You are currently viewing मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे दुर्दैवी

मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे दुर्दैवी

*४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते पुतळ्याचे अनावरण*

 

महाराष्ट्राची अस्मिता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिले जाते. छत्रपती शिवरायांच्या शौर्याला सलाम म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा २८ फूट उंचीचा पुतळा १५ फुटांच्या चबुतऱ्यावर मालवण येथील ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आला होता. नौसेना दिनाच्या निमित्ताने नौसेना व महाराष्ट्र शासनाच्यावतीने छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारला होता आणि या पुतळ्याचे अनावरण भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. कल्याणचा तरुण शिल्पकार आणि मालवणचा सुपुत्र जयदीप आपटे यांनीही शिल्पकृती तयार केली होती. परंतु दुर्दैवाची आणि शरमेची गोष्ट म्हणजे दिनांक २६ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारच्या सुमारास म्हणजे अवघ्या नऊ महिन्यात छत्रपतींचा राजकोट किल्ल्यावर उभारलेला पुतळा कोसळला. छत्रपतींचा पुतळा कोसळला हे वाक्य सुद्धा बोलताना, लिहिताना आणि वाचताना मनाला तीव्र वेदना होतात. अशा प्रकारची बोगस कामं झाल्यामुळे आज शिवप्रेमींना आणि अवघ्या महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालावी लागत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार म्हणून ४ डिसेंबर २०२३ रोजी नौसेना दिनाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ४३ फूट उंच पुतळ्याचे राजकोट किल्ला मालवण येथे अनावरण झाले होते. त्यावेळीच मालवणच्या स्थानिक नागरिकांनी सदरच्या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून घाई गडबडीत केले जात आहे, अशा प्रकारचे आरोप वजा टीका केली होती. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांनी देखील त्यावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आकारहीन व शिल्प शास्त्राला अनुसरून नसलेला घाई गडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा अशा प्रकारची मागणी केली होती. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या समुद्रात उभारलेला चारशे वर्षांपूर्वीचा सिंधुदुर्ग किल्ला चारही बाजूंनी अजस्त्र लाटांचा मारा झेलूनही ताठ मानेने उभा आहे. त्याच सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर राजकोट किल्ल्यावर आज कालच्या अभियंत्यांनी उभारलेला छत्रपतींचा उभा पुतळा अवघ्या नऊ महिन्यात कोसळतो यासारखे दुसरे दुर्दैव नाही. विकासाच्या नावाखाली केलेल्या विकास कामांचे श्रेय घ्यायला अनेक जण पुढे येत असतात, पोस्टरबाजी करून केलेल्या कामाची जाहिरात करत असतात. परंतु, ज्यावेळी अशा प्रकारे घाई गडबडीत केलेली बोगस कामे कोसळून पडतात, तेव्हा त्याची जबाबदारी घ्यायला मात्र कोणीही पुढे येत नाही.. तर ती जबाबदारी निसर्गावर टाकली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य उत्तुंग आहे. त्यांचे कार्य जर पुढे नेता येत नसेल तर निदान त्यांच्या नावाला धक्का लागेल अशा प्रकारची कामे तरी करू नयेत, अशा प्रतिक्रिया आज सर्वसामान्य माणसांकडून व्यक्त होत आहेत. आजच्या या दुर्दैवी घटनेने आणि शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

गेले काही दिवस पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या फरश्या तुटून पडल्याच्या आणि दगड विटा कोसळल्याच्या बातम्या सोशल मीडिया मधून पुढे येत होत्या परंतु त्यात काही तथ्य नसेल असाच जिल्हावासियांचा समज झाला होता. परंतु आजच्या घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभागाकडून पुतळ्याच्या देखभाल दुरुस्तीकडे देखील दुर्लक्ष झाले की काय..? अशी शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे बांधकाम खाते देखील टिकेचा धनी बनत असून बांधकाम खात्याने केवळ मुलामा लावून चकचकीत केलेले कोकणातील रस्ते असो किंवा अलीकडेच मोठा गाजावाजा करून उद्घाटन केलेले रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण हे किती दिवस टिकणार असेच प्रश्न उपस्थित होत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा