You are currently viewing कोविडच्या लसिकरणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

कोविडच्या लसिकरणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला ड्राय रन

सिंधुदुर्गनगरी 

बहुप्रतिक्षीत कोरोनाची लस लवकरच उपलब्ध होणार आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर ती नागरिकांना कशा प्रकारे देण्यात येणार याचा ड्राय रन अर्थात रंगीत तालीम आज जिल्ह्यात पार पडली. जिल्ह्यातील तीन ठिकाणांची या ड्राय रन साठी निवड करण्यात आली होती. त्यामध्ये कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालय, कासार्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि देवगड येथील ग्रामिण रुग्णालयाचा समावेश होता.

            जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, कणकवलीचे तहसिलदार रमेश पवार आरसीएच अधिकारी डॉ. संदेश कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय पोळ, आयडीएसपीचे डॉ. प्रशांत सवदी, कणकवली उप जिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक, डॉक्टर्स व कर्मचारी यांच्या उपस्थितीत कणकवली उप जिल्हा रुग्णालयामध्ये ड्राय रन ची सुरुवात करण्यात आली. कणकवली येथे 25 लोकांना लस देण्याचे ड्राय रन घेण्यात आले.

            लसीकरणाचे एकून तीन टप्पे असून पहिल्या टप्प्यात शासकीय व खाजगी डॉक्टर्स, नर्स,  आरोग्य कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात प्रशासकीय अधिकारी आणि तिसऱ्या टप्प्यात सर्व नागरिकांना लस देण्यात येणार आहे. सर्व सामान्य नागरिकांना लस देताना इतर आजार असणारे आणि 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. या सर्व लसीकरणाचे नियोजन कसे असणार आहे याचा ड्राय रन म्हणजेच पूर्व प्रात्यक्षिक घेण्यात आले.

            या ड्राय रनमध्ये तिन्ही ठिकामी प्रत्येक सत्रासाठी 25 या प्रमाणे एकूण 75 लाभार्थींची निवड करण्यात आली होती. या लसीकरणासाठी आवश्यक लाभार्थी नोंदणी, कोविन पोर्टलवर आरोग्य विभागाकडून यापूर्वीच करण्यात आली आहे. त्यातूनच 75 लाभार्थींची निवड करण्यात आली होती. आजच्या या ड्राय रन मध्ये प्रथम कक्ष, नोंदणी कक्ष, प्रतिक्षा कक्ष, त्यानंतर लसीकरण कक्ष व निरीक्षण कक्ष अशा तीन खोल्यांची व्यवस्था करण्यात आली होती. लसीकरणाच्या ठिकाणी येणाऱ्या लाभार्थींना प्रथम लसीकरणासाठी येण्यासाठी त्यांच्या नोंदीकृत मोबाईलवर विशिष्ठ वेळेत येण्याविषयी संदेश पाठविण्यात आला होता. त्याप्रमाणे लाभार्थी लसीकरणासाठी आल्यानंतर त्यांचे थर्मल स्क्रिनींग, पल्स ऑक्सीमीटर द्वारे तपासणी करून त्यांची नोंद व्हॅक्सीन देण्यासाठी पोर्टलवर करण्यात आली असल्याची खात्री करण्यात आली. ओळख पटविण्यासाठी लाभार्थी जवळ फोटो ओळख पत्र जसे आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, वाहन परवाना, बँक पासबूक, मनरेगाचे जॉबकार्ड असणे आवश्यक आहे. हे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर लाभार्थीला लस देणेबाबतची कार्यवाही करून त्यांना पुढील अर्धातास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. आशा प्रकारे कोविड लसीकरणाची पूर्ण प्रक्रिया करण्यात आली.

            यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी लसीच्या साठवणुकीची क्षमता, रुग्णांना निरीक्षणाखाली ठेवण्यासाठीची व्यवस्था तसेच लस देण्यापूर्वी व दिल्या नंतर लोकांची कशा प्रकारे देखरेख ठेवली जाणर आहे या सर्व गोष्टींचा सविस्तर आढावा घेतला. तसेच नागरिकांनी घाबरून न जात ही लस टोचून घ्यावी व स्वतःसह स्वतःच्या कुटुंबास व एकूण समाजास सुरक्षित ठेवावे असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले. जिल्हा प्रशासन लसिकरणासाठी सज्ज असून कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची खात्री त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

            कासार्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी स्वतः भेट देऊन प्रक्रियेची पहाणी केली. केंद्रामध्ये कशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे आणि भविष्यात त्यामध्ये कोणत्या गोष्टींची सुधारणा करावी लागेल याविषयी त्यांनी उपस्थित अधिकारी यांच्याशी चर्चा केली.

            जिल्ह्यामध्ये कोविड लसीकरणाची सर्व तयारी पूर्ण झाली असून शासन स्तरावरून सूचना व लस प्राप्त झाल्यानंतर त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणांनी केले आहे. जिल्ह्यातील तीन ठिकाणी झालेला ड्राय रन यशस्वीपणे पार पडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 6 =