You are currently viewing कृष्ण एक विचार

कृष्ण एक विचार

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*

 

*कृष्ण एक विचार*

 

*श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी*

*हे नाथ नारायण वासुदेव*

कृष्ण नामाचा हा जप मुखाने गात राहिले की भरकटलेल्या मनाला एकदम उभारी येते असा माझा नित्याचा अनुभव आहे. का बरे असे होत असावे? याचे उत्तर एकच!

कृष्ण ही एक अद्भुत शक्ती आहे, आत्मतत्त्व आहे, परब्रह्म आहे.

*परित्राणाय साधुनाम्*

*विनाशायाच दुष्कृताम्*

*धर्मसंस्थार्पनार्थाय संभवामि युगे युगे*

गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी पार्थ अर्जुनास असे वचन दिले आहे. संत जनांचे रक्षण करण्यासाठी, दुष्टांचा संहार करण्याकरता आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी मी युगानुयुगे येतच राहणार, अवतार घेतच राहणार.

बंदीवासात टाकलेल्या देवकीची एकापाठोपाठ एक सात मुले तिच्या भावाने, कंसाने मारल्यानंतर या कंस मामाचा, या दुष्ट शक्तीचा विनाश करण्यासाठी आठव्या कृष्णाचा जन्म झाला. श्रावण वद्य अष्टमी, मुसळधार पावसाने या बाळकृष्णाचे स्वागत केले. याच वेळी गोकुळात नंद आणि यशोदेस कन्यारत्न प्राप्त झाले. वसुदेवाने या आठव्या बाळाला वाचविण्यासाठी टोपलीत घालून भर पावसात पूर आलेल्या यमुना नदीतून गोकुळात नेले. बाळाच्या पावलाच्या अंगठ्याचा पाण्याला स्पर्श होताच यमुना नदी दुभंगली आणि रस्ता तयार झाला. यशोदेच्या पुढ्यातील कन्या, नंदा हिला घेऊन वसुदेव परत येऊन दाखल झाला. कंस त्या बाळाला आपटून मारणार एवढ्यात त्या बालिकेचे विजेत रुपांतर झाले आणि कडकडून आकाशवाणी झाली, ” हे कंसा! तुझा काळ गोकुळात वाढत आहे.” ही कथा आपण सर्वजण जाणतो. सांगायचा मुद्दा हा की ही किमया त्या ईश्वरी शक्तीचीच आहे. कृष्णाचीच आहे. देवकीच्या उदरी जन्माला आलेले हे बाळ सामान्य नसून दैवी आहे.

आपण म्हणतो,…..

*कुठे शोधिसी रामेश्वर अन्*

*कुठे शोधिसी काशी*

*हृदयातील भगवंत राहिला*

*हृदयातून उपाशी*

भगवंत आपल्या हृदयात आहे असे समजूनही, मान्य करूनही हृदयस्थ परमेश्वराची पूजा करणे आपल्याला जमत नाही. यासाठीच या भगवंताची विविध सगुण रूपे आपण समोर ठेवतो आणि त्याची भक्ती भावाने पूजा करतो. या हृदयातील भगवंताला आपण कधी बाळकृष्णाच्या रूपात पाहतो. ते बाळ लेणी घातलेले गोड गोंडस रूप पाहून मन प्रसन्न होते. गोपाळांसंगे गाई चरायला नेणारा, दह्यादुधाची मडकी फोडून चोरून नवनीत खाणारा, उपरांत *मैया मै नही माखन खायो* असे म्हणणारा, कालिया मर्दन करणारा बाळकृष्ण आपण पाहतो आणि उल्हसित होतो.

राधेचा कृष्ण, मीरेचा कृष्ण, यमुनाजळी गोपीं?संगे रासक्रीडा करणारा कृष्ण, गोपींची वस्त्रे पळवणारा कृष्ण आणि बासरीच्या सुराने आसमंत धुंद करणारा मुरलीधर कृष्ण, कोसळणाऱ्या पावसापासून नगरजनांचे रक्षण करणारा गोवर्धन गिरीधारी कृष्ण आणि बंदीवासातील सोळासहस्त्र स्त्रियांचा उद्धारक कृष्ण अशी कृष्णाची विविध रूपे आपण पाहतो आणि हरखून जातो. सत्यभामेच्या अंगणात पारिजातकाचे झाड लावून त्याच्या सुगंधित फुलांचा सडा रुक्मिणीच्या महालात पडावा अशी किमया करून एकाच वेळी दोन्ही राण्यांना

संतुष्ट करणाऱ्या कृष्णाला काय म्हणावे? या कृष्णाच्या लीलाच अगम्य! खरं सांगायचं तर हे तत्त्वच अत्यंत दुर्बोध आहे.

