You are currently viewing माझे गाव कापडणे…

माझे गाव कापडणे…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*माझे गाव कापडणे…*

 

मंडळी, इकडे पंगती उठत होत्या पण तिकडे अप्पांना संध्याकाळच्या लग्नाची तयारी नि

नवरदेवाच्या वऱ्हाडाची व्यवस्था करायची होती. गडबडीत तुम्हाला एक सांगायचे राहिलेच बघा. अहो, या पंगती बसण्यापूर्वी

नवरदेवाच्या वऱ्हाडाची मानाची पंगत बसली

होती बरं का.अहो, काय त्यांचा थाट मंडळी.

त्यांनाही पूर्वी असा मानपान पाहिला नसेल.

शाळे पासून जो बॅंड सुरू झाला व पायघड्या सुरू झाल्या त्या विचारूच नका.एका मागे एक

साड्या जमिनीवर अंथरल्या जात व लगेच उचलून त्या पुढे जात.अशा रंगीबेरंगी पायघड्यांवरून वऱ्हाड मार्गक्रमणा करत मांडवा पर्यंत आले नि गाद्यांवर विसावले. लगेच पहिल्या पंगतीत मानाने त्यांना

जेवण वाढले. गरमागरम जेवणाने मंडळी तृप्त

झाली. पण तेवढ्यात कळले की त्यांचे एक बाळ आजारी आहे नि रडते आहे. मग काय?

डॅां. साठी पळापळ झाली नि बाळ रडायचे थांबले. अशी नुसती धूम चालली होती मंडपात.

कोण काय करत होते तर कोण काय ?

नुसती झिम्माड फुगडी चालू होती म्हणाना..

पंगती तर थांबता थांबत नव्हत्या.पोटावर हात

फिरवत तृप्त व समाधानी चेहऱ्याने मंडळी घरोघर जात होती, मग, संध्याकाळी मांडवात

पुन्हा लग्नाला यायचे होते ना?

 

अप्पा भराभर सूचना देऊ लागले नि लोक पटापट कामाला लागले. तेवढ्यात एक नवल

घडले. पोलीस ड्रायव्हिंग करत असलेली एक

पोलीस गाडी गावात शिरली नि हॅऽऽऽऽ करून

पोरांचा लोंढा तिच्यामागे धावला. कालच गावात फुनक्याची टप नसलेली गाडी आली होती नि मोठ्या झोकात गांवभर फुनके मिरले

होते. आणि आज पुन्हा पोलीस गाडी? गाडी

सर्रकन दारासमोर येऊन थांबली. कुणालाच

काही कळेना. तेवढ्यात गाडीतले पोलीस वेषधारी बॅंण्डवाल्यांनी धडाधड गाडीतून उड्या मारल्या नि काढले ड्रम ट्रम्पेट ढोल पिपाण्या नि

शिस्तीत कडक पोलीसी वेषात दाणदाण वाजवत बॅंण्डची सलामी दिली.गोलाकार उभे

राहून शिस्तीत वाजवणाऱ्या त्या बॅंण्डचा आवाज ऐकून अक्कासह सारे वऱ्हाडी ओट्यावर आले व गल्ली

तले लोकही धावले व त्यांनी पोलीसांभोवती गोल केला.

 

पोलीसांचा तो दणकेबाज बॅंण्ड ऐकून सारेच थक्क झाले व नंतर खुलासा झाला की अप्पांनी आपल्या लेकीसाठी खास कलेक्टरची परवानगी घेऊन लग्नापुरता पोलीस बॅंण्डही बोलावला होता. ती सलामी

ऐकून सारेच खुष झाले. अक्काने त्यांचे चहापाणी केले. बॅंण्डवाले विसावले व इतरही

सारे पांगले. असे होते भाऊ. हौसेसाठी ते काय

करतील याचा नेम नव्हता.ओट्यावरून लाऊड

स्पीकरवरूव सतत सिनेमाची गाणी वाजत होतीच. डमडम डिगा डिगा.. ओ बसंती पवन पागल.. सबकुछ सिखा हमने ना सिखी होशियारी..

