उद्योगपती आणि रिलायन्स समुहाचे चेअरमन अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या मालकीच्या रिलायन्स कम्युनिकेशन, रिलायन्स टेलिकॉम आणि रिलायन्स इन्फ्राटेल या तीन कंपन्यांची बँक खाती फ्रॉड खाती म्हणून घोषीत केले आहे. याची माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाने दिल्ली उच्च न्यायालयात दिली आहे. एसबीआयचा निर्णय अंबानी यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
अनिल अंबानींच्या तीन कंपन्यांच्या बँक खात्यांचे ऑडिट केले असता, त्यात निधीचा दुरुपयोग, चुकीच्या पद्धतीने हस्तांतरण आणि अफरा-तफरी झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच तिन्ही खात्यांना फ्रॉड यादीत टाकल्याचे बँकेने न्यायालयात नमूद केले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, अनिल अंबानी यांच्या तिन्ही कंपन्यांची स्टेट बँकेकडे ४९ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. यात रिलायन्स इन्फ्राटेलच्या १२ हजार कोटींच्या थकबाकीचा समावेश आहे. तर रिलायन्स टेलिकॉमने २४ हजार कोटी थकवले आहेत.
*एसबीआयकडून सीबीआय चौकशीची शक्यता*
एसबीआयकडून या प्रकरणासाठी फसवणुकीच्या आरोपाखाली कोर्टात सीबीआय चौकशीची मागणी केली जाऊ शकते. एखाद्या कंपनीचे बँक खाते हे फ्रॉड खात तेव्हाच घोषीत केले जाते. जेव्हा ते अनुत्पादक मालमत्ता (एनपीए) खात होत. नियमानुसार फ्रॉड खात जाहीर झाल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला देणे गरजेचे असते. जर त्या खात्यातून झालेली फसवणूक ही १ कोटींपेक्षा अधिक रकमेची असेल तर आरबीआयने सूचना दिल्याच्या ३० दिवासांच्या आत त्याबाबत सीबीआयकडे गुन्ह्याची नोंद करण्यात येते.