दुर्योधनाचा अत्याचार थांबविण्यासाठी पांडवांच्या पाठी उभा असलेला कृष्ण तर संपूर्ण वेगळा. दुर्योधनाला शस्त्रास्त्रे पुरवून हा श्रीकृष्ण जातीने पांडवांसोबत उभा राहिला. या द्वारकेच्या राण्याने अर्जुनाच्या रथाचे सारथ्य केले.

कुरुक्षेत्रावर मध्यभागी रथ उभा केल्यानंतर आपल्याच भाऊ बंधाना, पितामह भीष्मांना, गुरु द्रोणाचार्यांना समोर पाहून अर्जुन संभ्रमित झाला, आणि मी यांना कसे मारावे? त्यापेक्षा भिक्षान्न सेवन करणे

मी पसंत करेन असा विचार अर्जुनाच्या मनात आल्यावर त्याला गीता सांगणारा कृष्ण कोण होता? कृष्ण हा परमोच्च कोटीचा विचार! मारणारा तू कोण? या ठिकाणी गीतेच्या उपदेशाचा प्रारंभ होतो. शरीर आणि शरीरी यातील फरक श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितला. शरीर हे विनाशी आहे तर शरीरी अविनाशी आहे. तेव्हा समोर असलेल्या या शरीरांचा नाश ठरलेलाच आहे. तुझे काम फक्त विहित कर्म करण्याचेच आहे.

*अविनाशी तु तत्विद्धी ये न सर्वमिदं ततम्*

*विनाशमव्यव्स्याय कश्चितकर्तुमर्हति*

त्या अविनाशी तत्वाला समजून घे. संपूर्ण संसार याच तत्त्वाने व्यापलेला आहे. या तत्त्वाचा कोणीच विनाश करू शकणार नाही हे फार मोठे सत्य श्रीकृष्णाने अर्जुनाला आणि पर्यायाने आपल्यालाही सांगितले आहे.

*कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन* अर्थात कर्तव्य कर्म करण्यातच तुझा अधिकार आहे, त्यापासून मिळणाऱ्या फळात नाही. कर्म फळाचा हेतू कधीही मनात आणू नकोस, या अशा उपदेशाने आपल्या सामन्यांनाही

कृष्णाने जागृत केले आहे.

गीतेच्या अकराव्या अध्यायात श्रीकृष्णाने पार्थास विश्वरूप दर्शन दिले. ते पाहून पार्थ भयभीत झाला. यातून इतकेच समजायचे की जनतेच्या रक्षणासाठी संपूर्ण विश्वात, चराचरात हे कृष्णतत्व सामावलेले आहे.

कृष्ण हे एक सत्य आहे. सत्य हे अखंड आणि अविनाशी आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात…

*सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ*

श्रीकृष्णाने हे तत्व आचरणात आणले. रामाला राज्याभिषेक आणि वनवास सारखाच होता. सोन्याची द्वारका आणि त्याचा विनाश हे सारखेच होते. उद्धवाला त्याने सांगितले होते की मी भूत, वर्तमान आणि भविष्य या सर्व काळात एकाच स्वरूपात असतो हे सत्य आहे. काम, क्रोध, लोभ यांचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नसल्यामुळे तो कायम आनंद रूपच आहे.

अशा या सत्याची, परब्रम्हाची निष्काम भक्ती केल्याने भगवंताची प्रत्यक्ष भेट होणे सहज शक्य आहे. अखंड नामजप हे या भक्तीचे अत्यंत समर्थ असे साधन आहे.चला गाऊया

*श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी*

*हे नाथ नारायण वासुदेव*

 

अरुणा मुल्हेरकर

मिशिगन

प्रतिक्रिया व्यक्त करा