 

इकडे मांडवात पंगती आटोक्यात येताच सारी

स्वच्छता झाली नि मंडळी लग्नाच्या तयारीला

लागली. न्हाव्याची धावपळ सुरू झाली.

“ टाई लावाले चाला हो भाऊना घर, बठ्ठा जन, चाला बरं लव्हं लव्हं..” असे म्हणत त्याने घरोघर हाकारे

घातले. मांडवात पाटं चौरंग यांची व्यवस्था झाली. धुळ्याहून मोठे सुंदर हार वधुवरांसाठी

आणलेले होतेच.मांडवात सर्व तयारी झाली.

हळू हळू मांडवात लोकांची रीघ लागली नि मंडप ओसांडू लागला. सनई चौघडा दोन्ही बॅंण्ड पथके तयार होतीच. मंडपात सारी मंडळी

स्थानापन्न झाली.गुलाब भटजींची तर दुपारपासूनच धावपळ चालू होती. चौरंग पाटं

मांडले. वधूवर तयार होऊन समोरासमोर उभे

राहिले. मामांनी अंतर्पाट धरला नि भटजी

धाब्यावर चढले व सर्वांना दिसतील असे

काठावर उभे राहून देवदेवतांना आवाहन करू

लागले. कावेरी सिंधू ही आपले पवित्र जल

घेऊन आल्या. चंद्र तारे आले नि बघता बघता

सूर्य अस्ताला जाऊ लागला. त्याच्यावर नजर

ठेऊन बरोबर गोरज मुहुर्ताला टाळी वाजवताच

व लक्ष्मीपते उच्चारताच बॅंण्ड चौघडे दणाणले व इतका वेळ श्वास रोखून बसलेल्या वऱ्हाड्यांनी व समस्त गावकऱ्यांनी वधुवरांवर अक्षता उधळल्या.

 

झाले, माईचे शुभमंगल झाले. वधुवरांनी अंतर्पाट दूर होताच एकमेकांना हार घातले व

ते जन्माचे जोडीदार झाले. एक फार मोठा भव्य

दिव्य लग्न सोहळा लोकांनी अनुभवला व ते तृप्त झाले. कापडण्यातील “ न भूतो न भविष्यती” असे ते लग्न होते. आणि खरंच कापडण्यात असे जोरदार झालेले लग्न मी पुन्हा नाही पाहिले. जिकडे तिकडे आनंद ओसांडत होता. लोक एकदम खुश होते कारण

अतिशय अनोखे असे भव्यदिव्य लग्न त्यांनी याची देही याची डोळा अनुभवले होते. ज्या लग्नाची प्रत्येकच गोष्ट खास होती.अगदी मांडवापासून ते लग्नापर्यंत. हे लग्न त्यावेळी खूप चर्चिले गेले व नंतरही खूप लोकांच्या व

माझ्याही( मी इतकी लहान असतांना ही)लक्षात राहिले. अक्का अप्पांची खूप दमणूक झाली हे मला आत्ता कळते आहे.

तेव्हा कुठे कळत होते.

 

लग्न तर आटोपले. आता लाडू सांजोऱ्यांच्या

पेट्या भरून तयार होत्या, त्या बरोबर आहेराचे

सामान, भांडीकुंडी बरेच काही पाठवायचे होते.

त्याची तयारी सुरू झाली. घरात भरपूर वऱ्हाडी

होतेच मदतीला.आता माई, मी व माझी एक चुलत बहिण अशा वऱ्हाडाबरोबर जाणार होतो. कशा, कोणत्या गाडीने गेलो हे काही मला आठवत नाही. पण त्या गावाला आम्ही गेलो

तिथले काही प्रसंग आठवतात.नदी काठी वसलेले नामांकित मोठे गाव, सासरे गावचे

पाटील, दोनमजली माडी, मोठे कुटुंब असा एकूण बारदाना होता. माई मोठ्याघरी व शिकलेल्या नवऱ्याच्या पदरी पडली होती ही

खूप मोठी गोष्ट होती. मी नवरीची बहिण असल्यामुळे तिथे माझी थट्टा मस्करी होत

होती पण मला कुठे ते तेव्हा कळत होते.

