भारताची पहिली स्वदेशी लस कोव्हॅक्झिनची शेवटची तिसरी चाचणीही यशस्वी झाली आहे.लसनिर्माता भारत बायोटेकने ही माहिती दिली आहे. कोवॅक्सिनच्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. मंजुरी मिळाल्यानंतर काही दिवसांतच लसीची तिस-या टप्प्यातील चाचणीही यशस्वी होणे ही भारतासाठी ही खूप अभिमानास्पद बाब आहे. भारत बायोटेकने तिच्या कोव्हॅक्झिन या लसीच्या पहिल्या आणि दुस-या टप्प्यातील चाचणींचा अहवाल कंपनीने याआधी जारी केला होता.
पहिल्या टप्प्यात सहभागी झालेल्या लोकांमध्ये कोवॅक्सिन लस दीर्घकालीन अँटिबॉडी आणि टी-सेल तयार करत असल्याचे दिसून आले आहे. तर दुस-या टप्प्यातील अभ्यासात रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचे आणि ही लस सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. लस वर्षभरासाठी प्रभावी ठरत असल्याचा दावा.
तिस-या टप्प्यातील चाचणी पूर्ण होण्याआधीच लसीला मंजुरी दिल्याने अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित करण्यात आले होते. लसीची सुरक्षितता आणि प्रभावाबाबत शंका व्यक्त केल्या जात होत्या. मात्र आता तिस-या टप्प्यातील चाचणीही यशस्वी झाल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.ही लस ६ ते १२ महिने सुरक्षा देऊ शकते, असे कंपनीने म्हटले आहे. ही लस कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरही प्रभावी असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.