मितीचा प्रवास कधीही खंडित झालेला नाही.

या सर्व नियम, अटी, शर्ती सामान्य मराठी माणसाला, लेखक, कवीला माहित नव्हत्या. जाणकार साहित्यिकांना या गोष्टीची माहिती होती. कारण आपण या काळात सर्व लोक म्हणायचो, मराठी भाषा साडेसातशे वर्षांपूर्वीची आहे. ती संस्कृत या भाषेपासून निर्मित झालेली आहे. या सर्व गोष्टी अभिजात भाषेच्या नियमात मागे पडल्या. या नियमांचे पुरावे अहवालात प्रा. रंगनाथ पाठारे समितीने दिले म्हणून आपल्या मराठी भाषेला हा अभिजात दर्जा मिळाला आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या मराठी भाषेचे आंतरिक स्वरुप सौंदर्यपूर्ण केले. लोकांना गीतेत असलेले तत्त्वज्ञान सोपे करून सांगितले परंतु ज्ञानेश्वरांच्या आधीपासून ही मराठी भाषा जागृत होती.

सातवाहन, चालुक्य, मौर्य, वर्धन अशा अनेक प्राचीन हिंदू राजवटींमध्ये मराठी भाषा जिवंत होती. शिलालेख, ताम्रपट तेव्हा मराठी भाषेत अस्तित्वात होते. राजा, सम्राटांच्या राज आज्ञा किंवा लोक विचार मराठी भाषेत तेव्हाही लिहिलेले होते. आपण सर्वजण नेहमी इतिहासाला मनोरंजनाचे साधन मानत आलो आहे. त्यामुळे आपण इतिहासाचा नीट अभ्यास करत नाही. ऐतिहासिक तत्त्वांना आताच्या काळाशी जोडत नाही. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचा संघर्ष कायम करावा लागतो. हे टाळण्याकरता आपण सर्वांनी इतिहास विषयक ग्रंथांना रामायण, महाभारत ग्रंथांसारखे वाचायला हवे, त्याचे पारायण करायला हवे. आपण म्हणतो रामायण, महाभारत, गीता वाचल्याने मनाला शांती मिळते पण रामायण, महाभारत, गीता हे तीन ग्रंथ अधर्मावर धर्माचा विजय कसा होतो हे सांगणारे आहेत. त्यामुळे त्यात झुंज आहे, युद्ध आहे. ही हिंसा केवळ मानव धर्म रक्षणासाठी आहे. मग चंद्रगुप्ताचा इतिहास तसाच आहे, सातवाहनांचा इतिहास तसाच आहे, शिवाजी महाराजांचा, पेशव्यांचा, टिळकांचा इतिहास तसाच आहे. जर रामायण, महाभारत, गीता या ग्रंथांमुळे मनःशांती मिळत असेल, तर इतिहासाची पुस्तके वाचून तेच समाधान मिळेल. म्हणून पौराणिक ग्रंथांबरोबर ऐतिहासिक ग्रंथही वाचावेत.

आम्ही विद्यार्थी म्हणून महाविद्यालयात इतिहासाचा आणि इतर सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करत असताना आमचे प्राध्यापक आम्हाला सांगायचे. मार्कासाठी, परीक्षेसाठी केवळ अभ्यास करु नका, आधी ज्ञान मिळवण्याकरता अभ्यास करा पण आपण कुणीही तसे वागत नाही, त्यामुळे पुढील आयुष्यात आपण ते सर्व काही विसरतो. बालपणात आपण सर्वजण मनाचे श्लोक, वंदे मातरम, भारतीय प्रतिज्ञा आणि अजून काही स्तोत्रे, श्लोक वाचायचो. त्या सर्व गोष्टी वयाच्या 40, 50, 60 वर्षातही आपल्या लक्षात राहतात. मग आपण ऐतिहासिक ग्रंथांचा असा विचार का लक्षात ठेवू शकत नाही? का तो त्या- त्या वेळी मांडू शकत नाही. याचा विचार आपण सर्वांनी करायला हवा.

आज आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे जाणकारांच्या मतानुसार मराठी माणसाला, मराठी भाषिकाला खूप मोठा फायदा मिळणार आहे. विश्वभरात मराठी भाषा आधीच पोहोचली आहे, ती अधिकाधिक या विश्वात तसेच आपल्या भारतात जागृत होईल. पुढील काळात हे सर्व होताना आपण सर्वजण ते बघू. आपल्या मराठीला लेखक, कवी, शिक्षक म्हणून वाढवू. या सर्वात एक लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आपली मराठी भाषा आधीपासूनच अभिजात होती आणि आहे.

शिवाजी महाराजांना व त्यांच्या वंशजांना दीर्घायुष्य लाभले असते किंवा पेशवाईत एक, दोन पेशव्यांना दीर्घायुष्य लाभले असते, तर आपली मराठी भाषा आज भारतीय एकमेव राष्ट्रभाषा झाली असती. सतराव्या व अठराव्या शतकात भारतावर शेवटपर्यंत मराठ्यांचे राज्य होते. म्हणून छत्रपती शिवरायांना, शंभूराजांना, पेशव्यांना दीर्घायुष्य मिळाले असते, तर ब्रिटिशही आपल्या देशात राज्य करु शकले नसते. मग आपल्याला अभिजात भाषेविषयी संघर्ष करावा लागला नसता पण नियतीच्या विधानापुढे कुणाचे काही चालत नाही. म्हणून मराठी माणसांनो जागे व्हा, अभिजात व्हा, मराठीचा हट्ट धरा, मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या वाढवा, तरच आपली मराठी भाषा आणि आपण अभिजात आहोत याची खात्री आपल्याला मिळेल…

 

✒️ ॲड.रुपेश पवार, ठाणे

9930852165

प्रतिक्रिया व्यक्त करा