आता आठवते. तिथे माजघरात “ काकवी”

ती एक घागर भरलेली होती. ती काकवी मला

खूप आवडायची व मी पोळीबरोबर ती खात

असे,असे आता आठवते. घरातच विहिर होती

नि बायका, सुना बिचाऱ्या पाणी शेंदायच्या.

 

तिथे पुढचे लग्नविधी काही झाले की नाही काही आठवत नाही. त्या घरातल्या मुलींबरोबर मी फिरत असे तेवढे आठवते.कधी कसे परत

आलो ते ही आठवत नाही. वडील जावयाला

यशवंतराव चव्हाणांकडे भेटायला घेऊन गेल्याचे आठवते. जावई नोकरीला लागला व

माई त्याच्या बरोबर गेली. नांदू लागली.अप्पांच्या डोक्यावरचे एक ओझे उतरले. आणखी ३/४ वर्षात मोठ्या मुलाचे लग्न करावे लागणार होते. तो पर्यंत आराम

होता. मंडळी, आईवडील कधीच रिटायर होत

नाही व त्यांच्यावरच्या जबाबदाऱ्याही शेवट

पर्यंत संपत नाही. मुलींची लग्ने झाली तरी त्यांचे माहेरपण बाळंतपण आईवडीलांना खूप

पुरते. तसे माईचेही भरपूर पुरले. शेवटपर्यंत माहेरची, भावाची मदत तिला लागली. तिच्या धुळ्याच्या घराचे बांधकामही नानाच्याच जीवावर झाले. मोटर खराब नाना.. सीमेंट आणा.. नाना ..! कापडण्याहून घरपोच सारे सामान जात असे. काही इलाज

नसतो. पोट असते ना शेवटी आपले. आपल्याकडे सगळा ठेका माहेरच्या

लोकांनाच दिलेला असतो. सासरचे फक्त रूबाब करण्यापुरतेच असतात. त्यांची काहीच

जबाबदारी नसते.जमलेच तर ओरडायला हजर.

 

वास्तविक एकदाका लग्न झाले की ती जबाबदारी सर्वस्वी त्यांनी घ्यायला हवी ना?

त्यांचा मुलगा, त्यांची सून.. पण खर्चायला मात्र

माहेरचे! वा.. काय न्याय आहे हो ? बिचारा मुलीचा बाप फाटका असला तरी त्यानेच कर्ज

बाजारी व्हायचे व यांनी नुसती गंमत बघायची.

फार चढवून ठेवले आहे हो ह्या वराकडच्या मंडळींना आपण. लग्न झाले की आपण हात

झटकून मोकळे का होत नाही? मुलीला त्रास

होईल म्हणून. हो… पण मुलीला त्रास का होईल? आता ती त्यांची सून आहे ना? मग..?

सगळ्याच प्रथा उलट्या आहेत. काय करणार.

घ्यायचे मग गळ्याला फास लावून नि बसायचे

आयुष्यभर गळे काढत! मोठा गहन विषय आहे

हा नि आपण सारेच त्याला जबाबदार आहोत.

मग कोण कुणाला बोलणार हो? सारेच लोभी

नि लुटारू ! फार कठोर भाषा वापरते आहे मी.

पण खरं सांगा, यात काय चुकीचे बोलते आहे

मी? आपण सारे एकाच माळेचे मणी आहोत अगदी अपवादाने एखादे दुसरे उदा. सोडता.

बघा, विचार

 

करा, मी काय म्हणते त्याचा.

 

बरंय् मंडळी, राम राम…

 

जयहिंद.. जय महाराष्ट्र…

 

आपलीच..

 

प्रा.सौ.सुमती पवार .नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा